सिन्नर फाट्यावर गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार जेरबंद

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने सिन्नर फाटा परिसरातून अटक केली. भारत उर्फ सोनू मनोहर चावरे (34, रा. नंदावननगर, पिंपळगाव नजीक, ता. निफाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील अवैध अग्निशस्त्रांची विक्री व वापर करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड गुन्हे शोध पथक गस्त घालत होते.
दरम्यान, पोलीस अंमलदार समाधान वाजे व दीपक दिवटे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम सिन्नर फाटा परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचला. संशयित इसम पोलिसांच्या निदर्शनास येताच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
हा मुद्देमाल जप्त करून संशयिताविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत उर्फ सोनू चावरे हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात काही दिवसांपासून फरार असल्याचे तपासात समोर आले आहे.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शस्त्र विक्रीच्या उद्देशाने तो आल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भामरे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, भुवनेश्वर घनदाट व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन भामरे, विशाल कुंवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे व दीपक दिवटे यांच्या पथकाने केली.

Habitual criminal apprehended with a country-made pistol at Sinnar Phata.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *