डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732.
गेल्या महिनाभरापासून तुम्ही H3N2 हे नाव ऐकलं असेल. याबद्दल तुम्ही उलट सुलट ऐकलंही असेल. मला अनेकांनी विचारलं “डॉक्टर साहेब, हे काय आहे आता नवीन. पुन्हा नवीन आजार आणि पुन्हा नवीन महामारी आहे का ही? खूप घाबरण्यासारखं आहे का? काय काळजी घ्यावी आम्ही? आणि खरंच हा आजार आहे का?” असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहे. जिकडे तिकडे हीच चर्चा ऐकायला मिळते. टीव्ही वर, पेपर मध्ये, व्हाट्सअप्प वर, डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटल्सच्या पोस्ट्स मध्ये याबद्दल खूप काही बोललं जात आहे. मी तर सर्वांना हेच सांगतोय “काही काळजी करू नका. घाबरू तर अजिबातच नका. असं कोरोनासारखं काहीही होणार नाही.” हो, तुम्ही जे वाचताय तेच मी लोकांना सांगतोय. हा काही नवीन आजार नाहीए. जुनाच व्हायरस आहे, जो नवीन रूप धारण करून आलेला आहे. तुम्ही म्हणाल की मग, एव्हढी चर्चा का होतेय, एव्हढी खबरदारी आणि एव्हढी भीती का पसरवली जातेय?
आपल्याकडे पूर्वीपासून फ्लू नावाचा आजर होता, आहे आणि भविष्यातही राहणार आहे. हा आजार इन्फ्लुएन्झा नावाच्या व्हायरस मुळे होतो. याचे मूळ चर्चा प्रकार आहेत, Influenza A, B, C आणि D. यातला पहिला Influenza A जो प्रकार आहे, त्याच्याच नवीन व्हेरिएंट ला H3N2 असे नामकरण केले आहे. मुळात हा व्हायरस पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये आजार निर्माण करतात. माणसांमध्ये हा व्हायरस फ्लू सारखेच लक्षणे निर्माण करतो. यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, अंग दुखणे, सांधे दुखणे असे लक्षणे दिसून येतात. एक किव्हा दोन आठवडे लक्षणे दिसतात, आणि हळू हळू ते कमी होत जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केला, तर हा आजार पूर्ण बरा होणारा आहे. त्यामुळे, खूप घाबरण्यासारखे काहीही नाही, भीती बाळण्याची आणि पॅनिक होण्याची तर अजिबातच गरज नाही. कुणी काहीही म्हणो, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. टीव्ही वर, पेपर मध्ये किव्हा सोशल मीडियावर याबद्दलच्या बातम्यांना फारसं महत्व देऊ नका. हो, हेच करा.
वास्तविक बघता, हा व्हायरस काही नवीन नाहीए. १९६८ मध्ये या व्हायरस मुळे सर्दी खोकला आणि तापाची साथ आलेली होती. ती आपल्याकडे फारशी पसरली नव्हती. अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये या व्हायरसने खूप उपद्रव मांडला होता. जगभरात दहा लाखाहून अधिक तर फक्त अमेरिकेत एक लाख लोक या आजाराला बळी पडले होते. ६० आणि ७० च्या दशकात जन्मलेल्या लोकांना लहानपणी या व्हायरस मुळे फ्लू सदृश आजार होऊन गेला असेल. आता ५० वर्षांनंतर हा व्हायरस पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहतोय.
त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीत फरक आहे. एकतर, तेव्हा व्हायरस बद्दल फारशी माहिती आणि संशोधन झालेले नव्हते. अँटी व्हायरल औषधे उपलब्ध नव्हते. इन्फ्लुएन्झा व्हायरस ची लस उपलब्ध नव्हती. कोरोनाही नव्हता. आता आपल्याला व्हायरसबद्दल चांगली माहिती झालेली आहे, खूप संशोधनातून हेही कळतं की व्हायरसचा स्ट्रेन कुठला आहे. अनेक औषधे उपलब्ध आहेत. त्यात भर म्हणून, आपण कोरोनाही झुंज दिलेली आहे. त्यातून आपल्याला व्हायरसच्या विरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. कोरोना नसेल झाला तरी, कोरोणाची लस घेतल्यामुळे कृत्रिम प्रतिकारशक्ती तयार केलेली आहे.
इतकं सगळं असतांना घाबरायचं काही कारण नाहीए. हा, काळजी अवश्य घ्यावी. स्वतःला जपायला तर हवंच ना. अगदी निश्चिन्त, निष्काळजीपणा नसावा. बेफिकिर आणि बेसावध राहू नका. कोरोणाच्या वेळी जी सावधानी बाळगली ती लक्षात असू द्या. साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, जावं लागलंच तर मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठवणे, चेहऱ्याला हात न लावणे… अशी काळजी घ्यावी. सर्वसाधारण निरोगी लोकांना फारसे काही होणार नाही. परंतु ज्यांना दमा, डायबेटीस, हृदय विकार, कॅन्सर, किव्हा प्रतिकारशक्ती खालवणारे इतर काही आजार, किव्हा मेंदूचे काही विकार असल्यास विशेष खबरदारी घ्यावी.
वर नमूद केलेल्या लक्षणांच्या व्यतिरिक डोके दुखणे, मळमळ होणे, उलट्या होणे, पोट दुखून जुलाब होणे, चक्कर येणे असे काही होत असेल तर त्यात धोका असू शकतो. लक्षणांकडे दुर्लक्ष तर अजिबात करू नका. डॉक्टरांना भेटा, सांगा, विचारा आणि त्यांच्या सल्ल्याने उपचार करून घ्या. हे सगळं जर टाळायचं असेल तर आहारावर आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्या.
सकस आहार घ्या, फळ, फळभाज्या, प्रोटिन्स मुबलक प्रमाणात घ्या. बाहेरचे अन्न खायचे टाळा, घरी शिजवलेलं सर्वात उत्तम. लक्षणं असलेल्या लोकांना भेटणं टाळा. संपर्क आलाच तर कोमट पाणी आणि वाफ घ्या. त्या व्यतिरिक्त भरपूर पाणी प्यावा. आपले हायड्रेशन उत्तम ठेवा. या प्रकारे आपली स्वतःची आणि आपल्या जिवाभावाच्या लोकांची काळजी घेतली तर, कोरोना, डेल्टा, ओमीक्रॉन, इन्फ्लुएन्झा H3N2 सारखे कुठलेही व्हायरस येवो, काहीच घाबरण्याची गरज नाही. माझं म्हणणं पटलं असेल, तर ही माहिती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता, इतरांना पाठवा. आजारांच्या विरोधातील लढ्यात साथ द्या, ही विनंती…!
ReplyForward
|
Very nice