इंडियाच्या नेत्याची चर्चा
भाजपा किंवा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत झुंज देण्यासाठी इंडिया नावाच्या आघाडीत २८ पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या आहेत. चारही बैठकांमध्ये भाजपाचा संघटितपणे मुकाबला करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व पक्ष भाजपा किंवा नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे भाजपाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ३८ पक्ष असले, तरी भाजपा म्हणेल तसे करण्यास बाकीचे पक्ष तयार आहेत. त्यामुळे या आघाडीत फारसे मतभेद नाहीत. इंडिया आघाडीत काँग्रेस हाच सर्वांत मोठा पक्ष असला, तरी त्याचे सर्वच पक्ष ऐकून घेतात, असे काही नाही. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षित पीछेहाट झाल्याने काँग्रेसचे वजन कमी झाले आहे. तरीही काँग्रेसला वगळले, तर इंडिया आघाडीत राम राहणार नाही. देशातील सुमारे दोनशे लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस आणि भाजपा यांच्यातच सरळ सामना होणार आहे. बाकीच्या ३४३ मतदारसंघांत प्रादेशिक पक्षांची लढत भाजपा किंवा भाजपाच्या मित्र पक्षांशी होणार आहे. एका जनमत चाचणीनुसार भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी तिसर्यांदा सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. सध्याचे चित्रही तसेच दिसत आहे. तरीही इंडिया आघाडीने आशा सोडून दिलेली नाही. पण, ही आघाडी एकजीव असल्याचे दिसत नाही. संघटितपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी अजून तरी कोणताही ठोस निर्णय घेण्यात आघाडीला यश आलेले नाही. इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? यावर मतभेद आहेत. पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? हा प्रश्न ही आघाडी स्थापन झाल्यापासून उपस्थित केला जात होता. दिनांक १९ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. खरगे यांचे नाव सुचवून तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने आघाडीत एकजूट असल्याचा आणि काँग्रेसला विरोध नसल्याचा दाखला दिला. पण, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्यास या दोन पक्षांसह काही पक्षांचा विरोध असल्याचेही दिसून आले. पंतप्रधानपदाच्या चेहर्याबाबतही खरगेंनी स्पष्टीकरण दिले. आम्हाला आधी सर्वांना जिंकून यावे लागणार आहे. जिंकण्यासाठी काय करायचे आहे, याचा विचार करावा लागेल. पंतप्रधान कोण होणार, ही नंतरची गोष्ट आहे. खासदारच निवडून नाही आले तर पंतप्रधान ठरवून काय फायदा? त्यामुळे आधी आम्ही संख्या वाढवण्याकरता एकत्रितपणे लढून बहुमत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले होते. खरगे यांचे नाव समोर आल्यानंतर आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार नाराज असल्याची बातमी बाहेर आली. यावर त्यांनी खुलासा केला आहे. आम्ही सगळे एकत्र येऊन काम करत आहोत. खरगे यांच्या उमेदवारीबाबत नितीश कुमार नाराज नसल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. ज्याला पंतप्रधान व्हायचे असेल त्याने व्हावे, आपली इच्छा नव्हती. बैठकीत मी तेच सांगितले आहे, असे त्यांनी म्हणत नाराजीवर पडदा टाकला. खरगे यांना मात्र आघाडीतील निम्म्याहून अधिक पक्षांचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांनी खरगे यांचे नाव सुचविल्यानंतर कोणीही आक्षेप घेतला नाही. उलट, द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उध्दव ठाकरे यांच्यासह १६ हून अधिक पक्षांनी खरगेंना पाठिंबा दिला. मोदींना शह देण्यासाठी दलित चेहरा म्हणून खरगे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. पण, खरगे यांची अधिकृतपणे निवड झालेली नाही. पण, आघाडीला चेहरा असण्याची गरज नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केल्याचे समोर आले आहे. सन १९७७ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यावेळीही विरोधकांचे नेतृत्व कोण करणार, हे ठरले नव्हते. पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नाही, तर निवडणुकीचे निकाल विरोधात लागतील, असे बोलले जात होते. परंतु, तसे झाले नाही. जनतेला बदल हवा असेल तर ते वेगळा निर्णय घेतात. जनता सत्ताबदलाच्या मनःस्थितीत असतील तर काहीही होऊ शकते. अशा स्वरुपाचे मत शरद पवारांनी व्यक्त केल्याचे ‘इंडिया टुडे’ ने म्हटले आहे. शरद पवार नेहमीच इतिहासाचे दाखले देतात. पण, त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी यांच्या विरोधात एक जनआंदोलन उभे राहिले होते. हा एक इतिहास आहे. मोदींच्या विरोधात विरोधक बोलत असले, तरी जनआंदोलन उभे करण्यात आजच्या घडीला विरोधकांना यश आलेले नाही, हेही तितकेच सत्य. आघाडीला निमंत्रक किंवा समन्वयक असला पाहिजे, असा मुद्दा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १९ डिसेंबरच्या बैठकीपूर्वी उपस्थित केला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील आघाडीच्या बैठकीत हाच मुद्दा उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा देण्याचा प्रस्ताव मांडून. खरगेंचे नाव सुचवले होते. कोण नेता असावा, यावर एकमत होणार की नाही? हा प्रश्न बाजूला ठेवला, तरी जागा वाटपाचा तिढा कसा सोडवायचा आणि निवडणुकांच्या विजयाची रणनीती कशी आखायची, यासंदर्भात त्या बैठकीत चर्चा झाली. राज्यस्तरावर जागावाटप करण्याचा निर्णय झाला असला, तरी त्या दिशेने कोणत्याही राज्यात पावले उचलली गेलेली नाहीत. इंडिया आघाडीत चर्चा होत असते. पण, निर्णय होत नाही. पाच राज्याच्या निवडणुकांमुळे बराच वेळ गेला. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी बैठक झाली. पण, पुढची बैठक कधी, हे स्पष्ट नाही. भाजपाचा पराभव करण्यासाठी लहान प्रादेशिक पक्षांना जवळ करण्यास हरकत काय? असा सवाल राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत नुकताच व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला हरविण्यासाठी विरोधकांची एकजूट होणे आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. राहुल गांधींचे म्हणणे बरोबर असले, तरी प्रादेशिक आणि लहान पक्षांना योग्य वाटा देण्याची तयारी काँग्रेसने ठेवली, तरच जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल. पण, हे लवकर होण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…