शिवाजीनगर घरफोडीतील 23 लाखांचे दागिने परत

शिक्षक दाम्पत्याकडून पोलिसांचे आभार

सिडको : प्रतिनिधी
घरफोडीतील सुमारे 23 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने परत मिळवून दिल्याने शिक्षक दाम्पत्याने गुन्हेशाखा अंबड युनिट-3च्या पथकाचे आभार मानले. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
प्रदीप रामदास आहिरे (वय 51, रा. शिवाजीनगर) हे 23 एप्रिल रोजी कुटुंबासह परभणी येथे गेले होते. 25 एप्रिल रोजी पहाटे घरी परतल्यानंतर त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरी केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हेशाखा अंबड युनिट-3 चे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. सलग तीन दिवस परिसरातील 55 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत गोपनीय माहितीच्या आधारे सराफ बाजार परिसरात सापळा रचण्यात आला.
या कारवाईत अमोल रामलाल हाटकर (वय 29) आणि संजय ऊर्फ भुर्‍या रमेश दुबे (वय 40, दोघेही रा. शिवाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 22 लाख 94 हजार 895 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या उपस्थितीत हा मुद्देमाल फिर्यादी दाम्पत्याला परत करण्यात आला. आयुष्यभराच्या कमाईतून तयार केलेले दागिने पुन्हा मिळाल्याने दाम्पत्य भावुक झाले होते. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

Jewelry worth Rs 23 lakhs recovered from Shivajinagar house burglary

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *