लोकांना कोणतीही व्यवस्था कायमस्वरूपी नको असते. वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने असणारे कायदे लोकांना नको असतात. व्यवस्थेच्या विरोधात लोक आवाज उठवतात. बदल घडवून आणण्यासाठी रस्त्यावर उतरतात. लोकशाही देशांत निवडणुकांच्या माध्यमातून बदल घडवून आणता येतो; परंतु हुकूमशाही आणि धार्मिक सत्ता असलेल्या देशांत बदल घडवून आणण्यासाठी लोक संघर्ष करतात, तेव्हा सरकार किंवा व्यवस्था आंदोलन चिरडून टाकण्यास मागेपुढे पाहत नाही. इस्लामिक सत्ता असलेल्या इराणमध्ये हेच सुरू आहे. इराणमध्ये 1979 साली क्रांती झाली. इस्लामिक क्रांती म्हणून ती ओळखली जाते. या क्रांतीने शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्या राजवंशाला उलथवून टाकले. इराणी लोकांना आता पुन्हा एकदा याच राज वंशाच्या वारसाकडे सत्ता द्यावीशी वाटत आहे. क्राउन प्रिन्स म्हणून ओळखले जाणारे रझा पहलवी यांच्या हाती देशाची सूत्रे दिली जावीत, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे. इराणमध्ये महागाई वाढली आहे. लोक निदर्शने करत आहेत. लोकांना क्राउन पिन्स रझा पहलवी यांचा उघड पाठिंबा असून, त्यांनाही तेथील इस्लामिक राजवट उलथवून टाकायची आहे. त्यासाठी ते अमेरिकेची मदत घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. इराण आणि अमेरिका यांच्यात मोठे शत्रुत्व आहे. इराणकडे अण्वस्त्रे आहेत. पॅलेस्टाइन-इस्रायल संघर्षात इराण पॅलेस्टाइनच्या बाजूने असून, अमेरिका आणि इस्रायलला इराणला नेस्तनाबूत करायचे आहे. अशा परिस्थितीत निदर्शनांना अमेरिकेचा पाठिंबा आहे. इराणवर हल्ला करण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे. ट्रम्प यांची धमकी, त्यांनी निदर्शनांना दिलेला पाठिंबा, तसेच पहलवी यांचे मिळत असलेले बळ पाहता इस्लामिक राजवट धोक्यात आली आहे. शाह मोहम्मद रझा पहलवी यांना अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखालील व्यापक विरोध झाला होता. त्यावेळी जमीन सुधारणा आणि आधुनिकीकरणाच्या धोरणांना धार्मिक नेत्यांचा विरोध होता. शाह यांचे अमेरिका पुरस्कृत शासन, आर्थिक असमानता आणि दडपशाहीमुळे जनता संतप्त झाली होती. त्यामुळे 1978 मध्ये मोठी निदर्शने झाली आणि संप सुरू झाले. 16 जानेवारी 1979 रोजी शाह पहलवी देश सोडून गेले, तर 1 फेब्रुवारी 1978 रोजी खोमेनी फ्रान्सहून परतले. 11 फेब्रुवारीला तेहरानमधील चकमकीनंतर क्रांती यशस्वी झाली आणि इस्लामिक रिपब्लिकची स्थापना झाली. खोमेनी यांना इराणचे
सर्वोच्च धार्मिक नेते म्हणून घोषित करण्यात आले. त्यांनी धार्मिक शासनाची पायाभरणी केली. धार्मिक सत्तेला आता आव्हान दिले जात असून, क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक सत्ता खाली खेचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. इराणमधील विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईमुळे जनतेचा संताप अनावर झाला असून, सरकारविरोधी आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे.
