मराठा समाजाला आरक्षण दिल्याने तुमच्या पोटात दुखतं कुठं?

जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांचा आरक्षण विरोधकांना सवाल; पांगरीत खा. वाजेंचा सत्कार

सिन्नर ः प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन सर्वांच्या उन्नतीचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांनी आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आणि वंचित समाजांना आरक्षण मिळवून दिले. यावेळी मराठा समाजाने मोठा भाऊ म्हणून भूमिका निभावताना कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही. आता मात्र मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना आरक्षण मिळत असताना तुमच्या पोटात दुखतं कुठं, असा सवाल सिंदखेड राजा येथील जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी उपस्थित कोला. त्याचबरोबर सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडून आरक्षण मर्यादा वाढवून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला.
तालुक्यातील पांगरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने खा. राजाभाऊ वाजे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर खा. राजाभाऊ वाजे, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, मराठा क्रांती मिशनचे अध्यक्ष विजय काकडे, जि.प.चे माजी सभापती अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे, माजी नगरसेवक गोविंद लोखंडे, भिकन आबा शेळके, भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष विठ्ठल जपे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, प्रा. राजाराम मुंगसे, पांगरीच्या सरपंच स्मिता निकम, विजया दळवी, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात विलास पांगारकर यांनी खा. राजाभाऊ वाजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पक्ष बाजूला ठेवून सक्षम पाठिंबा घेण्याची भूमिका मांडली. त्याचबरोबर समाजातील वंचितांना न्याय घेत आहेत. त्यामुळे त्यांचा हा सत्कार असल्याचे पांगारकर म्हणाले. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे या दोघाही नेत्यांच्या भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पूरक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली दरबारी लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. सुभाष पगार यांनी सूत्रसंचालन केले.

समाजातील वंचितांच्या शिक्षणासाठी निधी चळवळ उभारावी

मराठा समाजाचा नेता म्हणून मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत कर्तव्य निभावले आहे. त्यात माझ्या सत्कारासारखे काहीही नसल्याची प्रांजळ कबुली खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली. मराठा समाजातील मूठभर लोकांच्या हातात अनेक शैक्षणिक संस्था असून, त्यांनी समाजाच्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना सवलतीत शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. याशिवाय गावोगावी मराठा समाजाने एकत्र येऊन आर्थिक मागास असलेल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी संकलनाची चळवळ उभारून त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *