महाराष्ट्र

जुगारी अड्डा – भाग ४

डॉ. संजय धुर्जड.
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
स्मार्टफोन वर अशा अनेक साईट्स आणि अँप्स आहेत, जे आपला आणि आपल्या देशातील करोडो तरुणांचा वेळ घेत आहे. कामाचे कमी आणि बिनकामाचे अधिक अशा सोशल मीडिया वरील चॅट्स, स्टेटस, स्टोरीज, पोस्ट्स, रिल्स, शॉर्ट व्हीडिओ आणि फोटोज बघण्यात वेळ वाया घालवतो. ग्रुपमधील निरार्थक चर्चेत भाग घेतो. सर्वांना विनाकारण गुड मॉर्निंग, गुड नाईट चे मेसेज पाठवतो.
काही खास व्यक्तींशी रात्री उशिरापर्यंत चॅट करतो. काहींना गेम्स खेळण्यात रस वाटतो, तर काही त्या गेम्सवर पैसे लावून जुगार खेळतात. रोज लाखो करोडो लोक या जुगारी अड्डयांवर पैसे हारतात, व गेमिंग कंपन्या अरबोपती होतात. वाईट वळणावर चाललेल्या आणि वयात आलेल्या तरुणांना हल्ली डेटिंग साईट्स भुरळ घालत आहे. त्यात भर म्हणून चांगली-चुंगली घरंदाज, संसारी पुरुष आणि महिला ऑनलाइन प्रेम प्रकरणात अडकत आहे.
त्यांना भावनिक साद घालून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक पिळवणूक केली जाते, हे वास्तव आता हळू हळू समोर येतेय. हे सर्व का होत आहे, कशामुळे आणि कशासाठी होत आहे हे समजणे गरजेचे आहे. त्यातून स्वतःचा बचाव कसा करायचा, स्वतःला कसे दूर ठेवायचे, आणि स्मार्टफोनचा आपल्या हितासाठी कसा वापर करायचा हे आज आपण बघणार आहोत.
कोण मोबाईलचा कसा वापर करतो आहे, हे बघण्यापेक्षा आपण काय करतो आहे, त्याचा वापर कसा करतो आहे, याचा आधी विचार करावा. कारण, सुरवात स्वतःपासून करावी. आपल्याकडे घरात टाईमपासचे अनेक साधने असतात. उदा. रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्र तर होतेच, आता त्यात मोबाईलची भर पडली आहे. रेडिओचे ठीक आहे, त्यात टाईमपास होत नाही, परंतु अभ्यासात आणि पूजापाठ करण्यात व्यत्यय येऊ शकतो. टीव्ही वरील सिरिअल्स, रिऍलिटी शो, मुव्हीज, कार्टून चॅनेल्स, गाण्यांचे चॅनेल्स निव्वळ टाईमपास आहेत. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस मॅचेस थोड्याफार प्रमाणात बघणे ठीक आहे, परंतु अतिरेक केला तर तोही निरर्थक टाईमपासच आहे.
न्यूज चॅनेलचेही तसेच आहे. दिवसभरात अर्धा तास बातम्या बघितल्या तर सर्व महत्वाच्या घडामोडी समजतात. त्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही समोर बसणे माझ्या दृष्टीने टाईमपास आहे. गेल्या नऊ वर्षांपासून मी वृत्तपत्र वाचणे आणि वृत्तवाहिन्या बघणे बंद केले आहे. जगभरात काय चालले आहे, हे माहीत करून मी काय करू. त्याचा मला काही फायदा, तोटा आहे का, असा मी स्वतःला प्रश्न करतो. मोदीसाहेब इंडियात आहे, की अमेरिकेत, की फ्रांस की इजिप्त, ते कुणाबद्दल काय बोलले किव्हा नाही बोलले, याचा माझ्या जीवनाशी काही संबंध नाही. संसदेत आज कुठल्या विषयावर काय चर्चा झाली, हे जाणून घेतल्याने तुमच्या पगारात किव्हा नफ्यात वाढ होणार आहे का? इंडिया किव्हा मुंबई इंडियन्स मॅच जिंकली किव्हा हारली, त्याने माझ्या जीवनात काही बदल होणार आहे का?
सरकारात कोण आहे, मुख्यमंत्री कोण आणि मंत्री कोण, हे माहीत करून घेण्यासाठी मी का श्रम आणि वेळ खर्ची करू? ते काही मला घरबसल्या आणून देणार आहेत का? मी त्यांची खबर ठेवण्यात माझा वेळ का वाया घालवू? असा प्रश्न तुम्हाला नाही पडत का? नसेल पडत, तर यापुढे स्वतःला असे प्रश्न विचारा, तुमचा खूप वेळ वाचेल.
