दरवर्षी शाळांमधून विविध नेते, कलावंत, संत, प्राचीन राजे, समाजसुधारक, वैज्ञानिक, क्रांतिकारक, लेखक कवी, राजकीय नेते, उद्योजक, खेळाडू यांच्या कार्याचे स्मरण व्हावे, त्यातून प्रेरणा मिळावी, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून शाळांमधून तसेच वेगवेगळ्या कार्यालयांतून त्यांची जयंती- पुण्यतिथीसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण त्यांच्याविषयी माहिती बर्याचदा नसते, मग शोधाशोध सुरू होते अशावेळी ही माहिती एकाच पुस्तकात उपलब्ध असेल तर ? याचा विचार करून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आश्रमशाळेतील एका गुणी शिक्षकाने याचा विचार करून अथक परिश्रम घेऊन ही माहिती मोठ्या कष्टाने जमा करून एक चांगले पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याचे नाव आहे 366 ‘कीर्तिवंतांचा परिचय’. ज्यात वर्षभरातील 365 दिवस व लिप वर्षातील 366 दिवस असे वर्षभर रोज एक याप्रमाणे जवळपास सर्वच क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींच्या कार्याची माहिती समाविष्ट असल्याने हे पुस्तक प्रत्येक शाळेत, सार्वजनिक वाचनालय, एमपीएससी परीक्षा क्लास, विविध शासकीय कार्यालयांसाठी असणे गरजेचे वाटते. हे पुस्तक म्हणजे आपल्या सर्वच क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा अनमोल ठेवाच आहे. लेखकाने खूप मेहनत घेऊन हे पुस्तक साकार केल्याने या पुस्तकाची नोंद वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स, गोल्डन बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड्स, वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स यासारख्या जगातील नामांकित संस्थांनी या पुस्तकाचा गौरव केला हे विशेष !! आदिवासी भागातील आश्रमशाळेतील एक विज्ञानाचा शिक्षक या प्रकारचे संकलन करून सर्वांना उपयुक्त ठरेल असे पुस्तक प्रकाशित करतो हे नक्कीच अभिमानास्पद आहे. या पुस्तकाची दखल शैक्षणिक क्षेत्रातील अधिकार्यांनी घेऊन त्यास शुभेच्छा दिल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी प्रामाणिकपणे काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. अशा अभ्यासू आणि सर्वांना समजावून घेणार्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना दिली यातच सर्व आले.
एक शिक्षक आपली जिज्ञासूवृत्ती जोपासून अनेक व्यक्तींची चरित्रे अभ्यासतो आणि त्यातून निवडक व उपयुक्त प्रेरणादायी माहिती संक्षिप्त करून त्याचे संकलन करतो हेच कौतुकास्पद आहे, असे डॉ. काळे यांनी म्हटले आहे. सार्या कीर्तिवंतांचा इतिहास वाचणे शक्य नाही. मात्र, विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती त्यांचा कार्यकाल तरी माहिती असावा याची दखल लेखकाने घेतली आहे.अशा व्यक्तींचा परिचय विद्यार्थी व विविध परीक्षांना सामोरे जाणार्या तरुणांसाठी हा ग्रंथ निश्चितच मार्गदर्शक ठरेल. तो शाळांनी उपलब्ध करून घ्यावा व विद्यार्थ्यांपुढे आणला तर विद्यार्थी चिंतन करतील व तो आदर्श डोळ्यासमोर ठेवतील हेही खूप पुरेसे आहे. या कीर्तिवंतांमधील जिद्द, चिकाटी, सातत्य, शूरत्व, वीरत्व, नेतृत्व, शिक्षण, विचार, आदर या गुणांचा परिपोष विद्यार्थी, पालक, व समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी ताराचंद मेतकर या शिक्षक लेखकाने प्रयत्न केला आहे.
शेवटी शिकेल तो टिकेल, टिकेल तो जगेल, जगेल तो आदर्श बनेल हे तितकेच सत्य आहे. यामुळे चांगले वाचावे व वेचावे या उक्तीनुसार अवास्तव माहितीचा पसारा दूर करून सहजपणे कीर्तिवंतांचा परिचय लेखकाने करून दिला आहे.
-प्राचार्य के. के. अहिरे
9960603182