संपादकीय

किती असावी.. हरकत

काय असते हरकत नसणे म्हणजे? हरकत हा शब्द ऐकल्याबरोबर मनात अनेक भाव उत्पन्न होतात. उपरोधिक, विरोधक, आक्षेपार्ह किंवा प्रश्नार्थक. आपण रोजच अनेकविध अर्थाने हा शब्द वापरतो त्यात ती भावना नेहमीच विभिन्न असते. ‘हरकत नाही’ म्हणजे नकारात्मक भाषा नव्हे. ती विचारांच्या सजगतेची, स्वातंत्र्याची खूण आहे. काहीच हरकत नसणे म्हणजे निष्प्राण जीवन आणि अतिशय हरकत असेल तर विसंवाद उत्पन्न होईल. ह्या दोन टोकातील समतोल साधणे, माणसाच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे.आपल्या कुटुंबात आपण अनेक गोष्टीं विषयी हरकत घेत नाही, म्हणजेच लहान मुलांच्या बाबतीत, त्यांचा बालिशपण, खोडसाळ पण त्यांनी केलेले मामूली नुकसान ह्याबाबत आपण त्यांना माफ करतो कारण ते आपलेच असतात आणि त्यातूनच ते शिकत असतात. नात्यांमधे देखील प्रामाणिक पणा राखायचा असेल तर हरकत सोडती घ्यावी लागेल. त्याशिवाय प्रत्येकालाच आपली मतं मांडण्याचा अधिकार असतो..असावा मात्र हरकत व्यक्त करताना प्रेम आणि समजुतदार पणा गरजेचा आहे. नात्यांमधे, जास्त हरकत घेतली तर दुरावा निर्माण होतो पण मुळीच हरकत न घेतल्यास आपलेच व्यक्तिमत्त्व दडपून जाते. कौटुंबिक जीवनात हरकत घेतल्यास असंवाद उद्भवतात म्हणून कौटुंबिक हरकत ही भिंती उभी करणारी नको. परस्परसंबंध सुधारित करणारी हवी. कुटुंबातील आर्थिक व्यवहारात हरकत घेतात कारण कोणीही कुठलीही अवांतर वस्तू अकारण मागितली तर निश्चितच ती त्याला का पाहिजे?म्हणून हरकत घेतात. आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेची गरज असते. कुठलीही गुंतवणूक करताना, पैशाची देवाणघेवाण करताना, खर्च करताना हरकत घेणं म्हणजेच सावधपणाचे चिन्ह आहे. आर्थिक व्यवहारातील हरकत, व्यक्तीला फसवणूक, धोका यापासून वाचवते आणि जबाबदार आर्थिक वर्तन शिकवते. मात्र आतिसंशयामुळे संधी गमावल्यासुद्धा जाऊ शकतात. ही हरकत विवेकबुद्धीने घेतली जावी, कुणाचा दबाव, भीती किंवा कुणाच्या लबाडीत फसून न करण्यात यावी.
लहानपणी आपण सर्वांनीच अभ्यासात मार खाल्लाय. शाळेत शिक्षक आणी घरी आई, बाबा, दादा किंवा जो कुणी अभ्यास घेईल तो मनसोक्त बडवत असे. जराशी चूकदेखील कुणीच खपवून घेत नसत. ही होती त्यावेळेसची हरकत. आपण ही फक्त शिक्षण घेण्यासाठी घेत नव्हतो. पाठांतर, परोचा, देवांची संस्कृत स्तोत्र याची घोकंपट्टी रोजच होत होती. त्यात कुठलीच चूक कबूल नव्हती, प्रत्येक चुकीला हरकत होती. ही शिस्त होती आणि ती आपण पाळत होतो. ती आदर राखून ठेवण्यात येत होती. ज्ञानप्राप्ती करता घेतल्या जाणारी ही सात्त्विक हरकत होती, ज्यामुळे आपण घडलो.
आपला देश विविध रंगांनी नटलेला आहे. धर्म, श्रद्धा, विचार आणि विविध राहणीमानाचा संगम आहे. इथे सर्वच जण हरकत घेतात कारण इथे हे आवश्यक आहे. प्रत्येकालाच आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यास, भेदभाव किंवा अंधश्रद्धेवर अवलंबून रहाता येत नाही. याविरुद्ध हरकत घेणारे लोक समाजसुधारक ठरले. आज सतीप्रथा आणि बालविवाह यावर कुणीच हरकत घेतली नसती तर निश्चितच ते आजवर चालले असते. आपण इंग्रजांच्या शासनाविरोधात हरकत घेतली नसती तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते. अंधश्रद्धेवर हरकत घेतली नसती तर विज्ञान कधीच बहरले नसते. समाज अनेक मतभेदातून निर्माण होतो आणि खूप लोक बर्‍याच गोष्टीत हरकत घेतात, पण त्याचबरोबर समाज सुधारत होता. तरीपण प्रत्येक गोष्टीत आक्षेप घेण्याची वृत्ती, समाजात तणाव निर्माण करु शकते. हरकत अशी असावी की, संघर्षाला वाव न देता संवादाला प्रेरित करेल. मतभेद असावेत पण मनभेद नकोत.
जुने-नवे हा भेद नेहमीच राहणार. परिवर्तन सतत घडत असते. परंपरेच्या निर्वहनात अनेकवार हरकत घेण्यात येते. जुने संस्कार नाकारण्यात, नव्या पिढीतील लोक अग्रेसर असतात. काही कारणास्तव हरकत घेतली तर ती मान्य असते, पण विनाकारण फक्त जुन्या काळापासून हे चालले ते असेच चालावे ह्याबाबत नवे आणि जुने दोन्ही लोकांनी हरकत घ्यायला नको. जरी हे ठीक आहे तरीदेखील जुन्या परंपरेचा पूर्ण नकार केल्यास सांस्कृतिक मुळापासून तुटण्याचा धोकाही पत्करण्यास तत्पर असावे. हरकत अशी असावी की, ती संस्कृतीला नवं रूप देईल आणि तिचे अस्तित्व ही बुजवणार नाही. परंपरेला प्रश्न विचारणे म्हणजे तिचा अपमान नव्हे, तिचे पुनर्मूल्यांकन आहे. राजा प्रजेचा पालक असतो पण त्याचबरोबर त्याला आपली एकट्याची मर्जी चालवता येत नाही. लोकशाहीत हरकत हा जनतेचा हक्क आहे. राजाला, सत्तेला प्रश्न विचारणे, धोरणांवर आक्षेप घेणे हे लोकशाहीचे प्राणतत्व आहे. हरकत म्हणजे विरोध, टीका, जाब विचारणे ह्या गोष्टी राजकारणाला सुदृढ करतात. आपले उत्तरदायित्व व्यवस्थित पार पाडण्यास, विरोधी पक्ष, जनता यांनी हरकत घेतलीच पाहिजे. जर कुणी कुणाची हरकत घेणार नाहीत तर नव्या अभिव्यक्तीचा जन्मच होणार नाही. साहित्यिक जेव्हा समाजाच्या प्रवाहाला, निसर्गरम्य अबोलतेला हरकत घेतो तेव्हा नवी साहित्य निर्मिती होते. ती हरकत कधी सुरेख शब्दांत कविता होते, कधी भावनिक गुंफणीत गुंफलेली कादंबरी होते. साहित्यिक हरकत ही सौंदर्यपूर्ण असते, ती मनाला विचार करायला लावते.
जितकी गरज तितकीच हरकत असावी. हरकत ही विवेकची सीमा ओलांडू नये. हरकत,आदर, समजुतदार पणा आणि प्रामाणिकता या सीमेच्या आतच असावी. मौनाच्या भीतीत हरवू नये. ती जिवंत णाची खूण आहे. जिथे हरकत असते तिथे विचार असतो आणि जिथे विचार असतो तिथेच प्रगतीचा मार्ग खुला होतो.

How much should it be?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

6 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

7 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

7 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

7 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

7 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

7 hours ago