अतिक्रमणांमुळे ऐतिहासिक ‘वावी वेशी’चा कोंडमारा !

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणार्‍या पुरातन वावी वेशीची अतिक्रमणामुळे पडझड होत असून, तिचे मूळ सौंदर्य धोक्यात आले आहे. वेशीलगतच्या सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा, तसेच वेशीचे जतन, दुरुस्ती व नूतनीकरण तातडीने करावे, अशी मागणी सिन्नर येथील नागरिक प्रवीणचंद्र निवृत्ती पन्हाळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

12 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात पन्हाळे यांनी वावी वेशीच्या सद्यस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ऐतिहासिक सिन्नर शहराला पूर्वी संरक्षणासाठी सात वेशी होत्या. त्यापैकी वावी वेस ही महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू असून, तिचे दगडी बांधकाम अतिक्रमण आणि दुर्लक्षामुळे खराब होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
वेशीलगत नगरपरिषदेने बांधलेल्या गाळ्यांच्या परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने येण्या-जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी विनापरवानगी बांधकाम झाल्याने वेशीच्या मूळ वास्तूला धक्का पोहोचत आहे. व्यावसायिक आणि ग्राहकांच्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला असून, लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वेशीचे जुने दरवाजे व अन्य ऐतिहासिक साहित्याची चोरी किंवा तोडफोड रोखण्यासाठी सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणीही केली आहे. अतिक्रमणे हटविल्यास वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल, असे निवेदनात नमूद
केले आहे.

पदाधिकार्‍यांनाही साकडे
सिन्नरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी आणि नगरपरिषदेने वावी वेशीची दुरुस्ती व देखभाल करावी, अशी विनंती पन्हाळे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे आणि सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

 

Historic ‘Vavi Ves’ Choked by Encroachments!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *