महागाईच्या ओझ्यामुळे मोडून पडला संसाराचा कणा
नाशिक : प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल आणि गॅसबरोबरच दैनंदिन वापरातील वस्तुंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाईच्या ओझ्यामुळे आमदनी अठण्णी खर्चा रुपया अशी अवस्था सामान्य माणसाची झाली आहे. महागाईच्या या बोज्यामुळे घर चालवायचे की हफ्ते भरायचे? अशा दुहेरी संकटात सामान्य माणूस सापडला असल्याचे चित्र आहे.
महागाई गेल्या काही वर्षांत सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. पेट्रोल 122 रुपये तर डिझेल 112 रुपयांवर पोहोचले असून, घरगुती स्वयंपाकाचा गॅसही एक हजाराच्या पुढे गेला आहे. खाद्यतेले तर गेल्या एक वर्षात दुप्पटीने वाढले आहे. मागील वर्षी 90 रुपये किलो असणारे खाद्यतेल वाढत जाऊन आता 180 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. ज्या तुलनेते महागाई वाढते आहे. त्यातुलनेत उत्पन्न अथवा कंपनीत काम करणार्यांचा पगार वाढत नसल्याने महागाईशी तोंड मिळविणे करताना दमछाक होत आहे. नित्याच्या वापरासाठी संसाराला आवश्यक असणार्या गृहोपयोगी वस्तुंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. किराणा मालाचे भाव आकाशाला भिडू पाहत असल्याने संसाराचा गाडा रेटताना सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपण, कुटुंबातील सण समारंभ, वाढदिवस, नातेवाइकांकडे जाणे येणे लग्न समारंभ यासाठी होणार्या खर्चाबरोबरच दररोज प्रपंचासाठी लागणार्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी करावी लागणारी तजविज पाहता कुटुंबप्रमुखाला तारेवरील कसरत करावी लागत आहे. अनेकांनी विविध कारणांसाठी बँका, पतसंस्थांचे कर्ज घेतलेले आहे. काहींनी कार्यालयात जा-ये करण्यासाठी वाहने कर्जावर घेतलेली आहेत. त्यांचे हफ्ते दरमहा भरावे लागतात. परंतु एकीकडे घरखर्चाचा वाढलेले बजेट आणि दुसरीकडे बँकाचे हफ्ते यामुळे येणार्या उत्पन्नाचा मेळ साधताना सामान्य कुटुंबातील सदस्यांची मोठी कोंडी होत आहे.
शालेय वाहतूक खर्च परवडेना
वाढलेल्या इंधन दरामुळे माल वाहतुकीबरोबरच शालेय वाहतूक देखील महागली आहे. शाळा-महाविद्यालयांचा खर्च वाढला आहे. मुलांना शाळेत पाठविण्यासाठी व्हॅन, बसचे भाडे देखील वाढविले आहे. याशिवाय गणवेश, शालेय साहित्य देखील महागल्याने शिक्षणाचा खर्च देखील सामान्य कुटुंबाला परवडेनासा झाला आहे.
बचत उरतच नाही
भविष्यात मुलांच्या शिक्षण, म्हातारपणासाठी अथवा आकस्मिक खर्चासाठी काहीतरी मागे राहावे म्हणून येणार्या उत्पन्नातील काही भाग बचत म्हणून मागे टाकण्याची देखील सोय उरलेली नाही. दरमहा मिळणार्या उत्पन्नातून बचतीसाठी काही शिल्लक उरतच नाही. दररोजच्या खर्चाचाच मेळ साधला जात नाही तर बचत करणार कोठून? त्यामुळे भविष्यातील बचतीवरही मर्यादा आल्या आहेत.
वजन घटविले किमतीं स्थिर
कंपन्यांनीही नवनवीन फन्डे वापरण्यास सुरुवात केली आहे. काही वस्तुंच्या वजनात घट करत किमती स्थिर ठेवल्या आहेत. विशेषत: साबण, टुथपेस्ट, बिस्किटे यामध्ये हा फॉर्म्युला कंपन्यांनी वापरला आहे.
पेट्रोल- 122
डिझेल -112
खाद्यतेले-170 ते 190
गॅस- 1050
साखर -40
दूध-65 ते 70 (लिटर)