मद्यपींकरिता सरकारच्या पायघड्या

ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 31 डिसेंबरला मद्याची दुकाने रात्री एकपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. बिअर बार, पब्स, क्लब आणि परमिट रूम यांमध्ये पहाटे पाचपर्यंत मद्यविक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मद्यपींमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी सामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या घरात दारिद्रय आले आहे. कित्येक पिढ्या बरबाद झाल्या आहेत. दारूमुळे होणारी हानी लक्षात घेऊन अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यात कायमस्वरूपी दारूबंदी केली आहे. असे असताना राज्य सरकारने मद्यपींसाठी घालून दिलेली मोकळीक महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे.
1 जानेवारी हा खरेतर ख्रिस्ती नववर्षारंभ. भारतात इंग्रजांनी अनेक प्रांतांत शेकडो वर्षे राज्य केल्याने आज इंग्रज जाऊन 78 वर्षे उलटली, तरी इंग्रजांच्या वैचारिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून आपण अद्याप मुक्त झालेलो नाहीत. तरुण वर्गात साजरे केलेले जाणारे विविध ’डेज्’ आणि त्यानिमित्ताने चालणारा स्वैराचार ही त्याचीच विषारी फळे आहेत. भारतात दरवर्षी उत्साहात साजरा केला जाणारा 31 डिसेंबर हेही आपल्यातील वैचारिक गुलामगिरीचेच लक्षण आहे. 31 डिसेंबरच्या एका रात्रीत लाखो लिटर दारू रिचवली जाते. अति मद्यसेवनामुळे या दिवशी कितीतरी ठिकाणी अपघात घडतात. या अपघातात कितीतरी निरपराधांचे बळी जातात, तर कितीतरी आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. या एका रात्री अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडतात. त्यात कित्येकांची डोकी फुटतात. शहरी भागात 31 डिसेंबरच्या पार्ट्यांमध्ये वर्षागणिक तरुणींचे प्रमाणही वाढू लागले आहे.
सध्याच्या तरुण पिढीवर सिनेकलाकारांचा प्रभाव अधिक असल्याने अशा पार्ट्यांमध्ये कित्येक तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये वावरताना दिसतात. 31 डिसेंबरच्या रात्री विनयभंगाचे आणि छेडछाडीचे प्रसंगही मोठ्या प्रमाणात घडतात. 31 डिसेंबरच्या निमित्ताने शेकडो तरुण अन्य मित्रांच्या हट्टामुळे पहिल्यांदा दारूचा ग्लास ओठाला लावतात आणि त्यातील कितीतरी जण पुढच्या वर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत अट्टल मद्यपी झालेले असतात. अनेक बार आणि पब्समध्ये मद्याच्या नावाखाली अमली पदार्थांचीही विक्री केली जाते. पहाटे पाचपर्यंत परमिट रूम चालू ठेवण्याची शासनाने परवानगी दिल्यामुळे अनैतिक कृत्यांसाठी मोकळे रानच उपलब्ध झाले आहे. या सर्वांचा सर्वाधिक ताण पोलीस प्रशासनावर पडतो. कुणी मद्यपान करून वाहन चालवत नाहीत ना, वाहनांचे वेग मर्यादेत आहेत ना, कुठे अमली पदार्थांची खरेदी-विक्री तर होत नाही ना, हे सर्व पाहण्यासाठी पोलिसांना शहरासारख्या ठिकाणी अधिक कुमक मागवावी लागते. एरवी रात्रीच्या वेळी कोणी दारू पिऊन झिंगताना दिसल्यास पोलीस त्याला हटकतात. मात्र, आता सरकारनेच पहाटे पाच वाजेपर्यंत झिंगण्याची परवानगी दिल्याने पोलिसांना रात्रीची गस्त वाढवून मद्यपींची भांडणे सोडविण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार आहे.
या देशात बहुसंख्य हिंदू असून, हिंदूंचे नववर्ष गुढीपाडव्याला साजरे होते. गुढीपाडवा हा सृष्टीचाही आरंभ दिन आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाचे स्वागत आपण दारी तोरण व दाराजवळ गुढी उभारून करतो. पारंपरिक वेशभूषा करून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतो अन् समवयस्कांना शुभेच्छा देतो. घरी गोडधोड केले जाते. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी नववर्ष स्वागतयात्रा काढल्या जातात. निसर्गही या दिवसांत बहरलेला असतो. 31 डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून नववर्ष साजरे करणे ही खरेतर पाश्चात्यांची कुप्रथा. ही कुप्रथा जोपासून आपणच आपला र्‍हास करून घेत आहोत. आपल्या राज्यातील जनतेला सर्व प्रकारच्या हानिकारक गोष्टींपासून दूर ठेवणे, कुप्रथांना प्रोत्साहन देणार्‍यांना शासन करणे आणि राज्याच्या संस्कृतीचा पुरस्कार करणे, हे राजाचे आद्यकर्तव्य आहे. मात्र, सध्याचे सरकार हा ’राजधर्म’ विसरले आहे की काय, अशी शंका येते. मद्यविक्रीतून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. नाताळ आणि 31 डिसेंबरच्या निमित्ताने यात दरवर्षी विक्रमी वाढ झालेली असते.
राज्य सरकारमधील दोन प्रमुख पक्ष हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे संस्कृतिप्रिय पक्ष आहेत. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीच्या या अवडंबराला विद्यमान सरकारकडून देण्यात येत असलेले प्रोत्साहन मनाला खटकणारे आहे. नशेखोरीला आणि अनैतिकतेला प्रोत्साहन देणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलला मुंबईत परवानगी देऊन सरकारने आधीच जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. आता 31 डिसेंबरच्या रात्रीकरिता मद्यपींसाठी सरकारने पायघड्या घातल्याने हा नक्की छत्रपती शिवरायांचाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न कोणी बाहेरच्यांनी विचारला तर आश्चर्य वाटायला नको.

  – जगन घाणेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *