भरभराटीतील कारखान्यात सभासद वगळता सर्वांनी साधले स्वत:चे हित
निफाड : आनंद जाधव
तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळावी, शेतकरी, शेतमजूर चाकरमान्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी कर्मवीरांनी अवघा तालुका पालथा घालत शेतकर्यांना साद घालत त्यांच्याकडून भांडवल उभे करीत निफाड साखर कारखान्याची उभारणी केली. साहजिकच या कारखान्याचा खर्या अर्थाने सभासद शेतकरी मालक झाला. सुरुवातीची काही दशके चांगली गेली. परंतु, जेव्हा कारखाना प्रतिकूल परिस्थितीत आला तेव्हा सभासद वगळता सर्वांनी स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. यात मालक असलेला सभासद मात्र दुर्लक्षित झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
‘निसाका’ची उभारणी करावयाचे ठरले तेव्हाचा काळ हा स्वस्ताईचा असला तरी तेव्हाची परिस्थिती बघता, ती रक्कम त्या काळी मोठी होती. त्यावेळी सोने अवघे 140 रुपये तोळा अन् निसाका सभासद फी होती दोन हजार रुपये. मात्र, आपल्या तालुक्यात साखर कारखाना उभा राहतो म्हणजे आपला ऊस गाळप होणार आणि आपल्याला त्यापोटी रोख रक्कम मिळणार तसेच साखर मिळणार आणि आपल्या पोरांना काम मिळणार, शिक्षणाची सोय होणार. हे सर्व हेरूनच त्यावेळी शेतकर्यांनी बायका, सुना-मुलांचे अंगावरील दागिने तसेच घरात होतं नव्हतं ते विकून कारखान्याचे शेअर्स घेतले. त्यावेळी 2457 शेतकर्यांनी कारखान्याचे शेअर्स घेत यातून मिळालेली रक्कम आणि काही दानशूर व्यक्तींच्या मदतीतून भागभांडवल उभे करण्यात आले. यातून कसबे सुकेणे, पिंपळस रामाचे शिवारातील 267 एकर जमीन खरेदी करण्यात आली अन् 26 जानेवारी 1961 रोजी कारखान्याचे रजिस्ट्रेशन केले. प्रत्यक्ष कारखाना उभारणीची पायाभरणी केली. अशा प्रकारे शेतकरी, कामगार, व्यावसायिक आणि तालुक्यातील नेत्यांचा ‘निसाका’ उभारणीसाठी हातभार लागला.
‘निसाका’चा पहिला गाळप हंगाम 1963-64 मध्ये झाला. त्यावेळी कारखाना 20 दिवस चालला आणि त्यातून 3441 मे. टन उसाचे गाळप करण्यात आले.पुढे उसाचे क्षेत्र वाढत गेले अन् कारखाना चार ते सहा महिने चालू लागला. तालुक्याच्या विकासाला गती मिळाली. परंतु, सहकाराचा झालेला स्वाहाकार यामुळे अनेकांनी यात हात धुण्याचा प्रयत्न केला. आज याच कारखान्याचे 35 हजार 212 सभासद असून, हेच दुर्लक्षित राहू लागला. त्यातच कारखान्यावर शाळा उभी राहते म्हटल्यावर कारखान्याची 28 एकर जमीन के. के. वाघ शिक्षण संस्थेला देण्यात आली. परंतु, पुढे कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यावेळी सभासदांना न विचारता बँकेने कारखान्याची
जप्ती केली.
‘निसाका’ म्हणजे सोन्याचा धूर या गोंडस बिरुदावलीच्या नावाखाली कारखाना काही कोटीच्या नफ्यात असताना गेस्ट हाउसवर संचालकांच्या पंक्ती, कारखान्याच्या गाड्यांमधून कारखाना अधिकारी आणि पदाधिकार्यांच्या सफारी, बारदान खरेदी, साखर विक्री, मशिनरी दुरुस्ती, सर्वसाधारण सभा, मासिक मीटिंगवर वारेमाप खर्च वाढू लागला. त्यातूनच ‘निसाका’चा नफा कमी झाला. पुढे गाळप घटले. कर्जाबरोबरच दुरावा वाढला. परिणामी, कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की ओढवल्याचे मत एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केले आहे.
कारखाना बंद पडल्याने सर्वाधिक नुकसान येथील व्यावसायिक आणि कामगारांचे झाले आहे. त्यामुळे येथील वसाहती ओस पडत आहेत. व्यवसायात बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. सुरक्षारक्षक नसल्याने चोर्यांचे प्रमाण वाढले. वीजबिल थकल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
– नाना पवार,
व्यावसायिक, भाऊसाहेबनगर
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…