येवला : विलास पगारे
येवला म्हटले की, सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर महाराष्ट्रात ओळखले जाते. मकरसंक्रांतीनिमित्त येवला शहरात मंगळवारपासून सलग तीन दिवस पतंग महोत्सव साजरा होेणार आहे. यानिमित्ताने लाखो पतंग शहरातील आकाशात झेपावणार आहेत. हा अतिमहत्वाचा अन् आवडीचा सण साजरा करण्यासाठी येवलेकर सज्ज झाले आहेत.
पाहुणे, नातेवाईक येवल्यात दाखल
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने येवल्यात सलग तीन दिवस चालणारा पतंग महोत्सव पाहण्यासाठी पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी दाखल झाले आहेत. तीन दिवस पतंग उडविण्याची मजा पाहुणे मंडळी लुटणार आहे. हा महोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी पाहुणे मंडळी, नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित राहून हा आनंदोत्सव साजरा करणार आहेत. हा पतंग महोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नायलॉन मांजाचा वापर करणार्यांवर पोलिसांची नजर असणार आहे.
यंदा नायलॉन मांजावर प्रशासनाने कडक बंदी घातल्याने साध्या दोर्यांवर युवक पतंग उडवून आनंद साजरा करणार आहेत. नायलॉन मांजाचा पतंग उडविण्यासाठी कोणी प्रयत्न केल्यास नगरपालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कायद्याचा बडगा आपल्यावर उगारला जाऊ नये अथवा कारवाई होऊ नये, यासाठी पतंगप्रेमींनी सावध भूमिका घेत नायलॉन मांजाचा वापर टाळल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. शहरात पतंग महोत्सवाची तयारी येवलेकरांनी पूर्ण केली आहे. सलग तीन दिवस पतंग महोत्सव साजरा होणार आहे.
शहरवासीय आपला व्यवसाय बाजूला ठेवून पतंग महोत्सवाचा आनंद लुटणार आहेत. यानिमित्ताने शहरातील इमारती, तसेच गच्चींवर नागरिकांची गर्दी होणार आहे. ढोल-ताशाचा गजर, ध्वनिवर्धक अन् फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. हा पतंग महोत्सव बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून पतंगप्रेमी दाखल होत आहेत. विविध प्रकारचे आकर्षक लहान-मोठे रंगीबेरंगी पतंग आकाशात झेपावणार आहेत.
पतंग महोत्सवाची हजारो वर्षांची परंपरा आजही येवलेकरांनी जपली आहे. दिवसेंदिवस या पतंग महोत्सवाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तीन दिवस चालणार्या या पतंग महोत्सवात विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी, सिनेअभिनेते, कलावंत हजेरी लावणार आहेत. दरवर्षी या पतंग महोत्सवात राज्याचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ उपस्थित राहून पतंग महोत्सवाचा आनंद लुटत असतात. स्थानिक नेतेमंडळी आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे, युवानेते संभाजी पवार, कुणाल दराडे, तसेच शहरातील विविध पक्षांची नेतेमंडळी, व्यापारी, या पतंग महोत्सवात सहभागी होत असतात.
विशेष बाब म्हणजे महिला, युवती, युवक अन् वयोवृद्धदेखील या पतंग महोत्सवात सहभागी होऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटत असतात. एकमेकांचे पतंग काटण्यासाठी हजारो रुपयांचा पैंजा लावल्या जातात. राजकीय मंडळीदेखील एकमेकांचे पतंग काटून आनंद साजरा करतात.
येवला शहरातील सुप्रसिद्ध वाद्य हलकडीवर ठेका धरत येवलेकर पतंग महोत्सवाची मजा लुटणार आहेत. दे ढील… काट…काटे…काटे…अन् बढाव.. बढाव…हा आवाज शहरात घुमणार आहे. एकमेकांचे पतंग कापण्यासाठी येवलेकर मंडळी सज्ज झाली आहे.
Kite festival begins in Yeola from today