टवटवीत गुलाब

 

मी काकूंच्या बंगल्यामध्ये खालच्या, मजल्यावरच्या एका रूममध्ये राहत होतो. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा माझा अभ्यास चालू होता. काकूंनी सुरवातीलाच बजावले होते, इथे रहायचे असेल तर अभ्यास नीट करायला पाहिजे हं. तुमचे पालक तुमच्यासाठी खूप कष्ट करतात. त्याच चीज करा.
काकूंचा बंगला, बंगल्याभोवतीची बाग फारच सुरेख. किती तरी वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलझाडे. फारच प्रसन्न वाटायचं बागेत फेरफटका मारताना. रूममध्ये बसून अभ्यास करायचा कंटाळा आला की, कधी बागेतल्या झोक्यावर तर कधी लॉनवर बसून अभ्यास करत बसे. मला काका-काकू कुणीच रागवत नसत.

मीही सकाळी लवकर आवरून कॉलेज, क्लास, जेवण आटोपून रात्री आठ-साडेआठला परतत असे.सकाळी निघताना बागेतून हळूच एक गुलाबाचे फूल तोडून नेत असे आणि माझी मैत्रीण लीना हिला देत असे. ती मला याबद्दल एक-दोनदा रागावलीही, पण मी तिला म्हटले, अगं काकूंच्या बागेत एवढी फुले आहेत, मी एक तोडले तर त्यांना कळणार पण नाही. मी दिलेले फूल ती थोडे नाखुशीनेच स्वीकारत असे.

आता परीक्षा जवळ आल्याने माझे कॉलेज, क्लास बंद होते. त्यामुळे रूमवर बसून माझा अभ्यास सुरू होता. बाहेर झाडण्याचा आवाज आला म्हणून खिडकीतून डोकावले तर काकू झाडलोट करत होत्या. थोडे पाय मोकळे करण्यासाठी बागेत गेलो तर काकू आता झाडांना पाणी घालत होत्या. मृदगंधाच्या वासाने मन खूप प्रफुल्लित झाले. मला पाहताच काकूंनी माझी चौकशी केली, अभ्यासाबद्दल विचारपूस केली आणि त्यांनी मला विचारले, बागेतील गुलाबाचं फूल तोडताना कुणाला पाहिलंयस का रे? मी त्यांना म्हणालो, मला काही माहीत नाही बुवा आणि मी रूमवर अभ्यासासाठी परतलो. आता मला माझे मन शांत बसू देत नव्हते. मी काकूंना खरे खरे सांगायला पाहिजे होते. पण माझा धीर झाला नाही. बागेत काकू /सत्तरीची बाई एवढे कष्ट घेतेय हे पाहून मला ओशाळल्यासारखे झाले होते. दुसर्‍या दिवसापासून फूल न तोडण्याचा मी निर्णय घेतला होता.

पुढे चार दिवसांनी माझा वाढदिवस होता, मी पाच-सहा गुलाबाची रोपे आणली आणि काकूंकडे जाऊन म्हणालो, काकू आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी ही काही रोपे आणली आहेत, तुमच्या हातून मला ती आपल्या बागेत लावायची आहेत. माझा आविर्भाव पाहून काकू खूप खुश झाल्या. लगेच आमचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. काकू म्हटल्या, फूल तोडणं सोपं असतं पण रोप लावून त्याची निगा राखणंं अवघड असतं, झाडांना सुद्धा जीव लावावा लागतो बरं.

हे ही वाचा :  मनाच्या आकाशाला मर्यादा नाहीत

माझी परीक्षा होऊन मी चांगल्या मार्क्सने इंजिनिअर झाले अन् पुढे नोकरीनिमित्ताने मुंबईला निघून गेलो. मध्ये चार-पाच वर्षे गेल्यानंतर एक दिवस मी लीनाला घेऊन काकूंकडे गेलो. काकूंना म्हणालो, काकू तुमच्याकडचं फूल तोडून मी रोज हिला फूल देत होतो आणि त्या फुलांनीच मी हिला जिंकून घेतले. आमची आता एंगेजमेंट आहे या रविवारी, त्याचं तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे. काकू म्हणाल्या, वा वा छानच, छान जोडी आहे हो. आम्ही जोडीने नमस्कार करताच काकू म्हणाल्या, तिला आपल्या गुलाबासारखे टवटवीत ठेव हो, कधीही कोमेजू देऊ नकोस.
काकूंचा आशीर्वाद घेऊन आज माझं मन मोकळं झालं होतं आणि लीनाला गुलाबासारखं टवटवीत ठेवण्याचं काकूंना वचन देऊन प्रसन्न मनानं घरी परतलो.

पुष्पा गोटखिंडीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *