महसूल विभागात ‘ई-चावडी’ला मोठा प्रतिसाद

नाशिकला सर्वाधिक 8 लाख, नंदुरबारला सर्वांत कमी 4 लाख नोंदी

नाशिकरोड : अनिल गुंजाळ

राज्य सरकारच्या महसूल विभागात डिजिटल व्यवस्थेला गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ई-हक्क प्रणाली’ अंतर्गत ई-चावडी प्रणालीला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना ग्रामस्तरावरचे विविध कामकाज ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जात आहे. एक डिसेंबरपर्यंत नाशिक विभागातून 32 लाख 82 हजार 167 नोंदी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ई- चावडीच्या माध्यमातून सर्वाधिक नोंदी नाशिक जिल्ह्यातून झाल्या असून, आतापर्यंत 8 लाख 715 नोंदी येथे नोंदल्या गेल्या आहेत. दुसरीकडे सर्वांत कमी नोंदी नंदुरबारला चार लाख 67 हजार 732 प्राप्त झाल्या आहेत.
नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांची एकूण नोंदींची संख्या 32 लाख 82 हजार 167 इतकी आहे. तर नाशिक जिल्हा निश्चित केलेल्या गावांची संख्या 1963 असून, 100 टक्के वसुलीत 752 गावांची संख्या आहे तर सर्वांत कमी धुळे जिल्ह्यात 638 गावांची निश्चित संख्या असून, 100 टक्के वसुलीत 46 गावांचा
समावेश आहे. इतर जिल्ह्यांची आकडेवारी पाहता धुळे 6 लाख 3 हजार 431 इतक्या नोंदी झाल्या तर जळगाव जिल्ह्यात 6 लाख 26 हजार 773 इतक्या आहेत तर अहिल्यानगर जिल्ह्यात 7 लाख 83 हजार 516 नोंदी झाल्या आहेत. राज्य सरकारने महसूल प्रशासन पारदर्शक, जलद व कागदविरहित करण्यासाठी ई-चावडी प्रणाली लागू केली असून, याद्वारे नागरिकांना ग्रामस्तरावर विविध कामकाज ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येते. या उपक्रमामुळे महसूल अधिकार्‍यांचे कामकाज अधिक कार्यक्षम होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

कोणते काम ‘ई-चावडी’तून?

ई-फेरफार प्रणालीचा डेटाबेस वापरून राज्यभरामध्ये तब्बल 82 लाख 50 हजार 411 तलाठी दप्तराचे सर्व गाव नमुने संगणकीकृत करून जमीन महसूलसह सर्व देय शासकीय कर व उपकरण निश्चित करून ते ऑनलाइन भरण्याचे सुविधा खातेदार नागरिकांना उपलब्ध करून दिली गेली आहे. त्यासाठी ई-चावडी प्रणाली अंतर्गत आज्ञावली विकसित करण्याचे अजून काही स्तरावर काम चालू आहे. तूर्तास तलाठी लॉगिनने ऑनलाइन वसुलीचे काम 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाले आहे. ई-चावडीमुळे सर्व तलाठी संवर्गाचे काम मोठ्या प्रमाणात कमी झाले असून, पारदर्शक व अचूक झाले आहे. ई-चावडीमुळे खातेदारांच्या वसुलीची अद्ययावत आकडेवारी समजायला मदत
होत आहे.

विभागातील एकूण गावांची संख्या
जिल्हे            गावांची संख्या         निश्चित गावांची संख्या     वसुली 100% गावे
नंदुरबार                  886                        878                                158
धुळे                        678                        638                                  46
जळगाव                 1504                      1459                                100
नाशिक                   1979                      1963                               752
अहिल्यानगर         1606                      1585                               107

 

ई-चावडीच्या माध्यमातून होणारी कामे

ई-चावडीमध्ये सातबारा उतारा दुरुस्ती, नवीन नोंदणी, जमिनीच्या मालकी हक्कातील बदल, गट नंबरनुसार माहिती पाहणे आणि चावडी वाचनाद्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या नोंदींची माहिती देणे यांसारखी कामे केली जातात, जेणेकरून पारदर्शकता येईल आणि भू-प्रशासन सुलभ होईल.

भूधारकांना त्यांच्या जमीन महसुलाची माहिती आपल्या घरी बसून फेरफार करण्याकामी शेतकर्‍यांसाठी महाराष्ट्र शासनाने ही प्रणाली सुरू केली आहे. त्यात विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
-विठ्ठल सोनवणे  सहाय्यक आयुक्त, भू-सुधार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *