इंदिरानगर : वार्ताहर
पैसे काढताना एटीएममध्ये विसरलेला मोबाइल फोन पोलिसांच्या मदतीने काही तासांत पुन्हा परत मिळाला. यामुळे मोबाइलधारकाने इंदिरानगर पोलिसांचे आभार मानले. अविनाश गोरे हे पाथर्डी फाटा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, तेथे त्यांचा रेडमी नोट येट या कंपनीचा 16 हजार रुपये किमतीचा मोबाइल ते विसरले.
एटीएममध्ये जाऊन मोबाइलचा शोध घेतला असता, मोबाइल तेथेे नसल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्वरित इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर डीबी पथकाने स्टेट बँकेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. परंतु, फुटेज अस्पष्ट होते. मात्र, तरीही पोलिसांनी फुटेजची सखोल पडताळणी केली. यावेळी दोन व्यक्तींनी मोबाइल उचलला असल्याचे त्यांना तपासादरम्यान समजले. त्यांच्याशी संपर्क केला असता मोबाइल सापडला. वेळेअभावी ते मोबाइल पोलीस ठाण्यात जमा करू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. महत्त्वाचे संपर्क क्रमांक व इतर माहिती असलेला मोबाइल पोलिसांच्या मदतीने तात्काळ मिळाल्याने गोरे यांनी पोलिसांचे आभार मानले.