नाशिक : वार्ताहर
जिल्हा परिषदेच्या गट आणि गण प्रारूप रचना काल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून, अधिसूचनेनुसार 84 गट आणि 168 गणांची निर्मिती नवीन आराखड्यानुसार करण्यात आली आहे. आराखड्यानुसार जिल्ह्यात 11 गट आणि 22 गण वाढले आहेत.
यापूर्वी 2017 च्या प्रारूप रचनेनुसार, 73 गट आणि 146 गण होते, मात्र आता 2022 च्या प्रारूप रचनेनुसार 84 गट आणि 168 गण असणार आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप रचनेनुसार, मालेगावमध्ये 2 गट आणि 4 गण वाढले असून, येवला, नांदगाव, देवळा, इगतपुरी तालुक्यांत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तर नाशिक, निफाड, बागलाण, सिन्नर, दिंडोरी, चांदवड, कळवण, सुरगाणा, त्र्यंबक, पेठमध्ये प्रत्येकी 1 गट आणि 2 गण वाढविण्यात आले आहेत. एकूण गटांच्या दुप्पट गणांची रचना याप्रमाणे गट आणि गणांची प्रारूप रचना करण्यात आली आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेप्रमाणे एकूण 84 गटांपैकी मालेगाव 9, येवला 3, नांदगाव 4, देवळा 5, इगतपुरी 5, नाशिक 5, निफाड 10, बागलाण 8, सिन्नर 7, दिंडोरी 7, चांदवड 5, कळवण 5, सुरगाणा 4, त्र्यंबक 4, पेठ 3 अशी असणार असून, प्रत्येक गटात 2 गण अशा पद्धतीने 168 अशी प्रारूप प्रभागरचना असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या गट व गणविषयक प्रारूप रचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरील हरकती व सूचना नोंदविण्याचा कालावधी 8 जूनपर्यंत असून, ज्या कुणाला कुणाच्या हरकती किंवा सूचना नोेंदवायच्या असतील, त्यांनी त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपावेतो नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 8 जूननंतर प्राप्त झालेल्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
गटांची रचना पुढीलप्रमाणे :
बागलाण तालुक्यात 7 गट होते. यात एक गट वाढला असून, आता 8 गट तयार झाले आहेत. पठावे दिगर हा गट रद्द होऊन डांगसौंदाणे व मुल्हेर हे नवीन गट तयार झाले आहेत.
मालेगाव तालुक्यात 7 गट होते, यात दोन गट वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यात 9 गट तयार झाले आहेत. यात वडनेर गट रद्द झाला असून, नव्याने अस्ताणे, वडेल, टाकळी हे गट तयार झाले आहेत.
कळवण तालुक्यात 4 गट होते. यात एकाची वाढ झाली असून, आता 5 गट तयार झाले आहेत. खर्डेदिगर गट रद्द झाला असून, पुनद नगर व दळवट हे नवीन गट तयार झाले आहेत.
सुरगाण्यात पूर्वी तीन गट होते. यात एकाची वाढ होऊन चार गट तयार झाले आहेत. हट्टी गट रद्द होऊन भदर व बोरगाव हे नवीन गट अस्तित्वात आले आहेत.
पेठमध्ये पूर्वी दोन गट होते. यात एक गट वाढला आहे. धोंडमाळ गट रद्द होऊन सुरगाणे व कुंभाळे हे नवीन गट अस्तित्वात आले आहेत.
दिंडोरी तालुक्यात पूर्वी 5 गट होते. यात एकाची वाढ झाली असून, वरखेडा हा नवीन गट तयार झाला आहे.
चांदवड तालुक्यात पूर्वी 4 गट होते. त्यात एकाची वाढ होऊन धोंडाबे हा नवीन गट तयार झाला आहे.
निफाड तालुक्यात पूर्वी 10 गट होते. त्यातील ओझर गट रद्द झाल्याने 10 गटांची पुनर्रचना झाली असून, नव्याने पिंपळस गट तयार झाला आहे.
नाशिक तालुक्यात एक गट वाढला असून, आता 5 गट तयार झाले आहेत. पिंप्रीसय्यद नवीन गट तयार झाला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पूर्वी तीन गट होते. यात एक गट वाढला आहे. ठाणापाडा गट रद्द होऊन बेरवळ व वाघेरा गट तयार झाला आहे.
सिन्नर तालुक्यात पूर्वी 6 गट होते. यात एक गटाची वाढ झाली आहे. नायगाव, देवपूर, चास व ठाणगाव या गटाची पुनर्रचना झाली असून, नव्याने माळेगाव, सोमठाणे, पांगरी बु., दापूर, शिवडे हे गट तयार झाले आहेत.