*
नाशिक – प्रतिनिधी
मूल्यसाखळी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व भागधारक शेतकऱ्यांना विविध नावीन्यपूर्ण कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र व ईतर संस्था यांनी केलेल्या संशोधनाचा, विक्री व्यवस्था, प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास व्हावा यासाठी गुजरात राज्याचा अभ्यासदौरा कृषि विभाग व आत्मा अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कळवण येथील कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनीचा देखील समावेश होता.
महाराष्ट्र शासन कृषि विभाग व जागतिक बँक अर्थ सहाय्यित मा बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत निवड झालेल्या नाशिक जिल्ह्यातील २६ शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे.
दिनांक २ मार्च ते ८ मार्च या ७ दिवसाच्या कालावधी मध्ये या २६ शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रत्येकी ५ शेतकरी असे एकूण १३० शेतकऱ्यांचा समावेश होता. या शेतकरी अभ्यास दौरा दरम्यान गुजरात राज्यातील आनंद कृषि विद्यापीठ, अमूल डेअरी, कृषि उत्पन्न बाजार समिती भावनगर, महुवा येथील विविध पांढरा कांदा प्रक्रिया उद्योग, जुनागढ कृषि विद्यापीठ, नवसारी कृषि विद्यापीठ, भुईमूग संशोधन संचणालय जुनागढ, विश्वकर्मा मशीनरीज राजकोट,फळ प्रक्रिया उद्योग गनदेवी, स्थानिक उपक्रमशील शेतकरी यांच्या प्रक्षेत्र भेटी या ७ दिवसामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. कळवण तालुक्यातील कृषीभूषण कंपनीचे ५ शेतकरी सदस्य यामध्ये सहभागी झालेले होते.
*“या अभ्यासदौरा मुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पांढरा कांदा लागवड व प्रक्रिया व्यवसाय करण्याची संधी यामध्ये मिळाली आहे. आमच्या कंपनीच्या वतीने आगामी हंगामामध्ये प्रायोगिक तत्वावर पांढरा कांद्याची लागवड करण्यात येणार आहे तसेच त्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्याचा आमचा मानस आहे यातून पर्यायी पिकाला संधी मिळेल व नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ होईल. — भूषण निकम, अध्यक्ष – कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनी लि. कळवण,नाशिक*