पंकज पारख यांच्या कोठडीत वाढ,

पारख यांच्या सोन्याच्या शर्टचा शोध
नाशिक : प्रतिनिधी
येवला येथील सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पंकज पारख यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता आणखी 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली. पारख यांचा सोन्याचा शर्ट पोलिसांना हस्तगत करायचा आहे. त्यामुळे पोलिस या शर्टच्या शोधात आहेत.
फरार असलेल्या पारख यांना गुन्हे शाखेच्या पथकाने  नाशिकमध्ये एका प्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले होते.पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक  अजय जैन आणि संचालक मंडळाविरोधात  सहायक निबंधक प्रताप पाडवी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 21 कोटी 99 हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप पारख यांच्यावर आहे. पारख यांना गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यांना 10 फेबु्रवारीपर्यंत कोठडी देण्यात आली होती. मात्र,  पारख यांच्याकडून सोन्याचा शर्ट हस्तगत करणे बाकी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत कोठडी वाढवून दिली.
संशयित पारख हे आजारपणाचा फायदा घेत सोन्याचा शर्ट, कर्जाच्या कागदपत्रांबाबत काहीच माहिती देत नाहीत. ते किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत.पोलिसांनी पारख यांची संदर्भ सेवा रुग्णालयात  तपासणी केली असता त्यांना एक किडनी नसल्याचे निदान करण्यात आले आहे.  पारख यांनी सव्वा ते दीड कोटी रुपयांचा सोन्याचा शर्ट शिवलेला आहे या शर्टमुळेच त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. आता पोलिसांना तोच शर्ट हस्तगत करण्याचे मोठे आव्हान आहे. या गुन्ह्याचा तपास अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *