टाय-अप लई भारी, पालकांचा खिसा रिकामा करी!

नाशिक ः देवयानी सोनार

महाविद्यालयांपेक्षा टाय -अप म्हणजेच क्लास संलग्न महाविद्यालयांना पालकांची विशेषत: पाल्यांची मोठी पसंती मिळत आहे. मात्र, त्यासाठी पन्नास हजारांपासून तर लाखांपर्यंतचे शुल्क आकारले जात आहे. शहराबाहेर असलेल्या क्लास संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदाच घेऊन जात आपलाच क्लास कसा भारी, हे पटवून दिले जात आहे. मात्र, टाय-अप लई भारी असले तरी पालकांचा खिसा रिकामा करी! असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे टाय-अपमुळे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे मुश्कील होणार असल्याचे चित्र आहे.
संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍यांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयाशी टाय-अप संलग्न असलेल्या क्लासेसला पसंती दिली जात आहे. भरमसाट फी, महाविद्यालयासारखे तास, प्रात्यक्षिकासाठी केवळ महाविद्यालयात जावे लागणे, अंतर्गत गुण अशा विविध कारणांसाठी अशा क्लासेसची निवड केली जात आहे.
अलीकडील काही वर्षांपासूनची टाय-अप क्लासेसचे फॅड वाढत आहे. 11 वी, 12 वी विशेष करून सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ठराविक कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आणि कॉलेजमध्ये प्रत्यक्ष रेग्युलर दररोजच्या लेक्चर्सला हजर न राहता, ज्या क्लासशी त्या कॉलेजचे टाय-अप आहे तेथे लेक्चर्स करायचे व कॉलेजला फक्त प्रॅक्टिकल्सला जायचे, अशी ही पद्धत आहे. परंतु, यामध्ये विद्यार्थ्यांची व पालकांची मोठी कुचंबणा होते. ते समजायला खूप उशीर होतो, तोपर्यंत सर्व फी भरलेली गेलेली असते.
दहावी निकालानंतर पुढील प्रवेशासाठी महाविद्यालय संलग्न क्लास किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतला जातो. अनेकांना केवळ महाविद्यालयात प्रवेश घेऊन वेगळा क्लास लावला जातो. विशेषतः विज्ञान क्षेत्रासाठी महाविद्यालयाशी संलग्न असणारे क्लासेस निवडले जातात. संलग्न असलेल्या क्लासेसमध्ये मार्काचे आमिष तसेच पुढे करिअरच्या दृष्टीने प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम करून घेण्यात येतो. प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयात नेले जाते. सी.ई.टी. किंवा जेईई परीक्षेसाठी वेगळे क्रॅश कोर्सही उपलब्ध केले जातात.
शैक्षणिक स्पर्धेत आपले पाल्य कुठेही कमी राहू नये किंवा लवकरात लवकर रोजगार किंवा नोकरी कशी मिळेल यासाठी विज्ञान क्षेत्राची निवड अधिक होत असल्याचे चित्र आहे. विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि फार्मसीसह अनेक संधी उपलब्ध असल्याने या शाखांकडे कल वाढला आहे.
शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी शहर किंवा उपनगरांत महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या नामांकित क्लासेचा दहावीच्या निकालापूर्वीच शोध घेतात. टक्केवारी चांगली असलेल्या मुलांना नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश सहज मिळतो. कमी टक्के असलेल्या मुलांना हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी साधारण महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या क्लासेसची निवड करतात.
गेल्या काही वर्षांत महाविद्यालयाशी संलग्न क्लासेसला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे महाविद्यालयात डिलिजंट बॅच सुरू करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसादही मिळत असल्याचे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सांगितले. मात्र, या डिलिजंट बॅचसाठी विद्यार्थ्यार्ंना कोणतीही सक्ती केली जात नाही.

शिक्षण विभागाचा कानाडोळा
शहरात टाय-अपचे मोठे फॅड आले असताना शिक्षण विभागाचा मात्र याकडे कानाडोळा होत आहे. खासगी शाळांमुळे महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांकडे जशी विद्यार्थी आणि पालकांनी पाठ फिरवली तशी गत आता काही दिवसांनी महाविद्यालयांची होणार असून, महाविद्यालयांना विद्यार्थीही मिळणे मुश्कील होणार आहे.
पॅकेज पद्धती
टाय-अपच्या संचालकांनी सर्रासपणे पॅकेज पद्धतीचा अवलंब केला आहे. अकरावीची फी भरा, त्यात नीट, जेईई, सीईटी पण शिकविली जाईल, असे आमिष दाखविले जात आहे. त्यासाठी फक्त खिसा हलका करण्याची मानसिकता असायला हवी, पीसीएमबी, पीसीएम असे दोन ग्रुप करून पॅकेज दिले जात आहे. हे पॅकेज पन्नास हजारांपासून पुढे आहे.

महाविद्यालयांकडे पाठ
प्रत्येकाचा ओढा हा क्लास संलग्न महाविद्यालयांकडे असल्याने शहरातील अनेक कॉलेजकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अनेक विद्यार्थी टाय-अप घेण्याकडेच आकृष्ट झाल्यामुळे भाग एक फॉर्म भरण्याचीही तसदी घेत नाही.

संघटनेचा विरोध!
संघटना हे मानते की, कॉलेजमधील लेक्चर्स कॉलेजमध्येच व्हावेत कारण कॉलेजला सरकार मान्यता देते व कॉलेज वेळेव्यतिरिक्त क्लासेस घ्यावेत. दोन्ही शिक्षकांच्या अध्यापनात फरक पडतो व विद्यार्थ्यांची दोनदा रिव्हिजन होते. टाय-अप क्लासेसमुळे कॉलेजच्या विद्यार्थी संख्येवर परिणाम होतो. क्लासेस घेणार्‍या संचालकांनाही याचा फटका बसतो. या पद्धतीस संघटनेचा विरोध आहे.
– जयंत मुळे, अध्यक्ष, जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *