‘आयमा इंडेक्स’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

नाशिक : प्रतिनिधी

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(आयमा)तर्फे आयोजित ‘आयमा इंडेक्स 2022’चे आज डोंगरे वसतिगृह मैदानावर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता उद्घाटन होणार आहे. चार दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन दि. 18 ते 21 मार्च  या कालावधीत नागरिकांना बघण्यासाठी खुले असणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन उद्योजकांना प्रोेत्साहन द्यावे, असे आवाहन प्रदर्शनाचे चेअरमन धनंजय बेळे आणि संघटनेचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केले.
प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटनास जिंदाल सॉचे अध्यक्ष दिनेशचंद्र सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, ग्रीनबेस आणि हिरानंदानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर नारायण, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. मैती उपस्थित राहणार आहेत.
परिसंवाद आणि चर्चासत्र
18 ते 21 मार्च या कालावधीत असणार्‍या ‘आयमा इंडेक्स 2022’ या प्रदर्शनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवादही होणार असून, यातून उद्योजकांसह नागरिकांना उद्योग क्षेत्राबाबत सविस्तर अशी माहिती मिळणार आहे.
प्रदर्शनात 355 स्टॉल्स
‘आयमा इंडेक्स 2022’ प्रदर्शनात 355 स्टॉल्स असणार आहेत. विशेष म्हणजे  पर्यावरणपूरक आणि नावीन्यपूर्ण स्टॉल्स ही या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये आहेत.

‘आयमा’चे सहावे प्रदर्शन
अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) ही संपूर्ण जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राचे गेल्या 30 वर्षांपासून नेतृत्व करते. आयमाचे जिल्ह्यात 2500 हून अधिक सदस्य असून, जिल्ह्यात 16 हजार इंडस्ट्रीज आहेत. उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळण्याच्या उद्देशाने सन 2005 पासून आयमातर्फे दर तीन वर्षांनी औद्योगिक प्रदर्शन भरविले जाते. आतापर्यंत आयोजित करण्यात आलेली सहाही प्रदर्शने धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.

आजपासून सुरू होणारे ‘आयमा इंडेक्स 2022’ हे  प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. उद्योजकांसह नागरिकांनीही प्रदर्शनाला उपस्थित राहावे. या प्रदर्शनातून नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
– धनंजय  बेळे, चेेअरमन,
आयमा इंडेक्स-2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *