मुंबई : प्रतिनिधी
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात पार पडणार्या भव्य सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता आणखी वेग येणार आहे. या महाआयोजनाच्या नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने गुरुवारी (दि. 10) 1,800 कोटी रुपयांचा भरघोस निधी वितरित करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कुंभमेळ्याच्या कामांसाठी 3,000 कोटी रुपयांची पूरक मागणी मंजूर करण्यात आली होती. त्याच मागणीतील हा शिल्लक निधी आता कुंभमेळा प्राधिकरणाच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून, यामुळे रखडलेल्या विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे.
कुंभमेळ्यासारख्या जागतिक स्तरावरील महोत्सवासाठी पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने शासनाकडून यापूर्वीही टप्प्याटप्प्याने मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांचा आढावा घेतल्यास, ऑक्टोबर 2025 मध्ये 283 कोटी, डिसेंबरमध्ये 717 कोटी, फेब्रुवारी 2026 मध्ये 501.40 कोटी, मे 2026 मध्ये 396.60 कोटी आणि जुलै 2026 मध्ये तब्बल 1,200 कोटी रुपये शासनाने वितरित केले होते. त्यानंतर 2026-27 च्या पावसाळी अधिवेशनात नव्याने मंजूर झालेल्या 3,000 कोटींच्या पूरक मागणीपैकी हा 1,800 कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा आता स्थानिक प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हा हजारो कोटींचा निधी वितरित करताना राज्य सरकारने खर्चावर अत्यंत कडक निर्बंध आणि अटी लागू केल्या आहेत. मिळालेला पैसा केवळ शासनाने आधीच मंजूर केलेल्या विशिष्ट उद्दिष्टांसाठी आणि विकासकामांसाठीच वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.
Green signal for the allocation of ₹1,800 crore in funds for the Simhastha Kumbh Mela.