सर्वोच्च नेते खोमेनी यांच्या प्रशासनाने हे आंदोलन दडपण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले; परंतु आंदोलकांचा जोर कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. रझा पहलवी यांनी इराणमध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रस्थापित व्हावी, अशी मागणी केली आहे. रझा पहलवी हे इराणच्या राजघराण्यातील वारसदार आहेत. सन 1979 च्या ऐतिहासिक इस्लामिक क्रांतीपूर्वी ते इराणचे ‘क्राउन प्रिन्स’ म्हणून ओळखले जात होते. वयाच्या 17 व्या वर्षी ते लष्करी प्रशिक्षणासाठी अमेरिकेला गेले असताना इराणमध्ये सत्तापालट झाला आणि त्यांच्या कुटुंबाला देश सोडून परागंदा व्हावे लागले. तेव्हापासून ते निर्वासित जीवन जगत असून, सध्या अमेरिकेतून इराणमधील लोकशाहीसाठी प्रयत्न करत आहेत. सध्या सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये काही आंदोलक जुन्या राजेशाहीच्या पुनरागमनाच्या घोषणा देत असल्याने सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा पहलवी कुटुंबाकडे लागले आहे. पहलवी यांच्या आवाहनानंतर तेहरानच्या रस्त्यांवर निदर्शकांची मोठी गर्दी होत आहे. ‘हुकूमशाही मुर्दाबाद’ आणि ‘इस्लामिक प्रजासत्ताक संपवा,’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. वाढता जनक्षोभ पाहून इराण सरकारने अनेक शहरांमधील इंटरनेट आणि संपर्काची साधने खंडित केली. निदर्शने तिसर्या आठवड्यातही सुरू आहेत. निदर्शनांमध्ये पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दहा हजार 600 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेचे रझा पहलवी यांनी स्वागत केले असून, त्यांचे आभार मानले आहेत. आंदोलन सत्तापालटाच्या दिशेने जात आहे. याआधी 2022 साली इराणमध्ये महिलांनी हिजाबविरोधी आंदोलन करून हिजाब वापरणे बंद केले होते. इराणी महिला आता अत्यंत निर्भयपणे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या जळत्या फोटोंवरून सिगारेट पेटवताना दिसत आहेत. महिला केवळ सिगारेट पेटवत नाहीत, तर त्यासोबत आपले हिजाब आणि स्कार्फही जाळताना दिसत आहेत. इराणच्या कायद्यानुसार, सर्वोच्च नेत्याचा फोटो जाळणे हा राजद्रोहाचा गुन्हा असून, यासाठी फाशीची शिक्षाही होऊ शकते. तरीही मृत्यूची भीती सोडून महिलांनी अशा प्रकारे सिगारेट पेटवणे, हे तिथल्या धार्मिक राजवटीच्या अंताचे संकेत मानले जात आहेत. इराणमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यापासून सामाजिक आणि कायदेशीररीत्या प्रतिबंध आहे. हिजाब व्यवस्थित न घातल्यामुळे महसा अमिनी नावाच्या महिलेला 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही ठिणगी आता वणव्यासारखी पसरली आहे. डिसेंबर 2025 च्या अखेरीस वाढत्या महागाईमुळे सुरू झालेली ही निदर्शने आता वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या मागणीसाठी उग्र रूप धारण करत आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. राजधानी तेहरानसह 27 प्रांतांमधील जनता रस्त्यावर उतरली आहे. तेहरानमध्ये पाच लाख लोक आंदोलन करीत आहेत. सरकारच्या दडपशाहीत आतापर्यंत 2,500 सैनिकांसह 217 हून नागरिकांचा बळी गेला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. 2,300 जणांना अटक करण्यात आली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी या निदर्शनांसाठी थेट अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले असून, सुरक्षा दलांना ‘दंगलखोरांना धडा शिकवा’ असे स्पष्ट आदेश दिले आहेत. दरम्यान, इराणमध्ये अमेरिका लष्करी हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांत इराणमध्ये सत्तापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत. आणखी एका क्रांतीच्या उंबरठ्यावर इराण उभा आहे. निदर्शकांची हत्या सहन केली जाणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणी सरकारला दिला आहे. ट्रम्प यांनी इराणी लोकांना त्यांची निदर्शने सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. इराणमधील धार्मिक सत्ता उलथवून टाकण्यासाठी क्राउन प्रिन्स रझा पहलवी निदर्शकांना पाठिंबा देत आहेत. त्यांना ट्रम्प यांचाही पाठिंबा असून, इराणमधील धार्मिक सत्ता उद्ध्वस्त करण्याचा अमेरिकेचा इरादा आहे.
Iran on the brink of revolution
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…