सिडको : प्रतिनिधी
नाशिक शहरात दुकानांचे शटर उचकटून चोरी करणार्या रेकॉर्डवरील टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 च्या पथकाने अलिबाग (जि. रायगड) येथून जेरबंद केले. या कारवाईत नाशिक शहरातील दुकानफोडीचे चार, तर नाशिक ग्रामीण भागातील दोन, असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयितांकडून मोबाइल फोन, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, मोपेडसह सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक शहरात गेल्या महिनाभरात दुकानांचे शटर उचकटून दुकानातील साहित्य व रोख रक्कम चोरीला जाण्याचे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडून तपास सुरू होता.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि मानवी कौशल्याच्या आधारे तीन संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली. वाजीद जैद शेख, आर्यन पप्पू शेख आणि अब्दुल्ला अशी त्यांची नावे असल्याची माहिती पोलिस अंमलदार सुनील आहेर आणि अतुल पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे ही माहिती युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलिस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन आणि अतुल पाटील यांचे पथक अलिबाग (जि. रायगड) येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने संशयितांचा शोध घेतला. कारवाईत वाजीद जैद शेख (वय 20, रा. सादिकनगर, गल्ली क्रमांक 4, वडाळागाव, नाशिक) आणि आर्यन पप्पू शेख (वय 19, रा. महारूख सेंटरजवळ, आखाडा, कापुरवाडी, ता. जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून पाच मोबाइल फोन, सुझुकी अॅक्सेस मोपेड आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा सुमारे दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीचे मोबाइल खरेदी करणारा संदेश शांताराम रंधे (वय 35, रा. फ्लॅट क्रमांक 9, प्रसाद रेसिडेन्सी, माणेकशानगर, द्वारका, नाशिक, मूळ रा. अकोले, जि. अहिल्यानगर) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे एक लाख 75 हजार रुपये किमतीचे चार महागडे मोबाइल फोन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दुकानफोडीचे दोन, भद्रकाली पोलिस ठाण्यातील एक आणि गंगापूर पोलिस ठाण्यातील एक, तसेच मालेगाव येथील आयशानगर पोलिस ठाण्यातील दोन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
ताब्यात घेतलेल्या आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलिस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, पोलिस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, पोलिस अंमलदार प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजिरे यांनी केली.
Gang behind shop burglaries in Nashik nabbed in Alibaug.