संपादकीय

थोर स्वातंत्र्यसेनानी वि. दा. सावरकर

‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीतातून मायभूमीचे उत्कट प्रेम दर्शविणारे थोर चतुरस्त्र लेखक, आघाडीचे क्रांतिकारक, क्रियाशील समाजसुधारक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, भाषाशुद्धी व लिपीशुद्धीचे पुरस्कर्ते, असा एक महान माणूस या पृथ्वीतलावर होता नव्हे, तो इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. ज्यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आपल्या मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी जयोस्तुते हे स्वातंत्र्यदेवीचे स्तोत्र लिहिले तेच विनायक दामोदर सावरकर होय.
सावरकर यांचा जन्म भगूर (जि. नाशिक) येथे 28 मे 1883 रोजी झाला. विनायकराव धरून हे चार भावंडे. गणेश म्हणजेच बाबाराव, बहीण मैनाबाई आणि नारायण. साधारणपणे विनायक नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आई राधाबाई यांचे कॉलर्‍यामुळे निधन झाले. आईचे छत्र लवकरच हरपले. दामोदरपंतांनी पत्नी राधाबाईंच्या निधनानंतर चारही मुलांचा सांभाळ केला. मात्र, 1899 ला दामोदरपंतांचेही निधन झाले. विनायक यांनी नाशिक येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विनायक सावरकर हे रामचंद्र त्र्यंंबक चिपळूणकर यांच्या सहकार्याने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात गेले. 1905 मध्ये बी.ए. झाले. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांवर ’केसरी’तून केलेले प्रहार व घणाघाती जहाल भाषणे ऐकली. हीच प्रेरणा घेऊन सावरकरांनी इ.स. 1900 मध्ये ’मित्रमेळा’ नावाची संघटना स्थापन केली. पुढे 1904 मध्ये मित्रमेळा संघटनेचे रूपांतर ’अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेत करण्यात आले. सन 1905 च्या दरम्यान बंगालच्या फाळणीविरुद्ध स्वदेशी बहिष्कराची चळवळ सुरू होऊन पुण्यात गाडीभर विदेशी कपड्यांची संभाजी पुलाजवळ होळी करण्यात आली. याच वेळी लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे व स्वतः सावरकरांची स्फूर्तिदायक भाषणे झाली. सन 1906 मध्ये श्यामजी कृष्णा वर्मा यांची शिष्यवृत्ती घेऊन कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले. लंडनच्या ’इंडिया हाउस’मध्ये भारतीय क्रांतिकारांच्या सभा होऊ लागल्या. या ठिकाणी त्यांना सेनापती बापट, श्यामजी कृष्णा वर्मा, बॅ. राणा, मॅडम कामा, लाला हरदयाळ, मदनलाल धिंग्रा ही सारी मित्रमंडळी भेटली. सर्वांनी एकत्र येऊन क्रांतिकारी कारवाया सुरू केल्या. मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने लंडनमध्ये पिस्तुलाने कर्झन वायलीचा खून केला. याच तरुणांनी ठरविले ’सशस्त्र क्रांतीशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही.’ म्हणून त्यांनी पिस्तूल चालवणे व बॉम्ब तयार करण्याचे तंत्र भारतात पाठवले. याच ठिकाणी ’1857 चे स्वातंत्र्यसमर व इटालियन देशभक्त’ जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र सावरकरांनी लिहिले. त्यामुळे देशात राष्ट्रभक्तीची लाट उसळली. येथूनच या मंडळींनी 1909 मध्ये पुस्तकाच्या पेटीतून भारतात पिस्तुले पाठवली, ज्यामुळे भारतातील क्रांतिकार्याला ताकद व नवीन प्रेरणा मिळाली. कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही विनायक क्रांतिकारक असल्याकारणाने बॅरिस्टरची पदवी देण्याचे लांबविण्यात आले होते.
विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यसैनिकाबरोबरच उत्तम साहित्यिक होते. पुण्यात असताना त्यांनी ’स्वदेशी वस्तू वापरा, देश वाचवा’ ही चळवळ सुरू केली. भारतमुक्तीसाठी त्यांनी आपल्या मित्रांच्या आठवड्याला बैठका भरविल्या. भारतीय थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा केल्या जाऊ लागल्या. त्यांच्यातील लेखक जागृत असल्याने त्यांनी ’भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास’ हे पुस्तक 1908 मध्ये लिहिले; परंतु ब्रिटिश सरकारने या पुस्तकावर क्रांती भडकवणारे असल्याचा आरोप करून या पुस्तक प्रकाशनावर बंदी घातली. त्यावेळी भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांनी याच पुस्तकातून प्रेरणा घेऊन भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला. 1907 मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय सोशालिस्ट काँग्रेस भरली. सावरकरांच्या प्रेरणेने मादाम कामा यांनी भारताचा तीन रंगी स्वतंत्र ध्वज त्यावर ’वंदे मातरम’ हे शब्द लिहून जर्मनीत फडकविला. रशियन क्रांतिकारकडून बॉम्ब तयार करण्याची विद्या साध्य करण्यासाठी हेमचंद्र दास आणि सेनापती बापट यांना फ्रान्सला पाठविण्यात आले.
