मुंबई :
राज्यभरात सोमवारी (दि. 14) गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळत असताना पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. मुंबई ठाणे, कोकणापासून ते विदर्भापर्यंत अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहे. कुठे रस्ते जलमय झाले, कुठे गणेश मंडपामध्ये पाणी शिरले, तर विदर्भ मराठवाड्यामध्ये याच पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने पावसाचे सावट असले, तरी बळीराजासाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने उकड्यापासून हैराण नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही बरसणार
जळगाव, नाशिक, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील काही भागांतही मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40-50 किमी वेगाच्या सोसाट्याच्या वार्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशीम यांसारख्या भागांतही अशाच प्रकारचा मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला होता.
Heavy rain warning for the state.