मविप्रच्या नवीन सभासदांची यादी द्या

नितीन ठाकरे यांची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मयत सभासदांच्या नवीन वारस सभासदांची यादी उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी काल मविप्रच्या प्रशासकीय कार्यालयावर ऍड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी व माजी पदाधिकार्‍यांनी धडक दिली.
संस्थेने मयत सभासदांच्या एका वारसास संस्थेने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीची पूर्तता केल्यानंतर नवीन सभासद म्हणून मान्यता देण्याबाबत म्हणजेच सभासद करुन घेण्याबाबत धोरण निश्‍चित केले आहे. त्याप्रमाणे संस्थेने सप्टेंबर 2017 पासून सप्टेंबर 2021 अखेर पर्यंत नवीन वारस सभासद केले आहे. त्यांची यादी मिळावी, यादी देताना मयत सभासदांचे गाव, तालुका, मतदार संघाचे नाव, मयत सभासदांचे नाव, त्याचा अनुक्रम क्रमांक, रजिस्टर क्रमांक तसेच त्यांच्याऐवजी वारस म्हणून झालेल्या सभासदांचे नाव अनुक्रम नंबर, मतदार संघाचे नाव व मयत सभासदांशी असलेले नाते असा सविस्तर उल्लेख असावा. तसेच वारस सभासदांचा टेलिफोन नंबर, व्हॉटसऍप क्रमांक देण्यात यावा. मविप्र समाज संस्था ही दहा हजाराच्या वर सभासदांची संस्था असून, संस्थेचा कारभार पारदर्शक असणे गरजेचे आहे. त्यात कुठेही संशयाला जागा राहू नये,संस्थेच्या विषयीची सर्व माहिती मिळणे हा सभासदांचा हक्क आहे. तरी सत्य माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर अरविंद कारे, ऍड. नितीन ठाकरे, प्रतापदादा सोनवणे, डॉ. अभिमन्यल पवार, शिरीष कोतवाल, विवेक सोनवणे, वसंतराव मुळाणे, डॉ. विलास बच्छाव, कृष्णाजी भगत, मोहन पिंगळे, संतोष गटकळ, प्रभाकर मोरे यांच्यासह सभासदांच्या सह्या आहेत. याबाबतचे निवेदन मविप्र कार्यालयाला आणि धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *