पंचवटी : प्रतिनिधी
अॅप बेस प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक असतानाही तसेच रोपेन ट्रान्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात रॅपिडो कंपनीतर्फे तरतुदीचा भंग करून प्रवाशांच्या जिवाशी खेळून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केली जात असल्याप्रकरणी आरटीओने कंपनी संचालकांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात शासनाची व प्रवाशांची फसवणूक, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम तसेच मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, आरटीओ अधिकार्यांनी स्वतः रॅपिडो बाइक बुक करून त्याद्वारे प्रवास करत पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
मोटार वाहन निरीक्षक योगेश गोरक्षनाथ सापिके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रॅपिडो अॅपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे नाशिक शहरात अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. ही प्रवासी वाहतूक परिवहन विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे शासनाची व प्रवाशांची फसवणूक करून राजरोसपणे सुरू आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 93 मधील तरतुदीनुसार समुच्चकांनी मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाइडलाइन्स-2020 नुसार अॅप बेस प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक असताना, सदर कंपनीकडून अशा कुठल्याही तरतुदीचे पालन न करता विनापरवानगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 66 नुसार खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करता येत नाही व तसे केल्यास मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 192 नुसार कारवाईस पात्र आहे. तरी सदर कंपनीकडून या तरतुदीचा भंग करून प्रवाशांच्या जिवाशी खेळून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच कंपनीच्या चालकांचा कोणत्याही प्रकारचा चारित्र्य पडताळणीचा दाखला किंवा इतर प्रकारची सुरक्षात्मकदृष्ट्या तपासणी केली जात नाही, ही बाब महिला प्रवाशांच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार, रॅपिडो अॅपच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर अवैध प्रवासी वाहतूक करणार्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. तेव्हा मोटार वाहन निरीक्षक योगेश सापिके, प्रतीक कापसे, अमित पाटील, उमेश बेडसे, सहायक निरीक्षक क्षितिजा साळुंखे, चालक अमोल शिंपी यांनी फिल्डवर जाऊन प्रत्येकाने स्वतंत्रपणे रॅपिडो अॅपने मोटारसायकल बुक करत वेगवेगळ्या मार्गावर प्रवासही केला व चालकांना ताब्यात घेतले.
रोपेन ट्रान्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (रॅपिडो) कंपनीस महाराष्ट्र राज्य शासनाने तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बाइक टॅक्सी (पेट्रोल इंजिन असलेली दुचाकी) या संवर्गात आजपर्यंत कोणताही परवाना / लायसन्स दिलेले नसताना, या कंपनीने नाशिक शहरात बाइक, टॅक्सी विनापरवानगी व अवैधरीत्या बेकायदेशीर ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करून प्रवाशांकडून आर्थिक फायदा करून घेत आहे.
या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीतून शासनाची फसवणूक करत असल्याने अशा प्रकारे बेकायदेशीरपणे रॅपिडो अॅपची ऑनलाइन सुविधा पुरवून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करण्यास प्रोत्साहन देऊन आर्थिक फायदा मिळवणार्या रोपेन ट्रान्स्पोर्ट प्रायव्हेड लिमिटेड (रॅपिडो) या कंपनीच्या संचालकांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
अॅग्रीगेटर पॉलिसीचा भंग
ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर वाहतूक व्यवसाय करणार्यांसाठी केंद्र शासनाने 2020 मध्ये अॅग्रीगेटर पॉलिसी आणण्यात आली होती. 2025 मध्ये राज्य शासनाने नवीन पॉलिसीद्वारे अॅग्रीगेटरला राज्याच्या ट्रान्स्पोर्ट कमिशनरकडून परवानगी अनिवार्य करण्यात आली होती. ओला व उबेर यांनी तशी परवानगी घेतलेली आहे. मात्र, रॅपिडोने अर्ज केला, पण त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केली नव्हती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले होते. नाशिकमध्ये पाच दुचाकीचालकांविरुद्ध 10 हजारांचा दंड आकारण्यात आला असून, संबंधित वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. – योगेश सापिके, मोटार वाहन निरीक्षक
सर्वोच्च व उच्च न्यायालयाने नाकारले होते
मोटार वाहन अॅग्रीग्रेटर नियमावली 2020 मधील अधिसूचनेनुसार परिवहनेतर वाहनांच्या (दुचाकी, तीनचाकी, चारचाकी) समुच्चयनाच्या राइड पुलिंगच्या उद्देशासाठी वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. तरीपण रॅपिडो अॅपने रोपेन ट्रान्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आरटीए पुणे यांना अर्ज केला होता. आरटीए पुणे यांनी 2022 च्या ठरावानुसार त्यांनी केलेला अर्ज खारीज केला होता. या ठरावाच्या विरोधात कंपनीने उच्च न्यायालय येथे रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने पारित केलेल्या 2023 च्या आदेशामध्ये कंपनीस अॅप बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल केली होती, तीदेखील खारीज करण्यात आली होती. रॅपिडो कंपनीकडून कोणताही परवाना नसताना अॅपव्दारे खासगी दुचाकी वाहनाने बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक होत असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आल्याने त्यांना परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे नोटीस देण्यात आली होती.
अभ्यास करून निर्णय घेणार
प्रादेशिक परिवहन विभागाने प्रवासी वाहतूक करणार्या रॅपिडो कंपनीच्या दुचाकीचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. या कंपनीला नेमकी परवानगी आहे किंवा कसे, याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती घेणार आहोत.
– अद्विता शिंदे, सहायक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक शाखा