*
डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
अपघात टाळण्यासाठीच्या उपायांवर चर्चा करत आहोत. मागील भागात काही मुद्द्यांवर आपण चर्चा केली होती. आज आणखी काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत.
६. गाडीवर ताबा असावा.
गाडीवर ताबा ठेवण्यासाठी प्रथम तर आपला आपल्या स्वतःवर ताबा असावा. आपण स्वतः किव्हा आपला ड्राइवर गाडी चालवत असतांना सर्वप्रथम सर्वांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक करावे. ड्राइवर ने सीट बेल्ट लावलेला असला तर तो त्याच्या सीट मध्ये स्थिर रहातो. अपघात घडतांना त्याला गाडीवर ताबा ठेवणे अधिक सुलभ होते. त्याचे दोन्ही हात स्टीयरिंग वर असावे. स्टीयरिंगला घडळाच्या डायल नुसार १० आणि २ आकड्यांच्या ठिकाणी दोन्ही हातांनी स्टीयरिंग धरावी.
असे केल्याने स्टीयरिंगवर संपूर्णपणे ताबा रहातो. तसेच गाडीतील इतर प्रवाशांनी देखील सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. अपघात झालाच तर शेजारील किव्हा मागील सहप्रवासी ड्रायव्हरच्या अंगावर धडकल्याने ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटू शकतो, आणि अपघात जास्त भीषण होऊ शकतो. सीट बेल्ट लावल्याने एअर बॅग्स देखील उपयुक्त ठरतात, कारण तुम्ही सीट बेल्टने बांधलेले असाल, तर तुम्ही एअर बॅग वर धडकाल. अन्यथा तुम्ही गाडीच्या बाहेर किव्हा इतरत्र फेकले जाल. यासाठी सीट बेल्ट अत्यावश्यक आहे.
७. सूचना फलक पाळावे.
कुठल्याही मार्गावर आणि महामार्गांवर काही सूचना फलक लावलेले असतात. जिथे अपघात होण्याची शक्यता असते, तिथे अपघातप्रवन क्षेत्र, वन्य प्राण्यांचा वावर असेल तर तसे फलक असतात, तसेच स्पीड ब्रेकर, अपघाती वळण, नो ओवरटेकिंग, स्पीड लिमिट, खोल दरी, दरड कोसळीची शक्यता असे विविध सूचना फलक लावलेले असतात. त्याच प्रमाणे समृद्धी महामार्गावर नियमित अंतरावर स्पष्ट फलक लावलेले आहेत, उदा. दोन गाड्यांमधील अंतर २०० मीटर असावे, स्पीड लिमिट, एक्झिट पॉईंट चे अंतर, तसेच दर २०० मीटरवर रस्त्याच्या बाजूला माईलस्टोन फलक आहेत. या सर्व फलकांचे पालन होणे अपेक्षित आहे. असे केल्याने आपलाच जीव सुरक्षित राहणार आहे, हे स्मरणात असावे.
८. विनापरवाना गाडी चालवू नये.
आम रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी परवाना (लायसन्स) असणे गरजेचे असते, तसेच महामार्गावर गाडी चालवण्यासाठी विशेष परवाना असणे गरजेचे असते. समृद्धी महामार्गासारख्या रस्त्यांवर आणि काही विशिष्ट उड्डाणपुलांवर दुचाकी, तीन चाकी वाहने, हातगाडा, बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रिलर व तत्सम वाहने चालविण्यास मनाई आहे. असे असतांना आपण बंदी असलेल्या वाहनांनी या महामार्गावर प्रवास केला तर, आपल्याच नव्हे, तर त्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनाही अपघाताची शक्यता असते, जीवाला धोका असतो.
मोठ्या गाड्यांचा वेग पाहता या महामार्गावर असे वाहने चालवण्यास बंदी आहे. मात्र असे असतांना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकीस्वार प्रवास करतांना पाहायला मिळतात. अचानक दुचाकी समोर आल्यावर वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड होते. म्हणून अशा गोष्टी टाळाव्या.
९. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी टाळाव्या.
