नाशिक : प्रतिनिधी
महापालिका आयुक्त तथा प्रशासन रमेश पवार यांनी गंगाघाट परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे . त्यानुसार त्यांनी प्रथम दोघा सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली होती . दोघे सुरक्षारक्षक पुरेसे नसल्याचे पाहत पालिकेने थेट सहा ते आठ सुरक्षारक्षक वाढण्याचा निर्णय घेतला आहे . सोमवारपासून विविध भागांमध्ये हॉकर्स , टपरीधारक अतिक्रमणधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होणार होती . मात्र , यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला पोलीस संरक्षण मिळाले नाही , यामुळे ही मोहीम रद्द झाल्याची चर्चा होती . पोलिसांनी बंदोबस्त दिला नाही यामुळे अतिक्रमण मोहीम पाहिजे त्या स्वरूपाची झाली नाही , तरीही गंगाघाट परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून सुमारे शंभर लहान – मोठ्या टपऱ्या , हातगाड्या तसेच रस्त्यावर बसणाऱ्याचे साहित्य जप्त केले आहे . महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला पोलीस बंदोबस्त मिळाले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी कारवाई शक्य झाली नसल्याचे समजते आहे .
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध भागांमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे . गंगाघाटावर महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून , या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे . या परिसरात पूजासाहित्य विक्री करणाऱ्या व्यतिरिक्त कुणालाही दुकाने लावता येणार नाही . तसेच अतिक्रमण झाल्यास या प्रकरणी थेट सुरक्षारक्षकांना जबाबदार धरण्यात येणार आहे . पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कडक लक्ष आहे .