याचदरम्यान 1909 मध्ये नाशिकमध्ये विनायक यांचे वडील बंधू बाबाराव सावरकर यांना अभिनव भारतच्या मित्रमेळ्यातील देशभक्तिपर गीताबद्दल जन्मठेपेची शिक्षा इंग्रज न्यायाधीशाने सुनावली. याचाच बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने सावरकरांनी पाठवलेल्या पिस्तुलानेच 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला एका नाट्यगृहात गोळ्या झाडून ठार मारले. आरोपी म्हणून सरकारने सावरकरांना पकडले. त्यामुळे पॅरिसला गेलेले सावरकर लंडनला येत असताना त्यांना 13 मार्च 1910 रोजी अटक करण्यात आली व बोटीने हिंदुस्थानात आणले जाऊ लागले. वाटेत फ्रान्समधील मार्सिलिसजवळ त्यांनी बोटीतून समुद्रात उडी मारून फ्रान्सचा किनारा गाठला. मात्र, फ्रेंच पोलिसांनी त्यांना इंग्रजांच्या ताब्यात दिले. त्यांची ही उडी जगप्रसिद्ध ठरली. अखेर सावरकरांना पकडून सरकारने पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. यावेळी सावरकरांचे वय केवळ 27 वर्षांचे होते. सावरकरांनी काळ कोठडीच्या भिंतीवर कोळशांनी महाकाव्य लिहिली. सावरकर 4 जुलै 1911 ला अंदमानच्या तुरुंगात दाखल झाले. त्यांना तुरुंगात अतिशय अमानुष वागणूक देण्यात आली. तेथेही सावरकरांनी संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला. तुरुंगात बंदीजनांसाठी साक्षरतेचे धडे त्यांनी सुरू केले. वाचनालय सुरू केले. कैद्यांना दिल्या जाणार्‍या अमानुष शिक्षा बंद केल्या. याचदरम्यान वल्लभभाई पटेल यांनी 1920 मध्ये सावरकरांच्या सुटकेची मागणी केंद्रीय विधानसभेत केली. यावेळेस टिळक आणि गांधी यांनीही त्यांना संमती दर्शवली. याच कारागृहात त्यांनी शेकडो देशभक्तिपर गीते लिहिली. याच ठिकाणी त्यांनी ’श्रद्धानंद’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. येथेच त्यांनी ’हिंदुत्व’ हे पुस्तक लिहून हिंदुत्वाला वैज्ञानिक बैठक दिली.
2 मे 1921 ला सावरकरांना जहाजाने भारतात आणले. अगोदर त्यांना रत्नागिरीच्या आणि नंतर येरवड्याच्या तुरुंगात धाडण्यात आले. 6 जानेवारी 1924 ला एका अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. ती अट म्हणजे, ’रत्नागिरी न सोडण्याची आणि पुढील पाच वर्षांसाठी कुठल्याही राजकीय चळवळीत भाग न घेण्याची होती’. तेथून सुटका झाल्यानंतर 23 जानेवारी 1924 ला हिंदू महासभेची त्यांनी स्थापना केली. त्यातून त्यांनी टिळकांची राष्ट्रवादी विचारांची परंपरा पुढे चालवली. या संस्थेचा उद्देश ’भारताच्या पुरातन संस्कृतीचे रक्षण करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी सतत काम करणे हा होता’. सावरकरांनी हिंदू राष्ट्रनिर्मिती, राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदू धर्माचे सैनिकीकरण, असा विचार मांडला. हिंदू सणावाराच्या निमित्ताने मुस्लिम व ख्रिश्चन घरांना ते भेटी देत. यातून ते समाजात बंधुभाव निर्माण करू पाहत. अस्पृश्य निवारणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मोलाचे सहकार्य केले. सावरकरांनी 1937 मध्ये हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले. 1940 मध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकरांची ऐतिहासिक भेट झाली. मुस्लिम लीगने चालवलेल्या भारताच्या फाळणीसंदर्भात त्यांनी मुस्लिम लीगला इशारा दिला होता. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. आपण ज्यासाठी झगडलो व संघर्ष केला ते भारताचे स्वातंत्र्य ’याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळाल्याबद्दल त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. नंतर 4 फेब्रुवारी 1948 ला गांधीजींच्या हत्येसंदर्भात पुन्हा त्यांना अटक करण्यात आली. मात्र, स्वतः नथुराम गोडसे व आपटे या दोघांनी गांधीजींच्या हत्येशी सावरकरांचा तीळमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केले. 10 फेब्रुवारी 1950 रोजी सावरकरांची निर्दोष सुटका झाली. 10 मे 1952 रोजी पुण्यातील अभिनव भारत ही संस्था विसर्जित केली. सावरकरांना अ.भा. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही मिळाला होता. सावरकर भविष्याचा वेध घेणारे राष्ट्रपुरुष होते. सावरकरांनी 1962 ला चीन व 1965 मध्ये पाकिस्तान भारतावर आक्रमण करण्याची शक्यता वर्तवली होती ती खरी ठरली. सावरकर नेहमी म्हणायचे ’युद्ध जिंकण्याचा सगळ्यात उत्कृष्ट मार्ग म्हणजे शत्रूच्या भूमीवर लढणे होय’. सावरकरांनी युवकांना स्वदेशावर प्रेम करण्याचा संदेश दिला. अखंड भारतमातेचे स्वप्न पाहणारा युगप्रवर्तक राष्ट्रभक्त 26 फेब्रुवारी 1966 ला काळाच्या पडद्याआड गेला.

Great freedom fighter vs. Dr. Savarkar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

2 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

3 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

3 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

3 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

3 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

3 hours ago