प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीकडे तक्रार, आंदोलनाचा इशारा
मनमाड : प्रतिनिधी
शहरातून जाणार्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग (एनएच 752) डांबरीकरणाच्या कामासाठी अनकाई परिसरात एका खाजगी कंपनीकडून बेकायदेशीर डांबर प्लांट सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्लांटमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. अनकाई ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अनकाई ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. 351 मधील शेतकरी रघुनाथ दराडे यांच्या शेतात गणपती भारत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हा प्लांट उभारला आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्लांट सुरू असून, यासाठी संबंधित कंपनीने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही. या प्लांटच्या चिमणीतून दिवस-रात्र निघणार्या विषारी धुरामुळे स्थानिक नागरिक, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. यासंदर्भात स्थानिक अर्जदार शुभम शिंदे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार नोंदवून प्लांट तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पर्यटनस्थळ अंकाई किल्ला धोक्यात
मनमाड शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत येणारा ऐतिहासिक अंकाई किल्ला आहे. स्थानिक आमदार तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी या पर्यटनस्थळासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येथे विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र, या डांबर प्लांटमुळे निघणार्या धुरामुळे किल्ल्याचे सौंदर्य आणि पर्यावरण धोक्यात आले आहे. पर्यावरण व पर्यटन विभागाने या बेकायदेशीर प्लांटवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Illegal asphalt plant in the Ankai area.