इच्छुकांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी चढाओढ
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. शहरात बड्या नेत्यांच्या बैठका, कार्यकर्त्यांचे मेळावे व रणनीती आखण्याचा धडाका सुरू आहे.
दरम्यान, यंदा दिवाळी सणावरही राजकीय फीव्हर चढल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील इच्छुक उमेदवारांकडून मतदारांशी जवळीक वाढविण्यासाठी विविध पद्धती अवलंबिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी दिवाळी पहाट व पाडवा पहाट कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतून पणत्या, दिवे व फराळ वाटप करत मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदा पिंपळपार, प्रमोद महाजन गार्डन, गंगापूर रोड, इंदिरानगर या भागांत दिवाळी पहाट कार्यक्रमांना विशेष उत्साह दिसून येत आहे. सकाळच्या गार वार्यात संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणाने सणासुदीचे वातावरण खुलून गेले आहे.
दिवाळी हा वर्षातील सवार्ंत आनंददायी सण असल्याने नागरिकांची तयारी जोमात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या तयारीलाही वेग आला आहे. शहरात दरवर्षी पारंपरिक पाडवा पहाट व सांज पाडवा कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र, यंदा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने प्रत्येक प्रभागात या कार्यक्रमांना राजकीय रंग चढला आहे. पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून इच्छुकांनी जनसंपर्क मोहिमेला वेग दिला आहे. या दिवाळीत राजकारण व उत्सवाचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.
मतदारांशी कनेक्टचा प्रयत्न
मतदारांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न दिवाळीच्या निमित्ताने केला जाणार आहे.
इच्छुकांच्या उत्साहामुळे मतदारांची दिवाळी मात्र गोड होईल, असे चित्र आहे.