मुलाला बाईक कशासाठी घेऊन देत आहोत, हा उद्देश जसा आपला नक्की ठरलेला असतो, तसाच उद्देश मोबाईल बाबतही नक्की करा. कॉल करणे, मेसेज करणे, गरजेनुसार व्हीडिओ कॉल करणे, संपर्कात/उपलब्ध राहणे, माहिती शेअर करणे, डॉक्युमेंट शेअर करणे, लोकेशन/रस्ता शोधणे, गाणे ऐकणे, आणीबाणीच्या वेळी संपर्क साधणे हे स्मार्टफोन वापरण्याचे काही मूलभूत उद्देश आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला मोबाईलचा योग्य वापर कसा करावा, याचे ज्ञान आणि कल्पना असावी. सोशल मीडिया, गेमिंग आणि डेटिंग साईट्स हे टाईमपासचे साधन आहे, हे आधी तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.
हे करमणूक/विरंगुळा म्हणून ठीक आहे, दिवसभरातील काही मिनिटे किव्हा एखादा तास यासाठी खर्ची करणे ठीक आहे, परंतु त्यापेक्षा अधिक वेळ देणे, हे वेळ वाया घालवण्यासारखे आहे. मी तर म्हणेन की साधे गेम्स, पेड गेम्स, बेटिंग आणि डेटिंग अँप्स तर नकोच. सरळ डिलीट करा, कारण ते तुम्हाला सवय लावतात, तुम्ही त्याच्या आहारी जातात, व्यसनी बनतात, असं म्हंटलं तरी अतिशोक्ती होणार नाही. यापैकी तुमच्या मोबाईलमध्ये असे काही गेम्स आणि अँप्स असतील तर आत्ताच्या आत्ता डिलीट करा. डिलीट करण्याचा आजचा तुमचा निर्णय तुमचा, तुमच्या कुटुंबीयांचा आणि तुमच्या भावी पिढीचा खूप सारा वेळ वाचवणार आहे. तुमच्या मुलांचं आयुष्य घडविण्याची ताकद तुमच्या आजच्या निर्णयात आहे.
मग आता मोबाईल मध्ये काय असावं, हे जाणून घेऊया. तसं बघितलं तर तुमच्या मोबाईल मध्ये यापूर्वीच सर्व काही होतं आणि आहेही. तुम्हाला ते माहित नव्हतं, इतकंच. तुमच्या मोबाईल मध्ये गूगल आहे. त्यात सर्वकाही आलं आहे. सर्वप्रथम, गूगल क्रोम तुमच्या होम स्क्रीन वर ठेवा. आजपासून तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल, कशाबद्दलही जाणून घायचे असेल, काही शिकायचं असेल तर गूगल क्रोम ओपन करून जे हवं ते टाईप करा, आणि माहिती मिळवा.
लक्षात ठेवा माहिती मिळवताना खात्रीलायक वेबसाईट वरूनच माहिती घ्या. सोशल मीडियावर फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवू नका. शासकीय साईट्स, जागतिक / आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त साईट्स, एखाद्या संघटनेची किव्हा कंपनीची अधिकृत साईट, अशा साईट्स वरील माहिती खात्रीशीर असते हे लक्षात असू द्या. यु-ट्युब हे गूगलचे खूप छान अँप आहे. ज्या विषयाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे आहे, ते ते तुम्ही यु-ट्युब वर व्हीडिओ फॉरमॅट मध्ये बघू शकता.
गूगल फोटोज, गूगल ट्रान्सलेटर, गूगल ड्राईव्ह, जी-मेल, जी-मॅप्स, गूगल मीट, गूगल लेन्स, असे शेकडो गूगल अँप्स आहेत. तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊन त्याचा तुमच्या कामासाठी वापर करू शकता. याव्यतिरिक्त, यू.पी.आय. पेमेंट साईट्स, वॉलेट्स बद्दल जाणून घ्या आणि ते पेमेंट घेणे-देणे, बिल भरणा, सबस्क्रिपशन घेणे, किरकोळ खर्च (सुट्टे पैसे ठेवण्याची गरज नाही), दैनंदिनी/मासिक खर्च याद्वारे केले तर महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे लिखित स्वरूपात त्याचा हिशोब ठेवता येतो.
माझ्या मोबाईल मध्ये एकही गेम नाही किव्हा गेमिंग अँप नाही, बेटिंग किव्हा डेटिंग अँप नाही. परंतु, माझ्याकडे व्हाट्सअँप, व्हाट्सअँप बिजनेस, फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, लिंक्ड-इन, यासारखे सोशल मीडिया अँप आहेत. या अँप्स चा वापर मी माझे कार्य, योगदान, उपलब्धी व याबद्दलची बातमी व माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी करतो. सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त माझ्या सोयीसाठी व हितासाठी अनेक अँप्सचा वापर करतो.
