इडा पीडा टळो, नासाकाला गतवैभव मिळो!

कर्जबाजारीपणामुळे गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेला नासिक सहकारी साखर कारखान्याची चाके फिरणार आहेत. नासाका पुन्हा सुरू होणार असल्यामुळे या भागातील अर्थकारणाला पुन्हा एकदा गती तर प्राप्त होणारच आहे. शिवाय उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेली घट पुन्हा एकदा भरून निघणार आहे. गांवकरीचे संस्थापक संपादक द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांनी त्यावेळच्या समाजधुरिणांच्या मदतीने ङ्गनासाकाफरूपी रोपटे लावले. त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. मात्र, मधल्या काळात कारखान्याची अवस्था कर्जामुळे वाईट झाली. हा कारखाना सुरू व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. परंतु कर्जाच्या वाढत्या बोजामुळे अडचणी येत होत्या. आता सर्व अडचणींवर मात करून दीपक चंदे आणि खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून कारखाना सुरू होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी ङ्गआजि सोनियाचा दिनुफ अशीच भावना आहे.
नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर अशा चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नासिक सहकारी साखर कारखान्याची 1070 ला पत्रमहर्षी द. श. तथा दादासाहेब पोतनीस, राजारामजी पाटील, निवृत्तीराव गायधनी, गणपतराव पेखळे,  निवृत्ती डावरे,  पोपटराव पिंगळे,  रुंजा पाटील, जयवंत कोशिरे, विठ्ठलराव अरिंगळे, लक्ष्मणराव हारक, हरिभाऊ सोनवणे, रामराव शिंदे आदी सहकार्‍यांनी  15 ऑक्टोबर 1070 ला मुहूर्तमेढ रोवली. तत्कालीन केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या मदतीमुळे दादासाहेब आणि त्यांच्या सहकार्‍यांना कारखान्याचा परवाना मिळविण्यासाठी फारशी अडचण भासली नाही. कारखान्याला मान्यता मिळाल्यानंतर दादासाहेब आणि त्यांच्या सहकार्‍यांनी चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला कारखान्याचा परिसर पिंजून काढला. शेअर्स जमा करून भागभांडवल उभे केले.  त्यानंतर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. कारखाना उभारणीच्या चळवळीमध्ये दादासाहेबच अग्रणी होते. त्यामुळे साहजिकच पहिले चेअरमन होण्याचा बहुमानही त्यांनाच मिळाला. त्यावेळी सत्तेसाठी अथवा पदासाठी आजच्या इतकी स्पर्धा नव्हती. सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र येऊन निर्णय घेत. कारखान्याच्या मालकीची भव्य जागा आणि मुबलक उसाचे क्षेत्र यामुळे कारखान्याची वाटचाल प्रगतीपथाकडे सुरू झाली. 304 एकराचा कारखान्याचा परिसर असल्याने या भागात कारखान्यामुळे विकासाला मोठे बळ प्राप्त झाले. दारणा, कडवा, वैतरणा, वालदेवी, काश्यपी, देवनदी, गोदावरी अशा नद्यांमुळे नाशिक तालुक्याचा परिसर सुजलाम् सुफलाम् झालेला होताच. त्यातच कारखाना झाल्यामुळे या भागातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढीला लागले. या भागातील शेतकर्‍यांचे ऊस हेच मुख्य पीक बनले. कारखान्याची चाके फिरू लागल्याने या भागातील विकासालाही गती प्राप्त होऊ लागली. तथापि, काळ बदलला.. गोदा-दारणातून बरेच पाणी वाहून गेले. कारखान्याची सूत्रे नंतरच्या पिढीकडे येत गेली. शेतकरी उसाऐवजी इतर नगदी पिकांकडे वळू लागले. कारखान्याला उसाची कमतरता भासू लागली. त्यामुळे तत्कालीन चेअरमन ऍड. उत्तमराव ढिकले यांनी कारखाना कार्यक्षेत्रात शेतकर्‍यांनी ऊस लागवड करावी म्हणून पदयात्रा काढली. कारखाना सुरळीत सुरू असताना कारखान्यात वर्चस्ववादाला तोंड फुटले. गटातटाचे राजकारण सुरू झाले. कधी उत्तमराव ढिकले, कधी देवीदास पिंगळे तर कधी तुकाराम दिघोळे अशा गटातटाच्या राजकारणात कारखान्याच्या प्रगतीला खीळ बसू लागली. कारखान्यात राजकारणाने कळस गाठला. निवडणुकांमध्ये कारखान्याच्या प्रगतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. सत्ता मिळविण्यासाठी साम-दाम- दंड-भेद नीतीचा अवलंब सुरू झाला. या राजकारणात कारखान्याला उतरती कळा लागली. जिल्हा बँकेकडून उचललेल्या कर्जाचा डोंगर वाढू लागला. आणि कर्जाच्या दलदलीत कारखाना घट्ट रुतला. त्यानंतर कारखान्याला जिल्हा बँकेने टाळेच लावले. कर्ज भरू न शकल्याने 2012-13 चा हंगाम हा ङ्गनासाकाफचा अखेरचा हंगाम ठरला. त्यावेळी सत्तेवर असलेल्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने 29 एप्रिल 2015 ला कारखान्यावर प्राधिकृत मंडळाची शासनाने नेमणूक केली. त्यानंतर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. मात्र, प्रत्येकवेळी काही ना काही अडचणी येत गेल्या. 8 जानेवारी 2017 ला माजी चेअरमन तानाजी गायधनी यांच्या नेतृत्वाखाली अकरा जणांची शासनाने नेमणूक केली. कारखाना सुरू होण्याच्या प्रयत्नांना गती प्राप्त होत असतानाच पुन्हा माशी शिंकली आणि हे संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर जिल्हा बँकेच्या अवसायकाची नियुक्ती करण्यात आली.
एक चांगल्या कारखान्याची अशी अवस्था पंचक्रोशीतील सभासदांना हळहळ करावयास लावत होती. मधल्या काळात जिल्ह्यातीलच रानवड साखर कारखाना पिंपळगाव बसवंतच्या अशोक बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने चालविण्यास घेतला. त्यामुळे रानवड चालू होऊ शकतो तर ङ्गनासाकाफ का नाही? म्हणत नासाका सुरू करण्याच्या प्रयत्नांना वेग आला. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर अनेकांनी निविदा भरल्या. दीपक चंदे आणि खा. हेमंत गोडसे यांनीही त्यासाठी निविदा भरल्या. त्यांच्या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कारखान्याचे गेट उघडण्यात आले. अवसायक हटून आता कारखान्यात चंदे आणि कंपनी कारखान्याची सूत्रे स्वीकारणार आहेत. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असले तरी मधल्या काळात ऊस देण्यासाठी या भागात कारखानेच नसल्याने उसाखालील लागवड क्षेत्र घटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना ऊस लागवडीसाठी प्रवृत्त करावे लागणार आहे. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याबरोबरच दादासाहेब पोतनीसांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याबरोबरच कारखान्याला गतवैभव मिळून देण्याची जबाबदारी चंदे आणि खा. गोडसे यांची आहे. त्यात ते यशस्वी व्हावेत, यासाठी शुभेच्छा!

-भागवत उदावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *