शिकचा तपोवन परिसर हा धार्मिक-सांस्कृतिक इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. येथे उभे असलेले वृक्ष केवळ हरितसंपत्ती नव्हेत, तर नदीकाठच्या सामाजिक स्मृतींचे आणि सांस्कृतिक सातत्याचे साक्षीदार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली ‘विकास’ म्हणून जे काही घडते आहे, त्यात सर्वांत मोठा बळी ठरतो आहे तो निसर्गाचा आणि संवेदनांचा. वृक्षतोड फक्त पर्यावरणीय नुकसानीपुरती मर्यादित राहत नाही, ती इतिहास आणि स्थानिक ओळख यांनाही धक्का देते.
मी एक नाशिककर. तपोवनाच्या घनदाट छायेखाली आणि गोदामाईच्या अमृतमय प्रवाहाच्या सान्निध्यात माझे बालपण वाढले. आम्हा नाशिककरांसाठी, गोदावरीच्या तीरावरील प्रत्येक झाड केवळ एक वृक्ष नाही, तर ते तीर्थ आणि वन या भारतीय संस्कृतीतील दोन पवित्र संकल्पनांचा संगम आहे.
आपण तपोवन म्हणतो …तपस् याचा अर्थ तपस्या, साधना, ध्यान. वन याचा अर्थ जंगल, अरण्य किंवा झाडी असलेला परिसर असा आहे. तपोवन या शब्दाचा अर्थ पाहता, 1800 झाडे तोडणे म्हणजे तपासाठी येणार्या साधूंचं वन नष्ट करणे आहे. हा केवळ निसर्गाचा नाश नाही, तर त्या पवित्र जागेचा तपस्येचा मूळ आधारच नष्ट करणे आहे. आज जेव्हा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकास नावाच्या एका अदृश्य भीतीने या झाडांवर कुर्हाड चालवण्याची तयारी सुरू होते, तेव्हा केवळ एक नागरिक म्हणून नाही, तर शाश्वत मूल्यांची पाईक म्हणूनही मन दुःखी होते आहे.
नाशिकची पंचवटी केवळ एक भौगोलिक परिसर नाही, तर तिची ओळख थेट वृक्षांवर आधारित आहे ती म्हणजे पाच वडांच्या झाडांचा समूह. ज्या ठिकाणी वडाच्या वृक्षांच्या (वटवृक्ष) नावाने संपूर्ण परिसर ओळखला जातो आणि याच वृक्षांच्या छायेखाली भव्य श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि इतर अनेक आध्यात्मिक मंदिरे उभी आहेत, त्याच नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली झाडांवर कुर्हाड चालवणे हा नाशिकच्या मूळ वृक्षाधारित आध्यात्मिक अस्मितेवरच केलेला मोठा आघात आहे. प्रभू श्रीराम आणि सीतामाई ज्या पवित्र नाशिकमध्ये वास्तव्यास होते, तिथली वनसंपदा तोडणे म्हणजे कोट्यवधी नाशिककरांच्या आस्थेला दुखावणं आहे. हे वृक्ष केवळ नैसर्गिक संपत्ती नसून, ते येथील धार्मिक श्रद्धेचे आणि हजारो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. वृक्षतोडीमुळे होणारे नुकसान भौतिक नाही, ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणाचे देखील आहे. जसे बाळ आईच्या दुधावर वाढते, तसेच ही झाडं गोदावरीमाईच्या अमृतमय पाण्यावर वाढलेली आहेत. त्यांची तोड करणे म्हणजे गोदामाईचे वात्सल्य आणि साधू-संतांच्या तपश्चर्येचा अपमान आहे. यापूर्वीही जेव्हा कुंभमेळा भरला, तेव्हा याच वृक्षांच्या शीतल छायेखाली साधू-संतांची तपश्चर्या झाली. तेव्हाची पिढी अधिक प्रगल्भ होती. कारण त्यांनी तात्पुरत्या सोयीसाठी झाडांना हात लावला नाही. ती झाडं तेव्हा विकासाच्या आड आली नाहीत, तर धर्माची अस्मिता ठरली. आज आपण विसरतो आहोत की, सिमेंटच्या तात्पुरत्या रचना नदी आणि वृक्षांच्या शाश्वत अस्तित्वाला कधीही मागे टाकू शकत नाहीत.शाश्वत विकास….शून्य वृक्षतोड हे नैतिक आणि धार्मिक बंधन असावे.
आज रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक पत्रकार, वकील आणि पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून नाशिककर प्रशासनाला शाश्वत विकास या तत्त्वाची आठवण करून देत आहोत. हा केवळ विरोध नाही, तर प्रशासकीय दूरदृष्टीची मागणी आहे : शून्य वृक्षतोड धोरण…हे केवळ प्रशासकीय धोरण नसावे, तर नैतिक आणि धार्मिक बंधन म्हणून त्याची अंमलबजावणी व्हावी. कुंभमेळ्याच्या कामांसाठी एकही झाड तोडले जाणार नाही, हे प्रशासनाने धार्मिक कर्तव्य म्हणून तातडीने घोषित करावे.
जल, जंगल, जमीन संरक्षण
कुंभमेळ्याच्या माध्यमातून केवळ धार्मिक विधी नव्हे, तर जल, जंगल, जमीन रक्षणाचा जागतिक संदेश प्रसारित करण्याची ऐतिहासिक संधी प्रशासनाने घ्यावी. झाडे तोडून मिळवलेला विकास हा तात्पुरता आणि विनाशकारी असतो, तर झाडे वाचवून केलेला विकास हाच शाश्वत असतो. व्यवस्थापनासाठी पर्यायी आणि वृक्षस्नेही उपाय अवलंबले जाऊ शकतात…साधुग्रामचे विकेंद्रीकरण आणि हलवता येणार्या रचना केली तर साधुग्रामसाठी फक्त एकाच ठिकाणी मोठी जागा आरक्षित न करता, त्याची विभागणी करावी. तसेच, निवासस्थानांसाठी आणि सुविधांसाठी सिमेंटकाँक्रीटऐवजी तात्पुरत्या आणि पुन्हा वापरता येणार्या मॉड्युलर रचनांचा वापर करावा. हे घटक काम संपल्यावर सहजपणे काढता येतात आणि भविष्यात पुन्हा वापरता येतात, ज्यामुळे जमिनीला व झाडांच्या मुळांना कायमस्वरूपी हानी पोहोचत नाही. उंच केलेले बांधकाम किंवा हलके प्लॅटफॉर्म वापरून वृक्षांच्या मुळांना हानी न पोहोचवता तात्पुरती व्यवस्था करता येईल. वृक्ष-स्नेही पायाभूत सुविधाचा विचार करून, रस्त्यांचे डिझाइन करताना, वृक्ष मध्यभागी ठेवून त्याभोवती वर्तुळाकार मार्ग तयार करावेत, ज्यामुळे झाड वाचते आणि ते सौंदर्यात भर घालते.
प्रत्यारोपण तंत्रज्ञान अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत, झाडांना तोडण्याऐवजी वृक्ष प्रत्यारोपण तंत्रज्ञानाने सुरक्षितपणे दुसरीकडे स्थलांतरित करावे. (परंतु प्रशासनाने शून्य वृक्षतोड धोरणच अंमलात आणण्यासाठी कटिबद्ध असावे.) वृक्षतोडीचा शास्त्रीय आधार आणि आर्थिक नुकसान यांंचा जर विचार केला तर वृक्षतोडीमुळे होणारे नुकसान केवळ भावनिक नाही, तर ते शास्त्रीय आणि मोठे आर्थिक नुकसान आहे. कार्बन शोषण क्षमता… एक परिपक्व वृक्ष वर्षाला सरासरी किमान 9 ते 22 किलोग्रॅम कार्बन-डाय-ऑक्साइड शोषून घेतो. तपोवनातील 1800 जुने वृक्ष वर्षाला अंदाजे 16 टन (16,000 किलोग्रॅम) कार्बन-डाय-ऑक्साइड शोषून वातावरण शुद्ध करण्याचे काम करतात. निष्कर्ष..1800 वृक्षांची कत्तल म्हणजे वातावरणातून शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता 16 टनांनी तत्काळ घटवणे होय. पर्यावरणाची ही हत्या नाशिकच्या हवामानावर विपरीत परिणाम करेल.
एका मोठ्या वृक्षाचे वार्षिक पर्यावरणीय मूल्य (हवा शुद्धीकरण, पाणी साठवण, मातीची धूप थांबवणे) 50 हजारांपेक्षा अधिक असू शकते. अंदाजित नुकसान… 1800 वृक्षांची तोड म्हणजे नाशिकचे वार्षिक नऊ कोटींहून अधिक किमतीचे नैसर्गिक संरक्षण कायमस्वरूपी गमावणे आहे.
जैवविविधता तपोवनात मुख्यतः वड, पिंपळ, कडुलिंब यांसारख्या स्थानिक प्रजातीचे वृक्ष आहेत. या वृक्षांवर अवलंबून असलेल्या शेकडो पक्षी व वन्यजीवांचा आश्रय नष्ट होईल. 1800 झाडांची तोड करणे म्हणजे केवळ हरितसंपदा गमावणे नाही, तर ते वर्षाला सुमारे 16 टन कार्बन- डाय-ऑक्साइड शोषून घेण्याची निसर्गाची नैसर्गिक क्षमता नष्ट करणे आहे आणि तात्पुरत्या सिमेंटच्या बांधकामासाठी होणारे नऊ कोटींहून अधिक किमतीचे कायमस्वरूपी नैसर्गिक नुकसान आहे. झाडे वाचवून केलेला विकास हाच शाश्वत असतो. आम्ही नाशिककर आहोत, आणि आमची ओळख या वृक्षांमध्ये दडलेली आहे. आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे हे कृत्य थांबवावे. वृक्षतोड नाही, तर वृक्षसंवर्धन.., येणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा हाच जागतिक संदेश असू द्या…’माझे हरित नाशिक ही माझी जबाबदारी…’
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…