आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन : उपचाराबरोबरच मानसिक आधारही

रुग्णांच्या सेवेत परिचारिकांचे महत्व अबाधित
नाशिक ः प्रतिनिधी
आरोग्याविषयक सेवांमध्ये डॉक्टर्सच्या बरोबरीने परिचारिकांची सेवाही तितकीच महत्वाची मानली जाते. रुग्णांना वेळेवर औषधे देण्याबरोबरच त्यांची सुश्रुषा  आणि रुग्णांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम परिचारिका करत असतात. कोरोना काळात तर घरच्या मंडळींपेक्षा रुग्णांची सर्वाधिक सेवा स्वत:चा जीव धोक्यात घालून परिचारिकांनीच केल्याने त्यांचे महत्व आजही कायम असल्याचे सिद्ध होते.
आजही  हॉस्पिटल, छोट्या दवाखान्यांमध्ये सेवा बजावण्यात परिचारिकाच अग्रेसर असल्याचे  पहावयास मिळते. रुग्णांचे उपचार योग्य वेळेत, योग्य प्रमाणात औषधांची मात्रा देणे याबरोबरच उत्तम सेवा देऊन रुग्णाला उपचारासोबत मानसिक आधार देण्याचेही काम परिचारिका करीत असतात. परंतु गरज सरो आणि वैद्य मरो उक्ती प्रमाणे संकटातच हक्काची मदत हवी अशी मानसिकता समाजाची असते. मात्र समाजात त्यांच्या कामाचे कौतुक केले जात नसल्याचे चित्र आहे.त्यांच्या सेवेला कायम दुय्यम स्थान देण्यात आले आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या लाटेत घरादारचा,मुलांचा विचार न करता कर्तव्य समजून सेवा दिली.कोरोना वॉरिअर्स म्हणून काम केले आणि अनेकांचे प्राण वाचविले.सेवा देतांना आपले कुटूंब,घर,मुले,शेजारी,नातेवाईक या कोणाची पर्वा न करता कोरोनाच्या संकटात भरीव योगदान दिले.अशा परिचारिका,नर्स,सिस्टर्सवर अनेक ठिकाणी हल्ले देखील झाले. तरीही मागे न हटता रुग्णांवर उपचार करणे सुरूच ठेवले.अजूनही रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कर्तव्य करीत आहेत.
या परिचारिकांना मानधन,निवास,आर्थिक स्थैर्यता याबाबतीत अजूनही उदासीनता असल्याचे दिसून येते.परिचारिका या आरोग्ययंत्रणेच्या कणा आहेत.सुश्रुषा करणे,डॉक्टरांनी दिलेले उपचार योग्यवेळी योग्य प्रमाणात परिचारिका देतात.त्यामुळे रुग्णाला आजारच्या अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे काम परिचारीक करतात.
डॉ.अशोक थोरात (जिल्हा शल्यचिकित्सक)

का साजरा करतात हा दिवस?
1971 मध्ये आंतराष्ट्रीय नर्स परिषदेचे आधुनिक नर्सिंग च्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला त्या दिवसाला जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून संपूर्ण जगात 12 मे ला जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. परिचारिका म्हणजे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करणारी व्यक्ती, त्यांना वेळोवेळी लागणार्‍या गोष्टी पुरवणारी व्यक्ती, रुग्णांची चांगल्या प्रकारे निगा राखणारी व्यक्ती, या व्यक्तींचा मेडिकल क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *