नाशिक : प्रतिनिधी
शीला जोशी यांच्या ‘प्रेमसागर’ कथासंग्रहातील लेखन स्वानुभवावर आधारित असून, त्यातील निरागसता मनाला भावली. जुन्या पिढीतील स्मरण रंजन व कौटुंबिकता वाचकांना आवडेल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले. ‘प्रेमसागर’ या कथा व ललित लेख संग्रहाचे प्रकाशन प्रा. भार्गवे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सतीश कुलकर्णी, लेखिका शीला जोशी, प्रकाशक पद्माकर देशपांडे, प्रा.पी.के. कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कौटुंबिक सोहळ्यातील सहभागाबद्दल अभिनंदन करून भावी काळात लेखिका चालू काळातील घडामोडींवर चिंतन करतील, अशी अपेक्षा प्रा भार्गवे यांनी व्यक्त केली. दीपक रत्नपारखी यांनी लेखिकेचा परिचय करून दिला. शैलेश जोशी यांनी प्रास्ताविक केले तर शलाका दहाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास हरिभाऊ कुलकर्णी, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, कवी उल्हास गायधनी, राजेश कुलकर्णी यांच्यासह चांदवड मर्चंट बँक अध्यक्ष अशोक व्यवहारे व नागरिक उपस्थित होते.