गाडी चालवतांना गाणी ऐकणे, व्हीडिओ किव्हा मूव्ही बघणे, गप्पा मारणे, चर्चा करणे, चेष्टा मस्करी करणे, मोबाईल वर बोलणे किव्हा मोबाईल बघणे, चालू गाडीत मोबाईल मध्ये फोटो काढणे, सेल्फी काढणे, व्हीडिओ शूटिंग करणे हे अतिशय घातक ठरू शकते. मोकळा रस्ता असल्यामुळे महामार्गावर अशा प्रकारे आपले लक्ष विचलित होणे स्वाभाविक आहे. त्यातही समृद्धी महामार्गासारख्या रस्त्यावर एखादा व्यक्ती निर्धास्त होऊन गाडी चालवतो, आणि इतर बाबतीत त्याचे लक्ष विचलित होऊ शकते. बेसावध असतांना अचानक काही घडल्यास त्यातून स्वतःला आणि गाडीला सावरणे अवघड होते.
न घडणारे आणि टकणारे अपघात घडतात. गाणी ऐकण्यापूरते ठीक असते, परंतु TV, व्हीडिओ, मोबाईल बघणे तर अत्यंत धोकेदायक आहे. मित्र मंडळींसोबत फिरायला जात असाल तर काय ती चेष्टा मस्करी गाडीच्या बाहेर, चालू गाडीत अजिबात नाही, हा नियम असू द्या. दुसरे अत्यंत महत्वाचे म्हणजे ड्रायव्हरला आवश्यक तितकी विश्रांती मिळाली आहे की नाही याची खात्री करावी. झोप आणि विश्रांती न मिळाल्यामुळे अनेक अपघात झाल्याची कितीतरी उदाहरणे आपल्या समोर आहेतच. थकलेल्या अवस्थेत ड्राइवर आपले लक्ष केंद्रित करू शकत नसल्याने अपघात होण्याची शक्यताच अधिक असते. एका वेळी खूप जास्त प्रवास करणेही धोक्याचे ठरू शकते. म्हणून वेळोवेळी थांबा, विश्रांती घ्या, गाडी ड्राइवर यांनाही विश्रांती घेऊ द्या, म्हणजे अपघात टळू शकेल.
१०. मद्यपान टाळावे.
बहुतांश छोट्या मोठ्या अपघातांना कारणीभूत असणारी एकच बाब कारणीभूत असते, ती म्हणजे दारू किव्हा इतर वस्तूंची नशा करून गाडी चालवणे. शहरातले अपघात असो, की गल्लीतले, गावातले असो मी महामार्गावरचे, ७०-८०% अपघातांमध्ये एक किव्हा दोन्ही गाडीचालक दारूच्या नशेत असतात, हा माझा आजवरचा अँक्सिडेंट स्लेशालिस्ट म्हणून अनुभव आहे. मद्यपान किव्हा तत्सम कुठलीही नशा केल्याने सुरवातीला आत्मविश्वास वाढतो, मन उल्हासित होते त्यामुळे आपोआपच गाडीचा वेग वाढतो. मनावरील असलेला नैसर्गिक प्रतिबंध कमी झाल्याने अनियंत्रीतपणे गाडी चालवली जाते.
नशेत असतांना अंदाज चुकतो, ईमर्जन्सीत निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, सावधानता व सतर्कता कमी होते. गाडी अतिवेगात चालवतांना आजूबाजूचे दृष्टीस पडत नाही (Tubular vision) त्यामुळे आजूबाजूची वाहने अस्पष्ट दिसतात. नशा केल्याने आक्रमकता वाढते, चिडचिड होते, क्रोध आणि बदल्याची भावना वाढल्याने इतर गाड्यांना हरवण्यासाठी चढाओढ लागते. अधिक नशा केल्याने नैराश्य येते, भावनिक उद्रेक झाल्याने आपोआपच गाडीचा वेग वाढतो. ती व्यक्ती नशेत असल्याने त्याला वागण्या-बोलण्याचे भान नसते, त्याला काहीही कळत नसते. असे लोक स्वतःचाच नाही तर रस्त्यावर चालणाऱ्या इतरांच्याही जीविताला धोका निर्माण करतात. बेफामपणे गाडी चालवणाऱ्या चालकाची पोलिसांत किव्हा हेल्प लाईन नंबरवर कॉल करून तक्रार करून अटकाव केला तर अनर्थ टळू शकतो….(क्रमशः)