नाशिक : वार्ताहर
एकट्या वयस्कर व महिला प्रवाशांना लक्ष्य करुन त्यांचे सोन्याचे दागिने लांबविणार्या तीन महिलांच्या टोळीला मुंबई नाका पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दमण येथील मंगल माधवराव क्षीरसागर या नाशिकला बहिणीला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या द्वारका येथून रिक्षामधून येत असताना रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या 3 महिलांशी संगनमत करून क्षीरसागर यांच्या बॅगेतील एकूण 3 लाख 13 हजार 250 रुपयेे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले होते. त्यांना पाथर्डीफाटा येथे न सोडता राणेनगर येथेच उतरून दिले होते. दागिने लंपास झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास केला असता यात रिक्षाचालक सहभागी असल्याने त्यांनी बड्डा उर्फ अनिल करमसिंग देंगे रा. कॅन्टोमेन्ट, देवळाली कॅम्प, नाशिक रोड यास ताब्यात घेतले होते. त्याने या महिलांबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने धुळे येथे जात शीतल गोकुळ कसबे उर्फ कासोदे (रा. एकता नगर, देवपूर धुळे) व अनिता विजय समाणे रा. हरीविठ्ठल नगर, जळगांव) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीतील साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक के. टी. गेंदळे, पोलीस हवालदार रोहिदास सोनार, पोलीस शिपाई आप्पा पानवळ, पोलीस शिपाई समीर शेख, महिला पोलीस नाईक योगिता फरसाळे यांनी ही कामगिरी केली.
हा ऐवज हस्तगत
4 ग्रँम वजनाचे डोरले, 4 ग्रँम वजनाचे मंगळसूत्र 26 हजार 500 रु. किंमतीची सोन्याची चेन, 11 हजार 750 रु. किंमतीचेे 2 टॉप्स, 9 हजार 790 रु. किंमतीचे 1 सोन्याची अंगठी, 5 हजार240 रू. किंमतीचे 1 सोन्याचे पेंडट असा मुद्देमाल या महिलांकडून पोलिसांनी हस्तगत केला. या महिलांवर यापूर्वी मुकुंदवाडी पोलिस.स्टेशनसह औरंगाबाद, अमळनेर सिटी पो.स्टे. जळगांव व देवपूर पो.स्टे., धुळे येथे चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत.