डॉ. संजय धुर्जड.*
अस्थिरोग तज्ञ,
नाशिक.
9822457732
३० जानेवारी १९४८, स्वातंत्र्य मिळून काही महिनेच झालेले. दिडशे वर्षे अंधकारमय गुलामगिरीत घालवल्यानंतर कुठेतरी १९४७ च्या उत्तरार्धात भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात यश आले. १५ ऑगस्ट १९४७ च्या आधीच्या पाच-सहा महिन्यात भारताने अभूतपूर्व विनाशकारी कलह बघितला होता. देशाचे विभाजन केले जाणार होते. देशात दंगे, जीवघेणी हाणामारी, कत्तली, जाळपोळ, नासधूस असे प्रकार सर्रास घडत होते. अराजकता पसरली होती, असे म्हणायला हरकत नाही.
शेवटी १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला, आणि असे वाटले की आता सर्वकाही ठीक होणार आहे. तत्कालीन जनतेला वाटलं असेल की चला, आता १९४८ साली नवे पर्व सुरू होऊन, देशाला तसेच प्रत्येक नागरिकाला मुक्त श्वास घेण्याची वेळ आली आहे. तसे त्यावेळच्या नेत्यांनी प्रयत्नही केले, त्यांना त्यात यशही आले. देशाची गाडी रुळावर येणार असे वाटत असतांना पुढील सहाच महिन्यात, म्हणजे ३० जानेवारी १९४८ या दिवशी देशाच्या इतिहासातील एक विलक्षण दुःखद घटना घडली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. आज त्या घटनेला ७५ वर्षे झालीत, परंतु त्याचे पडसाद आजही उमटतांना दिसतायेत, तसेच देशाचे आणि जगाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. आज गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनातून मी घेतलेल्या शिकवणींची आपल्यासमोर मांडणी करत आहे.
गांधीजींबद्दल देशात वेगवेगळे मत, विचार आणि प्रभाव आहे. त्यांनी काय केले, काय नाही केले, काय करायला हवे होते, काय बरोबर होते अन काय चुकले, त्यात वेगळे काय करू शकले असते, ते सध्या कुठल्या पक्षाचे प्रणेते आहेत… वगैरे वगैरे. असे अनेक विषयांवर जनतेचे भिन्नभिन्न विचार आणि मत आहे. मला यात काही रस नाही, ना ही मी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. मी असे मानतो की या जगी देव सोडला, तर कुणीही परफेक्ट नाही. प्रत्येकात काही चांगले तर काही वाईट गुण असतात.
एखाद्याच्या वाईट गुणांबद्दल, त्याच्या चुकांबाबत, त्याच्या बद्दलच्या नकारात्मक बाजूंवर विचार आणि चर्चा करण्यात आपली मानसिकता खराब करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या चांगल्या, उजव्या, सकारात्मक, विधायक, आणि तुम्हाला फायदेशीर असलेले गुण अंगिकारले, तर निश्चितच तुमची प्रगती होऊन तुम्ही यशस्वीतेकडे वाटचाल कराल. भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, आचार्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याच पंक्तीत असलेले गांधीजी व त्यांच्या कार्य आणि विचारांचा प्रभाव माझ्या विचारांवर आणि जीवनावर झालेला आहे.
एक सत्य आपल्याला मान्य करावेच लागेल. आजवरच्या मानव जातीच्या आणि भारताच्या इतिहासातील दोन भारतीय वंशाच्या व्यक्तींना जगाने मान्यता दिली आहे, त्यांची श्रेष्ठता मान्य केली आहे. पाहिले, तथागत भगवान गौतम बुद्ध, आणि दुसरे महात्मा गांधी. बाकीचे सर्वच महापुरुषांना कमी अधिक प्रमाणात मान्यता असेल ही, किव्हा जगाच्या ठराविक भागात त्यांचा प्रभाव आहे. परुंतु, या दोन महान आत्म्यांना जगातील सर्वकालीन महान समजले जाते. त्यांनी जगाला दिलेले विचार, दिशा आणि मार्ग यामुळे मानवजीवन बदलून गेले आहे. गांधीजींनी जगाला काय दिले, असा तुमचा प्रश्न असेल, नाही का ? विचार करा, एक सामान्य व्यक्ती परंतु त्याकाळचे उच्च शिक्षित नागरिक. प्रतिष्ठा आणि स्वाभिमान असणे स्वाभाविक होते.
कुठेतरी परदेशात एका प्रवासादरम्यान केवळ एक भारतीय आणि कृष्णवर्णीय असल्यामुळे अपमानित व्हावं लागलं. इतर कुठल्याही व्यक्तीने तो अपमान पचवलाही असता, किव्हा त्यांनाही तो पचवता आला असता, कारण त्याकाळी एकट्यात बंड, क्रांती किव्हा तत्सम कारवाई करण्यासारखे काही नव्हतेच. परंतु, आता आपल्याला यासाठी काहीतरी करावे लागेल, म्हणून चांगला चाललेला व्यवसाय सोडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उर्वरित आयुष्य पणाला लावणे, ही सामान्य बाब नाही.
तुम्ही म्हणाल, यात काय विशेष आहे. त्याकाळच्या सर्वच स्वातंत्र्य सेनानींनी असेच केले होते. हो, बरोबर आहे तुमचे म्हणणे. ज्या साम्राज्यावर तेजोमयी सूर्याचा कधी अस्त होऊच शकत नाही, अशी बिरुदावली लागलेल्या साम्राज्याला अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करून, गुढघे टेकवायला लावलेल्या व्यक्तीच्या विचारांना आणि त्याच्या भूमिकेला नमन करावंच लागेल. विशेषतः, अशी व्यक्ती जो कुठला राजा नाही, त्याकडे कुठले राज्य नव्हते,
कुठल्या राज परिवारातील नव्हता, कुठलाही राजकीय वारसा नव्हता, कुठली ही सेना नाही अन सेनापतीही नाही, शस्त्र नाही, शस्त्र घेण्यासाठी पैसा नाही. असते तरी शस्त्र न वापरता, कुठल्याही प्रकाराचा प्रतिकार न करता, शांतीच्या मार्गाने आपल्याला जे साधायचे आहे, ते आपण साध्य करू शकतो, एका साम्राज्याला शह देऊ शकतो, रक्ताचा एक थेंबही न वाहता युद्ध जिंकू शकतो, असे ज्या व्यक्तीने करून दाखवले, जगाला शिकविले अशा महान आत्म्याने तत्कालीन वीस कोटी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले, ही कुठल्याही अर्थी सामान्य गोष्ट नाही. अंगावरील कपड्यांपासून ते सर्वच मोहक गोष्टींचा त्याग करून, एखादया कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले की आपसूकच महात्म्य प्राप्त होते, हे मला त्यांच्या जीवनातून शिकायला मिळाले.
जुन्या जाणत्या व आपल्या आधीच्या पिढीतील जनतेसाठी गांधीजी म्हणजे एक विचार, एक मानसिकता, एक तत्वज्ञान, एक मार्ग, एक जीवनशैली. बापू म्हंटले की लोकांच्या नसांत ऊर्जा संचारायची. गरीब आणि समाजातील मागासलेल्या घटकांना मूळ प्रवाहात आणण्याचे बाबासाहेबांनंतर त्यांचेच कार्य महान म्हणावे. सत्य आणि अहिंसा, हे दोन तात्विक स्तंभ. प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ठ कार्यशैली असते. गांधीजींचीही होती, जशी त्यांनी जगासमोर मांडली.
अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या आधारावर, सत्याचाच आग्रह धरणे (सत्याग्रह), मौन व्रत, उपोषण, जेल भरो, असहकार, पदयात्रा अशा विभिन्न पद्धतीने आंदोलने करून देश एकवटवला, स्वाभिमान आणि आशावाद जागृत केला, नंतर तो पेटवला. लोकांना स्वातंत्र्याचे दिवस दिसू लागले, आणि आता करू किव्हा मरु या विचाराने पेटलेल्या जनतेने स्वातंत्र्य मिळवलेच. सर्वच लोक किव्हा पक्ष गांधीजींच्या विचारांशी सहमत होते असे नाही. त्यात वेगळा विचार करणारे होते, वेगळ्या मार्गाचा अवलंब करून स्वातंत्र्य मिळवता येईल, अशाही विचारांचे होते. गांधीजींनी जे काही केलं ते चुकीचं आहे,
असे मानणारे लोकही होतेच. तत्कालीन परिस्थितीत जाती आणि धर्माच्या नावाखाली वैचारिक, तात्विक आणि सामाजिक विभाजन होते. तरीही, इतक्या मोठ्या देशाला एकछत्र सरकार देणं, खंबीर आणि सर्वमान्य नेतृत्व देणं, हाती आलेला देश सुरळीतपणे चालवणे, सर्वच आघाड्यांवर बिकट परिस्थिती असतांना देश चालवणे सोपे नव्हते. त्यावेळी जे योग्य वाटले, देशाच्या सर्वोच्च हिताचे वाटले, समकालीन इतर नेत्यांच्या आग्रहास्तव करू वाटले, असे त्यांनी केले. ज्यांना मान्य नव्हते, त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली असती, निषेध नोंदवला असता, विरोध ही केला असता किव्हा संवादातून सर्वमान्य मार्ग काढता आला असता. ज्या तत्वांचा त्यांनी जीवनात परित्याग केला, त्याच हिंस्त्र मार्गाने त्यांच्या जीवनाचा अंत झाला, हे आपले, आपल्या देशाचे आणि एकंदरीत मानव जातीचे अमर्याद नुकसान झाले आहे.
त्यांच्या जाण्याच्या ७५ वर्षांनंतर आजही त्यांना भारतातच नव्हे तर जगभर आदराने बघितले जाते. परंतु, गेल्या काही दशकांपासून आपल्या देशात सर्व साधू, संत, महात्मे, नेते, अभिनेते, एव्हढंच नव्हे तर स्वातंत्र्य सेनानी, देवदेवता ही त्या त्या समाजाने, त्या त्या राजकीय पक्षाने, त्या त्या प्रादेशिक समूहाने आपापल्या नावाची मोहोर लावून जणू आपल्या नावे केले आहे. यात बापूंनाही सोडले नाही. त्यांच्या नावाने आजही देश, पक्ष आणि परिवार चालवले जातात. त्यामुळे विरोधक त्याचा अपप्रचार करून त्यांच्या नावाला एखाद्या समूहाचे प्रतीक म्हणून मानायला लागले.
त्याचा अप्रत्यक्ष विरोध करू लागले. त्यांच्या मारेकऱ्यांच्या विचारांशी सहमत असलेले लोक बापू कसे चुकले, आणि मारणारे कसे उजवे आहेत, यावर वाद निर्माण करू लागले. परंतु, शेवटी हत्या ही हत्याच असते. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. प्रत्येक जण चुकतो, आणि जबाबदार पदावर काम करणाऱ्याला अनेक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. म्हणून ते निर्णय सर्वमान्य असणेही शक्य नाही. एखादा समूह नाराज होणार आहे, हे लक्षात घ्यावे. आपल्याला निर्णय अथवा विचार नाहीच पटले, तर त्यातून मार्ग काढण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यादृष्टीने विचार करून आपल्याला जे हवं आहे, ते करून घ्यावे, असा एक साधा विचार आणि बोध आजच्या या गांधी पुण्यतिथी निमित्त आपण शिकलो, तरी मला असं वाटतं की बापूंना पुन्हा *हे राम* म्हणण्याची वेळ येणार नाही.