उपद्रव शोध पथकातील 20 जणांची नियुक्ती
नाशिक : प्रतिनिधी
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्याचा ताण पायाभूत सोयी-सुविधांवर पडतो आहे. परिणामी शहरात अतिक्रमण, उघड्यावर कचरा फेकणे, उघड्यावर जनावरे बांधणे, विनापरवाना होर्डिंग्ज उभारणे, बांधकामाचा मलबा रस्त्यावर टाकणे, थुंंकणे आदी प्रकार दिसतात. दरम्यान, नागरिकांना शिस्त लावण्याकरिता मनपाच्या अतिक्रमण विभागात 73 माजी सैनिकांना कंत्राटी पद्धतीने (उपद्रव शोधपथक) नियुक्त केले आहे. आता या पथकातील 20 माजी सैनिकांवर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. पोलिस प्रशासनाच्या वाहतूक शाखेकडे या कर्मचार्यांना वर्ग केले जाईल.
शहरात कुठेही अस्वच्छता केल्यास किंवा शहर विद्रूपीकरणास कोणी कारणीभूत असल्यास त्यांचा उपद्रव पथकातील नियुक्त कर्मचारी शोधून काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करील. ही जबाबदारी कर्मचार्यांवर असेल. शहरात 2026-27 मध्ये सिंहस्थ कुंभमळा होणार आहे. अशावेळी मनपा प्रशासनाला मदतीच्या दृष्टीने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी उपद्रव शोधपथके निर्माण करण्याचा प्रस्ताव महासभेला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत दोन याप्रमाणे 12 पथके असतील. एक पथकप्रमुख असेल. या सर्व सहा पथकांवर नियंत्रणासाठी विशेष कार्य अधिकारी नेमला जाईल. जो माजी सैनिकांमधूनच नेमला जातील. शहरात अस्वच्छता करताना आढळल्यास संबंधितांकडून किती प्रशासकीय शुल्क आकारावे याबाबत मनपाने ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार पथक दंडात्मक कारवाई करेल. मनपा मुख्यालयास ई-गव्हर्नससोबत जोडता येऊ शकेल. दंडाची पावती फाडल्याबरोबर त्याची नोंद मनपाच्या ई-गव्हर्नस प्रणालीत होईल. सर्वसाधारणपणे अशा पथकांवर होणारा खर्च पथकातर्फे नागरिकांना आकारलेल्या प्रशासकीय शुल्कातूनच केला जाणार आहे.
दरम्यान, कचरा जाळणार्यांवर 25 हजार, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे दहा हजार, सार्वजनिक ठिकाणी थुंंकणे दीडशे रुपये, रस्त्यावर मलबा टाकणे पाच हजार रुपये, उघड्यावर लघुशंका करणे दीडशे याप्रमाणे या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे.
73 माजी सैनिकांवरील जबाबदारी याप्रमाणे…
20 कर्मचारी वाहतूक शाखेत
30 कर्मचारी विभागीय कार्यालयात
10 कर्मचारी मुख्यालयात
12 विभागीय प्रमुख
एकजण पथकप्रमुख असेल
स्वच्छता, अतिक्रमणासंदर्भात महापालिकेची जी कामे सोपवली जातील ती या पथकातील कर्मचार्यांना करावी लागतील. यात अनधिकृत होर्डिंंग्ज, बॅनर लावणार्यांवर दंडात्मक कारवाईसह अतिक्रमण मोहिमेत या पथकाची मदत घेतली जाईल.
– संगीता नांदुरकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, मनपा