नाशिक शिक्षक मतदार संघात किशोर दराडे विजयी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शिक्षक मतदार संघाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून, महायुती चे उमेदवार किशोर दराडे हे विजयी घोषित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे अशी तिरंगी लढत झाली. त्यात दराडे यांनी बाजी मारली. एकूण 64 हजार मतदान झाले होते. विजयासाठी31 हजारांचा कोटा ठरवण्यात आला होता. हा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यात दराडे हे विजयी झाले. विजयानंतर महायुती च्या कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.
अपेक्षित विजय : मंत्री दादा भुसे
नाशिक शिक्षक मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय हा अपेक्षित होता. गेल्या सहा वर्ष त्यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे. शिक्षक हे विकासाचे व्हिजन ठेवून मतदान करत असतात. भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना विकासाचे कार्य कोण करू शकते याचा विश्वास असल्याने आज आमचे उमेदवार पुन्हा विजयी झाले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्षकांनी विश्वास दाखवला आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेवू. आ. किशोर दराडे हे येणारे 6 वर्ष शिक्षकांच्या समस्या सोडवतील हा विश्वास आहे. निवडणुकीदरम्यान अनेक वावड्या उठविण्यात आल्या मात्र सुज्ञ मतदारांनी या बाबींना थारा दिला नाही. पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात शिवसेना व महायुती अभेद्य असल्याचे अधोरेखित झाले.
– दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक