हौस साठवणुकीची

“सुले किती आणि काय काय वस्तू जमा करून ठेवल्यास घरात काही कळत नाही.”
घर आवरायला काढल्यावर कधी नव्हे ते मदतीला पुढे आलेल्या बंडोपंतांचे उदगार.

“वेळेकाळेला लागतात वस्तू! तुम्ही ठेवा हो ते आणि आवरू लागा.” सौभाग्यवतींचा हुकूम.
” बापरे किती ही भांड्यांनी भरलेली पिपं? आता काय करणार आहेस एवढ्या भांड्यांचं?”
“अहो, आपल्याकडे सत्यनारायण, गौरी गणपती अशावेळी लागतात ही भांडी वाढायला, स्वयंपाकाला.”

“अच्छा म्हणजे निवडणुकीतल्या उमेदवारासारखी ही तुझी भांडी आहेत तर! एकदोन दिवस दर्शन देऊन एरवी गायब होणारी!” बंडोपंत.


“आता या वस्तूंचं काय करणार आहेस ? नवीनच कोऱ्या करकरीत. खोक्यांच्या बाहेर डोकावून हे जग पाहिलं सुद्धा नसेल त्यांनी अजून!”

“अहो ते नाही का आपल्याला लग्नात मिळालेले गिफ्ट, आहेरात आलेल्या वस्तू! ते सगळं ठेवलंय. कुणाचं लग्नकार्य, वास्तुशांती निघाले की देता येतात या वस्तू!” इति सुलभाताई.

“बरं हे शोकेसमधले शो पिसेस ओसंडून वाहत आहेत.”

” ते नाही का हो आम्ही सोसायटीतल्या बायका सेलमध्ये गेलो होतो? तेव्हा अगदी कमी किमतीत मिळाले म्हणून घेतले.”

“हो बरोबर आहे तुझं. कमी किमतीत मिळाले म्हणजे दुकानदाराने घरावर तुळशीपत्रच ठेवले होते नाही का! म्हणून तुम्हाला स्वस्त दिल्या या वस्तू!” बंडोपंतांनी सुलभाताईना वेडावत म्हटले.

“अगं तुम्ही बायका असंच करतात. एकावर एक फ्री वस्तू मिळते म्हटल्यावर जो खरेदीचा सपाटा लावतात आणि वस्तूंची साठवणूक करतात, तेव्हा कळत नाही तुम्हाला की आपण नको असलेल्या, गरज नसलेल्या कितीतरी वस्तू घेत असतो आणि विनाकारण त्याची घरात साठवणूक करत असतो.”

“कळतात हो तुमचे टोमणे! मागच्या पावसाळ्यात मान्सून सेल लागला होता तेव्हा साड्या ड्रेस एकावर एक फ्री होते म्हणून घेतले हो आठ दहा ड्रेस फक्त आणि दहा-बारा साड्या तर त्यात काय एवढं? मला बोलून दाखवायची एक संधी सोडू नका हो !” सुलभा ताई.

” हां तर! तशी खरेदी कमीच झाली होती तुझी! अगं कपाटाचा दरवाजा उघडायचा अवकाश की कपाटातले सगळे कपडे लोटांगण घेतात पायावर !” इति बंडोपंत.

“बरं झालं आठवलं. अहो, मला कपड्यांना कपाट कमीच पडते. मला वाटतं आपण एखादा मोठा वॉर्डरोब बनवून घेऊ या माझ्यासाठी.”

बंडोपंतांनी कपाळावर हात मारला.

“त्यापेक्षा ही वस्तूंची, कपड्यांची, भांड्यांची साठवण कमी कर. म्हणजे वेळेवर वस्तू सापडतील आणि आवरून दमछाक होणार नाही. महत्वाचं म्हणजे पैसेही वाचतील.” अर्थतज्ज्ञाच्या आवेशात बंडोपंत.

“खरंच तुम्ही बायका म्हणजे ना कमाल आहात अगदी ! कशाकशाची साठवणूक करतात कोण जाणे! स्वयंपाकाची भांडी, कपडे, दाग दागिने, अडीनडीला लागणाऱ्या वस्तू, देण्याघेण्याला लागणाऱ्या वस्तू … अजून काय काय साठवतात कोण जाणे!”

” हो कळते बरं तुमचे बोलणे.
अहो, स्वयंपाक घरात सुद्धा कितीतरी वस्तूंची साठवणूक करावी लागते. धान्य , डाळी साळी…”

“अगं पण या वस्तू सगळीकडे मिळतात ना! आणि आता काही पूर्वीसारखे कोसाकोसावर जाऊन सामान थोडी आणावे लागते?”

” असू दे. पण या साठवणुकीतही किती मजा आहे हे तुम्हाला नाही कळणार.
अहो घडून गेलेले सुखदुःखाचे प्रसंग आपण साठवत असतो फोटो आणि सेल्फीमधून. आणि हे फोटोंचे अल्बम माणूस पुन्हा पुन्हा पहात त्या क्षणांना आठवत असतो. एक प्रकारे पुन्हा ते प्रसंग जगत असतो.”

खरंच कधी कधी अशी ही भावनिक साठवणूक मनाला एक प्रकारचा आनंद, ऊब देऊन जाते.

एखाद्याची प्रिय व्यक्ती हे जग सोडून गेल्यानंतर त्यांच्या फोटोवरून मायेनं हात फिरवत, त्यांना आठवत कितीतरी व्यक्ती जगत असतील ना! ही सुद्धा भावनिक साठवणूकच आहे ना!

“आणि हो आम्ही बायका फक्त वस्तूच साठवतो असं नाही तर आम्ही नाती आणि माणसंसुद्धा साठवतो बरं का! एखादी मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते, तेव्हा सासू-सासरे, दीर, नणंद, जाऊ अशी कितीतरी नाती ती साठवते. कालपर्यंत ती ज्यांना ओळखतही नव्हती, चुलत- मावस अशा अनेक लोकांना ती आपलेसे करून घेते. नवऱ्याची मित्रमंडळी, अगदी त्यांच्या बायकांशी सुद्धा मैत्री करते. हे फक्त बायकाच करू जाणे! ही सुद्धा नात्यांची, माणसांची एक प्रकारे साठवणूकच ना….”

( सविता पोतदार )
९८५०९३६७९८

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकरोड ‘एमपीए’च्या पदाधिकार्‍यांची निवड

नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…

2 hours ago

भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी

नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…

2 hours ago

नैसर्गिक साधनांचा वापर करत विद्यार्थ्यांनी बनवली 140 घरटी

चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…

2 hours ago

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले?

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको :  विशेष प्रतिनिधी सरकार…

3 hours ago

लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड

लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड   राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…

3 hours ago

अमेरिकेचा मोठा शत्रू

अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…

17 hours ago