पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटी परिसरातील पेठरोडवर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून एका 36 वर्षीय विवाहित महिलेने तिच्या 26 वर्षीय प्रियकराचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना नवनाथनगर येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी महिलेला तात्काळ बेड्या ठोकल्या असून, या हत्याकांडात आणखी दोघा महिलांचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल पंढरीनाथ दांडगे (26, मूळ रा. चौधरी मळा, हनुमानवाडी, पंचवटी) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ संदीप पंढरीनाथ दांडगे याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित महिला सोनाली राजेंद्र गायकवाड (वय 36, रा. साळवे चाळ, नवनाथनगर) हिच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत अमोल हा अविवाहित होता, तर संशयित आरोपी सोनाली ही विवाहित आहे. या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून अनैतिक संबंध होते. अमोलच्या या संबंधांना त्याच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. मात्र, प्रेमात आंधळा झालेल्या अमोलने घरच्यांचा विरोध झुगारून दिला. तो गेल्या 15 दिवसांपूर्वीच हनुमानवाडीतील आपले घर सोडून पेठरोडवरील नवनाथनगर येथील साळवे चाळीत सोनालीसोबत भाड्याच्या खोलीत राहण्यास आला होता. मात्र, ज्या प्रेयसीसाठी त्याने घर सोडले, तिनेच त्याचा काळ बनून गेम
केला.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री 1 वाजेच्या सुमारास अमोल आणि सोनाली यांच्यात अनैतिक संबंध आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित सोनालीने राग अनावर झाल्याने कशाच्या तरी सहाय्याने अमोलचा गळा आवळला. निपचित पडलेल्या अमोल यास सोनाली हिने इतरांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा तिने डॉक्टरांना चक्कर येऊन पडल्याचे सांगितले. मात्र, अमोलच्या गळ्यावरील व्रण मात्र हा वेगळाच प्रकार असल्याचे दर्शवत होते. शवविच्छेदन अहवालात अमोलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट होताच पंचवटी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून सोनाली हिस
ताब्यात घेतले.
Girlfriend strangled boyfriend to death