महाराष्ट्रावर स्वराज्याचा भगवा फडकणार

 

छत्रपती संभाजीराजे : 2024 ची निवडणूक लढणार

नाशिक :  प्रतिनिधी

 

मी चळवळीत काम करुन थकलोय.आता जनतेसाठी स्वराज्य संघटना निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून, 2024 ची निवडणूक स्वराज्य संघटना पूर्ण ताकदीनिशी लढेल, महाराष्ट्रावर स्वराज्याचा भगवा फडकविणारच, अशी घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी केली. गंगापूर रोड येथील गीता लॉन्स येथे आयोजित अभीष्टचिंतन सोहळयात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोेलत होते. यावेळी संभाजी राजे यांची ग्रंथ व पेढे तुला करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर मॉं साहेब  संयोगिताराजे छत्रपती, युवराज शहाजी राजे छत्रपती,  मुरलीधर पाटील,  सुनील बागूल,  माजी गटनेते विलास शिंदे,  डॉ. अशोक थोरात,  माजी नगरसेवक सलिम शेख,  ऍड. नितीन ठाकरे,  कारगिल योध्दा नायक दीपचंद नायर, करण गायकर, सुशिला गायकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व नाशिकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. राज्यातील नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य,  सरपंच यांचा राजेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  ढोल ताशांच्या गजरात केक कापण्यात आला. यावेळी राजे म्हणाले की, भगवा फडकवण्यासाठी आतापासूनच कामाला लागा.  सुसंस्कृत व सकारात्मक दृष्टिकोनातून स्वराज्य संघटना काम करणार आहे.  कुठल्याही राजकीय पक्षांना आमचा विरोध नाही. मात्र या पक्षाच्या बरोबरीने आता सत्तेत वाटा घेणार आहे. सामान्य जनतेचा मुख्यमंत्री हा स्वराज्याचा असणार आहे.  त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. एक नवा महाराष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्यातील गोरगरिब लोकांच्या समस्या व प्रश्‍न सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असे स्वराज्य स्थापन करण्यात येणार आहे.  छत्रपतींनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले ते पूर्ण करायचे असल्याचे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले.  52 वर्षा नंतर कोल्हापूर बाहेर वाढदिवस साजरा करण्यात आल्याने माझ्यासाठी हा वाढदिवस अविस्मरणीय असा राहणार आहे.

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की,  कोल्हापूर बाहेर पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराज यांचा वाढदिवस नाशकात साजरा होत असल्याचे आनंद होत आहे.  छत्रपती संभाजी महाराज,  युवराज शहाजी राजे, मॉं साहेब संयोगिताराजे छत्रपती  या एकाच व्यासपीठावर आल्याने त्रिवेणी संगम योग जुळून आला आहे.  सर्व नाशिककरांच्या वतीने राजेचे स्वागत करतो.  हा कोणा राजकीय पुढारी,मंत्री, मुख्यमंत्री यांचा वाढदिवस नसून हा आमच्या आराध्य दैवताचा लोकोउत्सव  असल्याचे सांगितले. महाराज आपण 70 टक्के महाराष्ट्राचा दौरा करत लोकांच्या समस्या व प्रश्‍न जाणून घेतले. 2024 मध्ये महाराष्ट्राची जनता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत.  राज्याची प्रतिमा आपणच बदलू शकत असल्याचे यावेळी गायकर म्हणाले. महाराष्ट्रातुन निवडणूक आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. नाशिकसह राज्यभरातून स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.  शाहीर स्वप्निल ढुमरे यांनी शाहिरी सादर केली.  सूत्रसंचालन शिप्रा मानकर यांनी  केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *