अनाथ मुलांच्या संगोपन योजनेचे मानधन वर्षभरापासून रखडले
मुंबई । प्रतिनिधी
राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वळता करण्यात आल्यामुळे, महिला व बालविकास विभागाच्या इतर महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांना याचा मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ’बालसंगोपन योजना’ आणि ’अनाथ मुलांच्या’ शैक्षणिक व आर्थिक मदतीसाठी दिल्या जाणार्या निधीचा समावेश आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या इतर अर्थसंकल्पीय खात्यांमधून निधी वळवण्यात आला आहे. परिणामी, अनाथ, बेघर आणि वंचित मुलांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणार्या योजनांचा हक्काचा निधी रखडला आहे. गेल्या वर्षभरापासून या घटकांना आवश्यक असणारे शासकीय साहाय्य मिळणे कठीण झाले आहे.
या निधी कपातीमुळे राज्यातील शेकडो अनाथालये, बालगृहे आणि संबंधित स्वयंसेवी संस्थांसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ व गरजू मुलांच्या शिक्षण, अन्न आणि आरोग्यासाठी दिले जाणारे मासिक मानधन वेळेवर न मिळाल्याने अनेक संस्थांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी अनाथ मुलांच्या शैक्षणिक शुल्काची आणि संस्थांच्या कर्मचार्यांच्या वेतनाची देयके थकली आहेत.
हक्काचा निधी रोखणे अन्यायकारक
सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि बालहक्क संघटनांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एका योजनेच्या लोकप्रियतेसाठी समाजातील अत्यंत संवेदनशील आणि दुर्लक्षित असलेल्या अनाथ मुलांच्या हक्काचा निधी रोखणे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यायी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Funds diverted for Ladki Bhahin scheme