अंड्याच्या आकाराचा मुतखडा काढण्यात डॉक्टरांना यश
सटाणा : देवळा तालुक्यातील एका सत्तर वर्षीय वृद्धास मुतखड्याचा त्रास झाल्याने त्याच्यावर येथील ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाच्या मूत्राशयातून २०० ग्रॅम वजनाचा अंड्याचा आकाराचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. सध्या रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डोंगरगाव (ता. देवळा) येथील तानाजी पानसरे (वय ७०) हे ॲपेक्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. किरण अहिरे यांच्याकडे जेमतेम लघवी होण्याची तक्रार घेऊन आले होते. सोनोग्राफी व एक्स-रे मध्ये मूत्राशयात मोठा खडा आढळला व प्रोटेस्ट ग्रंथीही वाढलेली आढळली. डॉक्टरांनी रुग्ण व नातेवाईकांना तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितल्यावर ते तयार झाले. सोमवारी शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या मूत्राशयातील २०० ग्रॅम वजनाचा अंड्याच्या आकाराचा दगड व ५० ग्रॅम वजनाची प्रोटेस्ट ग्रंथी काढण्यात डॉक्टरांना यश आले. या दगडाची लांबी-रुंदी सुमारे सहा सेंटीमीटर आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. किरण अहिरे यांना भूलतज्ञ डॉ. विष्णू बहिरम, डॉ. प्रवीण खैरनार, डॉ. सीमा खैरनार, डॉ.योगेश विंचू, डॉ. प्रवीण अहिरे, हिरामण गवळे, निलेश खैरनार यांनी सहकार्य केले.
@ ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालय सुरू केले असून ज्येष्ठ सर्जन डॉ. किरण अहिरे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. सटाणा शहरात शस्त्रक्रिया यशस्वी केल्यामुळे समाधान वाटते.
– डॉ. प्रवीण खैरनार, संचालक, ॲपेक्स हॉस्पिटल