षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या जिभेवर मग कुरकुरीत भजीचा स्वाद तिखट-गोड चटणीबरोबर घुटमळत राहतो. यंदा मात्र समाधानकारक झालेल्या पावसाने सर्वत्र मोठा उत्साह दिसून आला. चातुर्मासाला प्रारंभ होण्यापूर्वी येणारी नवमी म्हणजे कांदेनवमी. आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिकी शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने कांदा, लसूण, वांगे आदी खाद्यपदार्थ वर्ज्य करायचे. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे म्हणून देवशयनी मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदेनवमी साजरी करायची प्रथा आहे. हल्लीची पिढी हे सगळे मानत नाही, तरी एकेकाळी घरोघरी हे सारे नियम प्रामाणिकपणे पाळले जात होते. चातुर्मासात कोणाच्याही घरातून कांदा, लसणाच्या फोडणीचा घमघमीत वास येणे शक्यच नव्हते. म्हणून तर नियम पाळायचा असेल तर कांदेनवमीला कांद्याचा स्टॉक संपवला पाहिजे.
खरे म्हणजे पावसाळ्यात कांदा सडल्यासारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज्य केलेला आहे. तसेच वांगी, लसूण असे वातूळ आणि पचायला जड असलेले पदार्थ वर्ज्य केले जातात. यादिवशी वाफाळलेल्या चहासोबत कुरकुरीत कांदा भजी, कांद्याची खेकडा भजी, मिरची भजी, ओव्याची पाने, मायाळूची पाने यांची भजी, कांदे पोहे, कांद्याची साधी भजी, कांद्याची पीठ पेरलेली भजी, कांद्याचे थालीपीठ, कांद्याचा झणझणीत झुणका, भरलेली वांगी, वांग्याचे भरीत, कांद्याच्या पातीची भाजी, चटण्या आदी पदार्थ तयार करून मनसोक्तपणे आस्वाद घेत हा दिवस साजरा केला जातो. जणूकाही हा एक विलक्षण खाद्ययोगच म्हणायचा!
कांदाभजी आणि पाऊस यांचे काय नाते आहे काही माहिती नाही. पण आता पावसाचा राग मेघ रंगत चालला आहे. भज्यांच्या आठवणींनी आणि काल्पनिक वासाने जीभ चाळवली गेली आहे. मसाल्याच्या वाफाळत्या चहाचा गंध पसरल्याचा भास होतो आहे. अनेक मैफलींत ऐकलेल्या पावसाच्या अनवट कविता आणि गीते मनात रुंजी घालतायत! मन तरलतेने एका खाद्यात्मिक अनुभूतीचा शोध घेत आहे. अलीकडे सोशल मीडियावर व्हर्च्युअल मेळा साधला गेला. कांदेनवमीचा हा खवय्यांचा आनंद फेसबुक, व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअॅप, स्टेट्स या माध्यमातून अनेकांनी लुटला. कांदाभजीची लज्जत लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरते. तरुणांमध्ये तर कुठल्याही सण, उत्सवाला इव्हेंटचे स्वरूप देण्याची व त्याचा सोशल मीडियावर प्रचार-प्रसार चढाओढ लागली आहे. काही ज्येष्ठांना मात्र घरातल्या घरातच कांदा भजीचा स्वाद चाखावा लागेल. काही खवय्ये नेहमीच्या कट्ट्यावरील खरपूस कांदाभजीचा आस्वाद लुटतील. तसेच शुक्रवार सुटीचा दिवस नसला तरी अनेक जण सायंकाळी होम मिनिस्टरांच्या पाककलेतून तळलेल्या भज्यांवर ताव मारतील. यावेळी घराघरांतून कांदा, लसणाच्या फोडणीचा घमघमाट सर्वत्र दरवळत राहील.
कथा नवमीच्या कांदा भजीची
कांदा भजीचे महत्त्व नवमीला का, दशमीला का नाही? व्रताचा आरंभ एकादशीपासून असेल तर मग मधे हे एक दिवसांचे बफर का? आधुनिक विज्ञानाने उत्तर दिले आहे. मानवी पचनसंस्था शाकाहारी पदार्थ पचवायला 36 तासांपर्यंत वेळ घेत असते. मग नवमीला खाल्लेला कांदा पचन व्हायला एकादशी उजाडतेच. आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक ज्ञानाबद्दल अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टींमधली ही एक गोष्ट. चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे दिवस. पचनशक्ती नैसर्गिकरीत्या कमजोर झालेली असते. त्यात पुन्हा वातूळ पदार्थ खाणे म्हणजे शरीर नामक यंत्रावर अत्याचार करणेच होय. पावसाळ्यात कांदा सडतो म्हणून चातुर्मासात कांद्याचे सेवन टाळले जाते. कांदा हा तसा या भूतलावरचा एक अजब पदार्थ आहे. अध्यात्मापासून आयुर्वेदापर्यंत आणि राजकारणापासून बुद्धिमत्तेपर्यंत याचा मोठाच दबदबा! अध्यात्म हे कांद्यापासून सोवळे पाळून लांब राहते खरे, पण खुद्द कांदा हा भलताच आध्यात्मिक आहे. आडवा कापला तर सुदर्शन चक्रासारखा दिसतो. उभा कापला तर शंखासारखा दिसतो. पातीसह हाती धरला तर गदेसारखा दिसतो. टोक तसेच ठेवून उभ्या पाकळ्या चिरल्या तर कमळासारखा दिसतो. म्हणजे एकाच कांद्यामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म दिसणारा कांदा हा केवढा पवित्र! आयुर्वेदामध्ये त्याला खूप मान आहे. एखाद्याला तो शुद्धीवर आणण्याचे काम करतो. निवडणुका नसल्या तर तो शेतकर्यांना रडवतो आणि निवडणुका असल्या तर राजकारण्यांना घाबरवतो. एखाद्याच्या अकलेचा उणे
निर्देशांक कांद्यामध्ये मोजला जातो.
ते काहीही असले, तरी या कांद्याची भजी आणि धुंद पडणार्या पाऊसधारा यांचे एक अजब नाते आहे, हे मात्र नक्की! याची लज्जत आणि रंगत वाढविण्यासाठी काही शिष्टाचार आणि नियम पाळणे फार महत्त्वाचे आहेत. बाहेर तुडुंब पाऊस हवाच. तुम्ही त्यात थोडेतरी भिजलेले असायला हवे. निदान पावसाच्या सान्निध्यात तरी हवे. तळणीच्या धगधगत्या होमकुंडावरील कढईत नाचणार्या भज्यांच्या गंधाने आसमंत व्यापलेला असावा.
मित्रमैत्रिणी, आप्त, सहकारी अशा मंडळींसोबत गप्पा सुरू असताना पुढ्यात गरमागरम भज्यांची भरलेली थाळी यायला हवी. सोबत हिरवी मिरची किंवा लसूण चटणी हवी. पाण्याच्या पेल्याऐवजी मसाल्याच्या चहाचा कप हवा. बाहेर पावसाचा, टेबलवर गप्पांचा आणि समोर भज्यांचा पुरवठा वाढत जायला हवा. हळूहळू आपण खाद्यात्मिक अनुभूतीचा एक-एक पायरी वर चढू लागतो.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…
गड-किल्ले, डोंगरदर्या चढून तिथल्या निसर्गसौंदर्याने भारावून जाणे आणि इतिहासाची माहिती घेणे असा दुहेरी आनंद मिळतो…