आर्थिक देवाण-घेवाणासाठी फोन-पे, फोन-पे बिजनेस, योनो एसबीआय, जी-पे, गूगल पे बिजनेस, इंस्टाबिझ, भीम अँप्स तर आर्थिक गणितं सोडवण्यासाठी फायनान्शियल कॅल्क्युलेटर अँप वापरतो. इतर गणितांसाठी युनिट/एरिया कन्व्हर्टर, मनपाच्या माहितीसाठी एनएमसी ई-कनेक्ट, कोर्टाच्या माहितीसाठी ई-कोर्ट्स, ऑनलाइन खरेदीसाठी ऍमेझॉन, फ्लिपकार्ट,
लिस्टिंग साईट्स पैकी जस्टडायल, बुकिंग साठी बुकमायशो, मेकमायट्रिप, लिखाण आणि डॉक्युमेंटसाठी एमएस ऑफिस, डब्ल्यूपीएस ऑफिस, गूगलचे डॉक्स, स्प्रेडशीट्स, ट्रान्सलेटर, ब्लॉगर, फोटोज आणि बरंच काही, व ते सर्व ऑनलाइन स्टोअर करण्यासाठी गूगल ड्राइव्हचा वापर करतो. अधून मधून करमणुकीसाठी माझ्याकडे अनेक ओटीटी साईट्स देखील आहेत, परंतु त्या मी खूप क्वचित किव्हा विशिष्ठ कार्यक्रम बघण्यासाठीच वापरतो. मी त्यावर मुव्हीज आणि आम सिरिअल्स बघत नाही.
स्मार्टफोनचा वापर तुम्ही स्वतःच्या व तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी, ज्ञानवर्धनासाठी, कलाविष्कारासाठी तसेच व्यक्तिगत विकासासाठी करा. किंडल, कुकु-एफएम, ऑडीबल, यू-ट्यूब ऑडिओबुक्स याद्वारे असंख्य पुस्तके तुमच्या तळहातावर आणि कानात पोहोचतात. सेल्फ-हेल्प बुक्स, थोर-महात्म्यांच्या कथा व आत्मकथा, इतिहासातील विशिष्ठ घटना यावरील पुस्तके प्रभावशाली आणि परिणामकारक असतात. यू-ट्यूब आणि विविध ओटीटी साईट्सवर अनेक सीरिअल्स आणि चित्रपट उपलब्ध आहेत. रामायण, महाभारत व इतर पौराणिक कथा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवे बाजीराव, सम्राट अशोक, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, चाणक्य यांसारखे महापुरुष, आपली पृथ्वी, सौरमंडल, ब्रह्मांड त्यातील रहस्य, तसेच नवनवीन शोध, शास्त्र (सायन्स) आणि शास्त्रज्ञ याबद्दल बरेच ज्ञान आणि माहिती मिळते. थोरांच्या जीवनपटातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनात नक्कीच बदल घडवू शकतो, हे आपल्या मुलांच्या मनावर बिंबवा.
यू-ट्यूब वर पाककला, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, गायन, वाद्यवादन, योगा, मेडिटेशन, एकाग्रता वाढविणे, पॉजिटिव्ह अफरमेशन्स, व्यायाम, वजन कमी करणे, सकस आणि पौष्टिक आहार, स्ट्रेस कमी करणे, ओमकार, गायत्री मंत्र व इतर मंत्रोच्चार, देव-देवतांच्या आरत्या, भक्ती गीत-संगीत, शास्त्रीय संगीत, वाद्य व तरंग संगीत, गीता कुराण बायबल ची शिकवण, धर्मशास्त्र अशा असंख्य गोष्टी त्या तुमच्या खिशातल्या डब्ब्यात बंदिस्त आहेत.
मुलांच्या शिक्षणाच्या व अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक शैक्षणिक व्हीडिओ आहेत व ते तुम्ही एकदा नव्हे तर अनेकदा बघू शकता. काय हवं ते टाइप करायचं आणि ते बघायचं, वाचायचं, अनुभवायचं आणि त्यावर कृती करून ते अमलात आणायचं. अशा प्रकारे तुम्ही त्या डब्ब्याचा स्वतःच्या हितासाठी वापर करायचा आहे. त्यासाठी वेगळे पैसे मोजण्याचीही गरज नाही, नेट पॅक मध्येच सर्वकाही मिळते.
वजन कसे कमी करायचे? याचे केवळ ज्ञान असल्याने वजन कमी होत नाही, तर त्या ज्ञानावर कृती करून ते अमलात आणल्यानेच वजन कमी होत असते, हे आपल्यालाही मान्य असेलच. तर मग, स्मार्टफोनचा वापर आपल्या हितासाठी, फायद्यासाठी, विकासासाठी कसा करायचा, हे ओळखा, ते शिका, मुलांनाही शिकवा आणि सर्वांनी मिळून त्याचा योग्य तो वापर करा. लक्षात ठेवा, आपल्यासाठी मोबाईलची निर्मिती झालेली आहे, आपला जन्म मोबाईलसाठी झालेला नाही. हा जुगारी अड्डा, आता ज्ञानार्जनाचे पीठ बनवा. लिहिण्यासारखे आणि सांगण्यासारखे खूप खुप काही आहे, परंतु वेळेअभावी आणि जागेअभावी इथे ते शक्य नाही. कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनासाठी आणि माहितीसाठी मी नेहमीच उपलब्ध आहे. माहिती आवडली असेल, तर आपल्या जीवलगांना हा लेख फॉरवर्ड करा…!(समाप्त)
*
Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago