संपादकीय

मी हार मानत नाही!

लोकशाहीच्या नावाखाली सत्ता मिळवून हुकूमशहा निर्माण होतात तेव्हा लोकांवर आपले हक्क गमावून बसण्याची वेळ येते. त्यावेळी लोकांना त्यांचे हक्क मिळवून एखादी चळवळ उभी राहते. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला नावाच्या देशात अशीच परिस्थिती गेल्या काही वर्षांत निर्माण झाली. देशात लोकशाही परत यावी म्हणून संघर्ष करणार्‍या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा पुरस्कार आपल्याला मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळाला नसला, तरी त्यांनी आधीच मचाडो यांचे कौतुक केले होते. लोकशाहीच्या नावाखाली सत्ता मिळवून हुकूमशहा झालेले नेते पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटून निवडणूक व मतदान प्रक्रियेत गैरप्रकार करतात, भ्रष्ट मार्गांचा अवलंब करतात, विरोधी पक्षांना दाबून टाकतात, आपलीच हुकुमत चालवतात. अशा प्रवृत्तींविरुद्ध लढणार्‍या लोकांना त्यांच्या लोकशाही हक्कांची जाणीव करून देणार्‍या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दावेदारी होती. त्यांचा स्वप्नभंग झाल्याचा परामर्श याच सदरात शनिवारी (दि. 11 ऑक्टोबर 2025) ‘नोबेल शांतता’ स्वप्नभंग या मथळ्याखाली आम्ही घेतला होता. मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. त्यामुळे जगभरात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी चळवळ करणार्‍या कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले आहे. लोकशाहीच्या माध्यमातून सत्ता मिळवून हुकूमशाही कारभार करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पण अशा प्रवृत्तींना न घाबरता लोकांना संघटित विरोध करणारे नेते आणि कार्यकर्ते आहेत, हाच संदेश व्हेनेझुएलातून जगभर देणार्‍या मारिया मचाडो यांना मिळालेला शांततेचा नोबेल पुरस्कार हुकूमशाही प्रवृत्तींना एक धडा देणारा आहे, असे म्हणावे लागेल. जानेवारी 2025 मध्ये व्हेनेझुएलाच्या निकोलस मादुरो यांच्या राजवटीत सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात आली, तेव्हा मचाडो यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी मचाडो यांचा उल्लेख स्वातंत्र्यसैनिक केला होता. व्हेनेझ्युएलन लोकशाही कार्यकर्त्या मचाडो आणि त्यावेळच्या निवडणुकीत निर्वाचित अध्यक्ष गोंझालेझ यांच्या निदर्शनांचे ट्रम्प यांनी कौतुक केले होते. ट्रम्प यांचा मचाडो यांना भक्कम पाठिंबा होता. भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल मारिया मचाडो यांनी नोबेल शांतता पुरस्कार ट्रम्प यांना आणि आणि व्हेनेझुएलाच्या पीडित जनतेला अर्पण करण्याची घोषणा केली. व्हेनेझुएलामधील हुकूमशहा मादुरो राजवटीला ट्रम्प विरोध करत आले आहेत. हुकूमशाही राजवटीविरुद्ध निदर्शने करणार्‍या लोकांना ट्रम्प यांनी पाठिंबा दिला होता. जानेवारी 2025 मध्ये निकोलस मादुरो यांनी स्वत:चा अध्यक्ष म्हणून शपथविधी करवून घेतला होता; परंतु निवडणुकीत त्यांनी गडबड करून मतदारांना धोका दिल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवार गोंझालेझ यांनी केला होता. या निवडणुकीत गोंझालेझ निवडून आले होते. पण मादुरो यांनी सत्ता सोडण्यास नकार देऊन स्वत:चीच अध्यक्ष म्हणून निवड घोषित करून शपथविधी उरकून घेतला. निदर्शनांच्या काळात मचाडो यांना सरकारने स्थानबद्ध केले होते. त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून मादुरो राजवटीला आव्हान दिले. त्यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा संकल्प केला होता. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन मादुरो यांनी लोकांचे लोकशाही हक्क हिरावून घेतले होते. त्याविरुद्ध मचाडो लढत होत्या. नोबेल शांतता पुरस्कारासाठी मचाडो यांची निवड करताना त्यांनी दिलेल्या लोकशाही लढ्यासाठी योगदानाची उचित दखल घेण्यात आली. मचाडो यांना त्यांच्या लोकशाही हक्कांसाठीच्या अथक प्रयत्नांसाठी आणि व्हेनेझुएलामध्ये हुकूमशाहीपासून लोकशाहीकडे शांततापूर्ण संक्रमणासाठीच्या लढ्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नॉर्वेजियन नोबेल समितीने म्हटले आहे की, व्हेनेझुएला देशातील लोकांसाठी लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देणार्‍या मचाडो यांच्या अथक कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. लोकशाहीची ज्योत जिवंत ठेवणारी धैर्यशील आणि समर्पित शांततेची दूत.लोकशाहीच्या माध्यमातून सत्ता मिळाल्यानंतर लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून हुकूमशाही पद्धतीने कारभार करणार्‍यांच्या विरोधात हा पुरस्कार आहे. मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलाच्या एक धैर्यशील, स्पष्टवक्त्या आणि लोकशाही समर्थक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. सध्या त्या व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी (पोलादी महिला) म्हणून ओळखल्या जातात. 1980-90 च्या आसपास भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी एक कणखर नेत्या म्हणून जगाला परिचित होत्या. त्यांनाही आयर्न लेडी म्हणून ओळखले जात होते. त्याच काळात ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनाही त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे आयर्न लेडी म्हणून संबोधले जात होते. इंदिरा गांधी आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर ‘आयर्न लेडी’चा मान मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला तो त्यांनी लोकशाहीची पुन्हा स्थापना व्हावी यासाठी घेतलेल्या कखर भूमिकेमुळे. इंदिरा गांधी आणि मार्गारेट थॅचर यांना प्रचंड टीका सहन करावी लागली, तरीही त्यांनी आपल्या भूमिका आणि निर्णयांबाबत कोणतीही तडजोड केली नाही. मचाडो यांना मादुरो राजवटीने तुरुंगात टाकले. काही काळ त्यांना लपूनही बसावे लागले. पण त्यांनी आपला लढा सुरूच ठेवताना कोठेही तडजोड केली नाही. यो नो रिन्डो असे त्यांचे एक वाक्य आहे. त्याचा अर्थ म्हणजे, मी हार मानत नाही. लोकशाहीच्या लढ्यात हार मानायला आपण तयार नाही, असे म्हणत त्यांनी जगातील लोकशाही समर्थक चळवळींना, नेत्यांना, लोकांना ऊर्जा दिली आहे. विरोधी नेत्या म्हणून मचाडो यांनी मादुरो राजवटीच्या विरोधात खंबीर भूमिका घेतली. त्यांना तुरुंगात डांबले गेले, स्थानबद्ध करण्यात आले, तरीही त्यांनी लढा सुरू ठेवला. मारिया मचाडो आज केवळ नेत्या नसून, व्हेनेझुएलात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेचे स्वप्न पाहणार्‍या लोकांच्या आशांचा आवाज बनल्या आहेत. मारिया यांच्या या साहसी लढ्याने व्हेनेझुएलाच्या सीमा ओलांडून जगभरातील लोकशाहीप्रेमींना प्रेरणा दिली आहे. त्यांचा हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकशाहीसाठीच्या लढ्याला नवी चेतना देणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago