डिजिटल युगात हरवत चाललेली माणुसकी…

मोबाइलच्या प्रकाशात
हरवले चेहरे सारे,
मनामनातले अंतर वाढले
नकळतच हळूहळू सारे!
आज आपण डिजिटल युगात जगत आहोत. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यांसारख्या साधनांनी आपल्या आयुष्याला वेग दिला आहे. माहिती काही सेकंदांत मिळते, जगभरातील लोकांशी सहज संपर्क साधता येतो. परंतु या प्रगतीच्या वेगात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी गमावत आहोत त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी आणि आपलेपणा. मागील काळात लोकांमध्ये जिव्हाळा, आत्मीयता आणि परस्परांबद्दलची काळजी अधिक होती. शेजारी-शेजार्‍यांमध्ये संवाद होत असे, सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना होती. कुटुंबातील सदस्य एकत्र बसून गप्पा मारत, अनुभव शेअर करत. नात्यांमध्ये उब होती, शब्दांमध्ये भावना होती. कधी काळी एका हाकेला धावून येणारे लोक आज फक्त ीशशप करून पुढे जातात. शब्द राहिले, पण भावना हरवल्या; जवळ असूनही माणसं दूर झाली, आणि मनं नकळत एकटी पडली. पण आजच्या डिजिटल युगात परिस्थिती बदललेली दिसते. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेला आहे. प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आहेत आणि आभासी संवाद वाढला आहे. ऑनलाईन कनेक्ट असलो तरी मनाने आपण दूर गेलो आहोत. सोशल मीडियावर हजारो मित्र असले तरी खर्‍या आयुष्यात बोलायला कोणी नसल्याची भावना अनेकांना भेडसावत आहे. यामुळे माणसांमधील संवेदनशीलता कमी होत चालली आहे. इतरांच्या भावनांचा विचार करण्याऐवजी स्वतःच्या जगात रमण्याची प्रवृत्ती वाढत आहे. डिजिटल साधनांचा अतिरेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण करत आहे. आपलेपणा, सहानुभूती आणि संवाद यांची जागा लाइक्स आणि कमेंट्स यांनी घेतली आहे. याचा अर्थ डिजिटल युग वाईट आहे असे नाही. हे युग आपल्याला अनेक संधी देणारे आहे. पण या सोयींचा वापर करताना आपण माणुसकी विसरू नये, हे अधिक महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण पुन्हा एकदा नात्यांना वेळ दिला पाहिजे. कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संवाद वाढवला पाहिजे, मित्रांना भेटायला वेळ काढला पाहिजे. समाजात संवेदनशीलता आणि सहकार्याची भावना जपली पाहिजे. कारण शेवटी, माणसाला माणूस म्हणून जोडणारी गोष्ट म्हणजे माणुसकीच आहे. आजही एखाद्या घरात कोणी तरी वाट पाहत असतो फक्त एका प्रेमळ शब्दाची, एका स्पर्शाची, एका खर्‍या संवादाची. पण आपण मात्र, स्क्रीनच्या जगात इतके हरवून गेलो आहोत, की त्यांच्या डोळ्यातील शांत अश्रूही आपल्याला दिसत नाहीत आणि कधीतरी वेळ निघून गेल्यावर, आपण फक्त रिकाम्या आठवणींना मिठी मारत राहतो, तेव्हा समजतं ऑनलाइन असताना आपण खरं तर किती एकटे होतो.

Humanity is being lost in the digital age…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *