डॉ. संजय धुर्जड*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
मोदी सरकारच्या “गति शक्ती” प्रकल्पाचे पाहिले पाऊल, महाराष्ट्राच्या विकासात महत्वाचा टप्पा समाजाला जाणारा, राज्याच्या दोन्ही राजधान्यांना जलदगतीने जोडणारा आणि नुकताच लोकर्पित झालेला, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” पहिल्या १०० दिवसांत वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आला आहे.
सरासरी दिवसाला ९ असे १०० दिवसांत ९०० छोटे मोठे अपघात झाल्याने महामार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या तीन भागाच्या लेखमालेत पहिल्या लेखात मी वस्तुस्थिती मांडली होती, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात अपघात टाळण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काय काय उपाय, खबरदारी व सतर्कता बाळगावी यावर माझे मत मांडले होते.
अपघात टाळण्यासाठी शासन, प्रशासन, रस्ते बांधकाम करणारे तज्ञ व कंपन्यांनी काय बदल व उपाय करायला हवे, यावर काहीतरी लिहा अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केल्याने, आज त्यावर मी माझे आणि इतरांनी माझ्याकडे मांडलेली मते मी आपल्यासमोर मांडतो आहे.
या विषयावरील माझ्या पहिल्या तीन लेखांना माझ्या अनेक मित्रमंडळींच्या तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून काही अनोळखी लोकांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय, सूचना, सल्ले मिळाले, तसेच त्यातील सत्यता, वास्तव आणि तथ्य ही समजले. रस्ता सुरक्षेवर कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनीही आपले विचार मांडले तसेच यावर सोबत काम करण्याचे मनशा व्यक्त केली.
एक हौशी ड्राइवर, गाड्यांचा शौकीन, फिरण्याची आवड असल्याने रस्त्यांवर ड्राईव्ह करण्याचा मोह मला आवरत नाही. त्याच सोबत एक अस्थिरोग तज्ञ असल्याने अपघातग्रस्त रुग्णांची अवस्था, त्यामुळे त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर तसेच त्याच्या आर्थिक गणितांवर होणाऱ्या परिणामांना मी खूप जवळून बघितले आहे. म्हणून मला नेहमी असे वाटायचे की अपघात प्रतिबंधासाठी तसेच अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी काहीतरी करावे.
त्याअनुषंगाने मी गेल्या १५ वर्षांपासून “फर्स्ट-एड अँड बेसिक लाईफ सपोर्ट” या विषयावर शाळा, कॉलेज, सरकारी ऑफिसांत मी माझ्या वयक्तिक तसेच अस्थिरोग तज्ञांच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहे. म्हणूनच, १०० दिवसांत ९०० अपघात झालेले समजले तेव्हा, यावर लिहिण्यास मी स्वतःला रोखू शकलो नाही.
श्रेयवादाची शर्यत जिंकण्यासाठी या महामार्गाचे उद्घाटन वेळेपूर्वीच झाले आहे असे मला वाटते. ७०१ किमी पैकी ५२० किमी म्हणजे एकूण बांधकामाचे केवळ ७५ टक्के काम पूर्ण झालेले असतांना लोकार्पणाची घाई का, याचे उत्तर नाही. कुठेही, कुणीही याची मागणी केल्याची, मला तरी आठवत नाही. उर्वरित २५ टक्के काम पूर्ण करून, हा महामार्ग प्रवासासाठी सुरक्षित असल्याची खात्री करूनच याचे उद्घाटन झाले असते तरी, महाराष्ट्र खूप मागे नसता पडला.
यापूर्वीही इतर अनेक प्रकल्पांबाबत असे झालेले तुम्ही बघितले असणारच आहे. दुसरे असे की, जसे अनेक महामार्गांचे होते, की काम पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुली सुरू केली जाते, यासाठी तर हा महामार्ग जनतेसाठी खुला केला गेला आहे का, हाही एक प्रश्न सहज मनाला शिऊन जातो. कंत्राटदारांच्या दबावामुळे अपूर्ण रस्त्यांचे टोल वसुली सुरू झालेले महामार्ग नाशिक आणि महाराष्ट्रभर बघायला मिळतात, त्यामुळे इथेही तसेच घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतकं तर समजले पाहिजे की, अर्धवट बांधकाम अनेक अपघातांना आमंत्रण असते. याची कितीतरी उदाहरणे मी बघितली आहे, तुम्हालाही याची अनुभूती आलेली असणार आहे. पण शासनाला न कळावे, हे आपले दुर्दैव.
जेव्हा मी पहिल्यांदा समृद्धी महामार्गावर गाडी चढवली, एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवली. वैजापूर ते औरंगाबाद या ५० किमी रस्त्यावर एकही हिरवा ठिपका मला दिसला नाही. माती आणि सिमेंट काँक्रिट एव्हढंच काय ते नजरेला पडले. विशेष म्हणजे, सण २०१५ मध्ये हा प्रकल्प “मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे ग्रीन फिल्ड प्रकल्प” म्हणून घोषित करण्यात आला, तरीही गेल्या ५ वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम सुरू असतांना एक झाड, झुडूप किव्हा गवत लावले नाही, याचे नवल वाटते.
बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था केलेलीच होती, बांधकामाचा आराखडा आधीच तयार असतांनाही दुतर्फा किव्हा किमान दुभाजकावर वृक्ष लागवड का नाही झाली. असं वाचण्यात आले की, या मार्गावर जवळपास १३ लाख छोट्या मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. म्हणजे दर किमी २ हजार झाडे, दोन्ही बाजूने आणि डिवायडर मध्ये दोन रांगेत जरी लागवड केली तरी ५०० झाडे एका रांगेत लावली जाणार आहेत.
हे जगातील सर्वात मोठे, एकाच वेळी केलेले मानवनिर्मित जंगल आहे. मग यात उशीर का झाला. पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून मा. कोर्टाचेही वृक्ष लागवडीचे निर्देश दिलेले असतांनाही त्याचे पालन का झाले नाही. विशेषतः मराठवड्यासारख्या दुष्काळी आणि दुर्गम भागात वृक्षारोपण व्हायलाच हवे होते.
महामार्गावर ठिकठिकाणी फूड हब, पेट्रोल पम्प, चार्जिंग स्टेशन, गॅरेज… ई सुविधा नियोजित असतांना त्याचीही पूर्तता सुरवातीपासून झाली असती, तर तांत्रिक कारणांमुळे झालेले अपघात टळले असते. यासाठी अजूनही काही हालचाल होतांना दिसत नाही. ना निविदा मागवल्या आहेत, ना ही त्यासाठी जागा निश्चित केल्या. असो, ते लवकरात लवकर पूर्ण करावे ही अपेक्षा.
काही लोकांनी आपले मत व्यक्त करताना काही सूचनाही मांडल्या. दर चौथा अपघात, टायर गरम होऊन पंचर किव्हा फुटल्याने झाला आहे. ते टाळण्यासाठी रस्त्यात ठराविक अंतरावर पाण्याचे डोह तयार करून गाडी त्यातून चालवली तर टायर लवकर थंड होण्यास मदत होईल, असे एकाने सुचविले. मलाही ते म्हणणे पटले. साधारणपणे ५० फूट लांब आणि ६ ते ८ इंच खोल पाण्याच्या डोहातून गाडी चालवली तर टायर थंड होऊन अपघात टळू शकतील.
आणखी एक टीप अशी मिळाली की, प्रत्येक एन्ट्रीवर “मोटर क्लिनिक” असावे. तिथे गाडीची, ड्राईवरची आणि प्रवाशांची तपासणी केली जाईल. गाडीची कंडिशन, सर्व्हिसिंग केली आहे की नाही, टायर, हेडलाईट, हॉर्न, ब्रेक्स, इंजिन / ब्रेक ऑइल लेवल, पेट्रोल / डिझेल लेवल, वाईपर्स, इन्शुरन्स पेपर्स, पियुसी, ड्राइविंग लायसन्स, चेक केले जाईल. ड्राइव्हरची कंडिशन, अल्कोहोल तपासणी (ब्रेथ अँनॅलिसी), डोळे तपासणी, झोप किव्हा आराम केलेला आहे की नाही याची माहिती घेणे. प्रवाशांची माहिती घेणे असे एक केंद्र समृद्धीवर गाडी चालवण्यापूर्वी झाले तर अपघाताचे प्रमाण खूप कमी करता येईल.
याव्यतिरिक, माझ्या आधीच्या लेखात नमूद केलेल्या मुद्द्यांचे काटेकोरपणे पालन केल्यास, अनेक जीव वाचवता येतील. अनेक कुटुंब उद्वस्थ होण्यापासून वाचतील, अनेक बालके अनाथ होण्यापासून वाचतील. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन, प्रशासन आणि बांधकाम करणाऱ्या कंपनीची जितकी जबाबदारी आहे, त्याहून अधिक जबाबदारी नागरिकांचीही आहे.
आपण बेजबाबदार वागून त्यातून होणाऱ्या परिणामांसाठी इतरांवर दोषारोप करण्यात कुठलाही शहाणपणा नाही. आपला जीव आहे, आपलीच गाडी आहे, आपण स्वतः किव्हा आपल्यावतीने आपला ड्राइवर गाडी चालवतोय, तर आपण काळजी घ्यायलाच हवी. आपल्यामागे आपले कुटुंबीय, आपली भावी पिढी, आपल्यावर अवलंबून असणारे अनेक लोक, अनेक कुटुंब असतील, तर आपल्याला जबाबदारीने वागावे लागेल.
देवाने आपल्याला इतके सुंदर जीवन दिले आहे, अतिशय सक्षम असे शरीर दिले आहे, जीवाला जीव देणारे आपले लोक दिले आहे, हा निसर्ग, ही पृथ्वी आणि या सृष्टीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, हे जरी समजले, तरी आपले जीवन खूप सुखकर होईल, हे नक्की…!
*
महामार्ग की मृत्यूमार्ग हा लेख वाचला असता आजपर्यंत भरपूर प्रमाणात अपघात झाले आहेत .
काहींना प्राण गमवावे लागले तर काही जायबंदी झाले… वरील परिस्थिती पाहता सर्वांनी वाहतूकीचे नियमही पाळणे आवश्यक आहे. महामार्ग हा वास्तविक डांबरीकरणाचाच हवा . सिमेंटचा रस्ता हा खूप घातक आहे कारण उष्णतेमुळे त्याचे तापमान वाढते व टायरचे घर्षणामुळे चाकामधील हवा तापते तापल्यावर ती प्रसरण पावते परिणामी हवेचा दाब वाढतो व टायर फुटतात व अपघात होतात.याला पर्याय आहे सर्वांनी वाहनात नायट्रोजन भरला पाहिजे परंतु तो महागडा असल्याने फारसा वापर करत नाही. त्यात सर्वच काही वेळेवर टायर बदलतही नाही व वेगावर नियंत्रण ही ठेवत नाहीत परिणामी अपघाताचे प्रमाण वाढते… म्हणून सर्वांनी वरील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
Very nice sir