रविवारी पहिने बारीत पर्यटकांची वारी
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सतत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील निसर्ग पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरून गेली आहेत. दुगारवाडी धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव बंद केल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा पहिने बारीतील प्रसिद्ध नेकलेस धबधब्याकडे वळवला आहे. रविवारी नाशिक-त्र्यंबक रस्ता आणि पहिने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
हिरवीगार निसर्गसृष्टी, डोंगरावर पसरलेली धुक्याची चादर आणि अंगावर येणार्या पावसाच्या सरींचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक दाखल झाले होते. गरमागरम मक्याचे कणीस आणि मॅगीवर ताव मारत पर्यटकांनी रविवारची सुट्टी साजरी केली. मात्र, नाशिक-त्र्यंबक रस्त्याची एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने आणि चिखलामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागली.
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी होत असली तरी काही हुल्लडबाजांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. धोकादायक जलप्रवाहात उतरून सेल्फी घेणे, बेदरकारपणे वाहने चालवणे, तसेच वादावादी करून मारहाण करण्याच्या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. संध्याकाळी शेतातून घरी परतणार्या ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, महिलांची छेडछाड आणि असभ्य वर्तनामुळे पहिने परिसराची शांतता धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने या हुल्लडबाजांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Heavy rains boost tourism